रशिया व जपानसह युरोपातील 12 देशांमध्ये ‘बर्ड फ्ल्यू’ची साथ -लाखो पक्ष्यांची कत्तल

लंडन/टोकियो/मॉस्को – ऑगस्ट महिन्यात रशियातील एका फार्मवरून सुरू झालेल्या ‘बर्ड फ्ल्यू’च्या साथीची व्याप्ती भयावहरित्या वाढत असल्याचे समोर येत आहे. रशियातून सुरू झालेली ही साथ कझाकस्तान व जपानसह युरोपातील 12 देशांमध्ये पसरल्याचे उघड झाले. रशियात गेल्या चार महिन्यात 18 लाखांहून अधिक पक्ष्यांचा मृत्यू झाला असून जपानमध्ये 14 लाखांहून अधिक पक्ष्यांची कत्तल करणे भाग पडल्याची माहिती देण्यात आली. युरोपातही  साथीत बळी गेलेल्या तसेच कत्तल केलेल्या पक्ष्यांची संख्या 20 लाखांवर गेल्याचे सांगण्यात येते. या साथीमुळे ‘पोल्ट्री’ उद्योगाला अब्जावधी डॉलर्सचा फटका बसल्याचा दावाही करण्यात आला आहे. गेल्या काही वर्षात युरोप व आशियाई देशांना सातत्याने ‘बर्ड फ्ल्यू’च्या साथीचा फटका बसत असल्याचे दिसून आले आहे. यापूर्वी 2014 तसेच 2016 सालीही युरोपमध्ये ‘बर्ड फ्ल्यू’ची साथ आली होती. मात्र यावेळी कोरोनाव्हायरसच्या पार्श्‍वभूमीवर आलेल्या नव्या साथीने संकटाची व्याप्ती अधिकच वाढल्याचे सांगण्यात येत आहे. युरोपमधील यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या फैलावलेल्या ‘बर्ड फ्ल्यू’च्या साथीची सुरुवात रशियामधून झाली आहे. ऑगस्ट महिन्यात पश्‍चिम रशियातील एका फार्मवरील पाच पक्ष्यांचा ‘बर्ड फ्ल्यू’मुळे मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली होती. त्यानंतर हा रोग रशियातून कझाकस्तानमध्ये पसरला.

‘बर्ड फ्ल्यू’

मे महिन्यानंतरचा काळ रशिया व युरोपमधील पक्ष्यांचा स्थलांतरणाचा काळ म्हणून ओळखण्यात येतो. या काळात रशियातील लाखो पक्षी युरोपिय देशांमध्ये स्थलांतर करतात. ही बाब लक्षात घेऊन युरोपिय यंत्रणांनी रशियात सुरू झालेल्या साथीबद्दल सावधगिरीचा इशाराही दिला होता. मात्र त्यानंतरही युरोपात मोठ्या प्रमाणात साथीचा फैलाव झाल्याचे समोर आले आहे. ‘युरोपियन फूड सेफ्टी ऑथोरिटी’ने दिलेल्या माहितीनुसार, युरोप खंडातील 12 देशांमध्ये  ‘बर्ड फ्ल्यू’ची साथ पसरली आहे.

या देशांमध्ये ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, इटली, बेल्जियम, नेदरलॅण्डस्‌, डेन्मार्क, आयर्लंड, स्वीडन, पोलंड, स्लोव्हेनिया व क्रोएशिया यांचा समावेश आहे. साथीचा सर्वाधिक फटका पोलंडला बसल्याचे समोर आले आहे. या देशातील जवळपास 10 लाख पक्ष्यांची कत्तल करणे भाग पडल्याची माहिती स्थानिक यंत्रणांनी दिली. त्यापाठोपाठ नेदरलॅण्डस्‌मध्ये जवळपास पाच लाख पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. बेल्जियममध्ये दीड लाखांहून अधिक पक्ष्यांची कत्तल करण्यात आल्याचे सांगण्यात आले. युरोपात ‘बर्ड फ्ल्यू’चे तीन वेगवेगळे प्रकार आढळले असून लागण झालेल्या पक्ष्यांमध्ये कोंबड्यांसह, टर्की, बदक, हंस यांचा समावेश आहे.

रशिया व युरोपव्यतिरिक्त कझाकस्तान तसेच जपानलाही ‘बर्ड फ्ल्यू’चा मोठा फटका बसला आहे. कझाकस्तानमध्ये सुमारे 10 लाख पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. तर जपानमध्ये या महिन्यात सुमारे 14 लाख कोंबड्यांची कत्तल करण्यात आल्याची माहिती स्थानिक यंत्रणांनी दिली. ‘वर्ल्ड ऑर्गनायझेशन फॉर ॲनिमल हेल्थ’ या आंतरराष्ट्रीय संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, इस्रायल व दक्षिण कोरियामध्येही ‘बर्ड फ्ल्यू’ची साथ सुरू झाली आहे.

leave a reply