6500 डॉलर्स मोजणाऱ्यांना ब्लॅकवॉटर्स अफगाणिस्तानातून बाहेर काढत आहे

- अमेरिकी दैनिक ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’चा दावा

वॉशिंग्टन/काबुल – तालिबानच्या राजवटीमुळे भेदरलेल्यांना अफगाणिस्तानातून बाहेर काढण्यासाठी ‘ब्लॅकवॉटर’ ही खाजगी लष्करी कंत्राटदार कंपनी प्रत्येकी 6,500 डॉलर्स घेत आहे, असा दावा अमेरिकेच्या ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ या दैनिकाने केला आहे. ‘ब्लॅकवॉटर’ कंपनीचे प्रमुख एरिक प्रिन्स यांनी यासंदर्भात वक्तव्य केल्याचे अमेरिकी दैनिकाने म्हटले आहे. व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या जेन साकी यांनी या वक्तव्यावर टीका केली असून, प्रिन्स हे भावनाशून्य व्यक्ती असून लोकांच्या भीतीचा लाभ घेऊन नफा कमवित असल्याची नाराजी व्यक्त केली आहे.

अमेरिका व इतर देशांचे सैन्य तसेच नागरिकांच्या माघारीसाठी 31 ऑगस्ट हीच अंतिम मुदत असल्याची आक्रमक भूमिका तालिबानने घेतली आहे. या मुदतीपलिकडे परदेशी सैन्य अफगाणिस्तानात राहणे ही ‘रेड लाईन’ असेल असे तालिबानकडून बजावण्यात येत आहे. यासाठी अमेरिका व इतर देशांकडून सुरू असलेल्या खटपटीही अपयशी ठरल्या आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनीही 31 ऑगस्टला अमेरिकी सैन्य बाहेर पडलेले असेल, असे संकेत दिले आहेत.

मात्र अमेरिकी व परदेशी सैन्य बाहेर पडले तरी हजारो परदेशी तसेच अफगाणी नागरिक अफगाणिस्तानातच अडकतील, अशी माहिती समोर येत आहे. या पार्श्‍वभूमीवर ‘ब्लॅकवॉटर’सारख्या खाजगी कंत्राटदार कंपनीकडून अफगाणिस्तानमधील नागरिकांना सोडविण्यासाठी मोहीम सुरू असल्याची माहिती धक्कादायक मानली जाते. ‘ब्लॅकवॉटर’ या कंपनीने यापूर्वी अफगाणिस्तानात लष्करी मोहिमा राबविल्या आहेत. अमेरिकी सरकारकडूनच यासंदर्भातील कंत्राट कंपनीला देण्यात आले होते.

मात्र अमेरिकी लष्कराच्या माघारीच्या पार्श्‍वभूमीवर खाजगी कंत्राटदार कंपनी अफगाणिस्तानात कार्यरत असल्याची माहिती समोर येणे लक्ष वेधून घेणारी घटना ठरते. ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ या दैनिकाने ‘ब्लॅकवॉटर’चे प्रमुख एरिक प्रिन्स यांनीच अफगाणिस्तानमधील ‘रेस्क्यू मिशन’ची माहिती दिल्याचे म्हटले आहे. त्यावर अमेरिकी लष्कर अथवा प्रशासनाकडून खुलासा देण्यात आलेला नाही. ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’मधील वृत्त समोर येत असतानाच एरिक प्रिन्स यांनी ‘फॉक्स न्यूज’ला दिलेली मुलाखतही समोर आली आहे.

प्रिन्स यांनी 2008 साली ‘ब्लॅकवॉटर’ कंपनीच्या पथकानेच तत्कालिन अमेरिकी सिनेटर ज्यो बायडेन, जॉन केरी व चक हेगेल यांना अफगाणिस्तानमधील तालिबानच्या जागेतून सुरक्षित बाहेर काढले होते, असा दावा या मुलाखतीत केला होता. पण या सर्वांनी हा दावा फेटाळला होता व याचे श्रेय अमेरिकी लष्कराला दिले होते, असेही प्रिन्स यांनी मुलाखतीत सांगितले. ‘ब्लॅकवॉटर’ ही कंत्राटी लष्करी सेवा देणारी कंपनी यापूर्वी इराक तसेच लिबियातील मोहिमांवरून अडचणीत आली असून या कंपनीवर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.

leave a reply