युरोपमध्ये कोरोनाच्या बळींची संख्या पाच लाखांवर

- अमेरिकेत ३३ सेकंदामागे कोरोनाच्या एका बळीची नोंद

लंडन/वॉशिंग्टन – युरोपिय देशांमध्ये कोरोनाच्या साथीत बळी पडलेल्यांची संख्या पाच लाखांवर गेली आहे. ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोना विषाणूच्या नव्या प्रकारामुळे (स्ट्रेन) साथीचे रुग्ण व बळी वेगाने वाढत असल्याचे समोर आले आहे. युरोपातील अनेक देशांनी गेल्या काही आठवड्यात ‘लॉकडाऊन’सह कठोर निर्बंधांची घोषणा केली असतानाही रुग्ण व बळींचे प्रमाण वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, अमेरिकेत कोरोनाच्या साथीत दगावणार्‍यांची संख्या तीन लाख २२ हजारांवर गेली आहे. १४ ते २० डिसेंबर या सात दिवसांच्या कालावधीत १८ हजारांहून अधिक जणांचा बळी गेला असून प्रत्येकी ३३ सेकंदाला एक रुग्ण दगावत असल्याची माहिती समोर आली आहे.

गेल्या काही आठवड्यात जगभरात कोरोनाची साथ वेगाने फैलावताना दिसत आहे. अमेरिका, युरोप, आफ्रिका, आशिया या सर्वच प्रमुख खंडामध्ये रुग्ण तसेच बळींची संख्या वाढताना दिसत आहे. अमेरिकेतील ‘जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटी ऑफ मेडिसिन’ने दिलेल्या माहितीनुसार, जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या सात कोटी, ८१ लाखांवर गेली आहे. साथीत बळी पडणार्‍यांची संख्या १७ लाख, २० हजार ३६६ झाली आहे. सर्वाधिक बळी युरोप खंडातील असून बळींची संख्या पाच लाखांवर गेल्याचे समोर आले.

इटली, ब्रिटन, फ्रान्स, स्पेन व रशिया या देशांमध्ये बळींची संख्या सर्वाधिक असून त्यात सातत्याने भर पडत आहे. इटलीतील बळींची संख्या ७० हजारांनजिक पोहोचली असून ब्रिटनमध्ये ६८ हजारांहून अधिक जण दगावले आहेत. ब्रिटनमध्ये आढळलेला कोरोना विषाणूचा नवा प्रकार रुग्ण तसेच बळींची संख्या वेगाने वाढवित असल्याचे सांगण्यात येत आहे. युरोप खंडात कोरोनाचा पहिला बळी फेब्रुवारी महिन्यात गेल्या होता. त्यानंतर पुढील आठ महिन्यात युरोपिय देशांमध्ये कोरोना बळींची संख्या अडीच लाखांपर्यंत गेली होती. मात्र त्यानंतर अवघ्या ६० दिवसांमध्ये अडीच लाखांहून अधिक जणांचा बळी गेल्याचे दिसून आले आहे.

युरोपिय देशांबरोबरच अमेरिकेतही कोरोनाची साथ वेगाने फैलावताना दिसत आहे. ‘जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटी ऑफ मेडिसिन’च्या माहितीनुसार, अमेरिकेतील रुग्णांची संख्या एक कोटी ८२ लाखांवर पोहोचली असून तीन लाख, २२ हजार, ६७६ जणांचा बळी गेला आहे. १४ ते २० डिसेंबर या कालावधीत अमेरिकेतील बळींच्या संख्येत १८ हजारांहून अधिक जणांची भर पडली आहे. १३ डिसेंबर रोजी संपलेल्या आठवड्याच्या तुलनेत बळींच्या संख्येत तब्बल ६.७ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे.

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना साथीतील अर्थसहाय्याबाबत तयार करण्यात आलेल्या ९०० अब्ज डॉलर्सच्या विधेयकावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला आहे. विधेयकात अमेरिकी नागरिकांना देण्यात येणारे ६०० डॉलर्सचे अर्थसहाय्य अपुरे असून ते दोन हजार डॉलर्सपर्यंत वाढविण्यात यावे, अशी मागणी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केली आहे. ट्रम्प यांच्या या मागणीला संसदेच्या प्रतिनिधीगृहाच्या सभापती नॅन्सी पेलोसी यांनी पाठिंबा दिला आहे.

leave a reply