अफगाणिस्तानातील स्फोटांमध्ये तालिबानचे २५ दहशतवादी ठार

- आयएस-खोरासनचा दावा

स्फोटांमध्येकाबुल – गेल्या तीन दिवसांपासून अफगाणिस्तानच्या प्रमुख शहरांमध्ये झालेल्या स्फोटांची जबाबदारी ‘आयएस-खोरासन’ने स्वीकारली. तालिबानी दहशतवाद्यांच्या वाहनांना लक्ष्य करून घडविलेल्या या स्फोटांमध्ये २५ तालिबानी ठार झाल्याचा दावा आयएसने केला. पाश्‍चिमात्यांशी वाटाघाटी करणारी तालिबान आपल्या ध्येयाशी एकनिष्ठ राहिली नसल्याची टीका आयएसने याआधी केली होती. तसेच तालिबानवर हल्ले चढविण्याची धमकी दिली होती.

शनिवारच्या साखळी स्फोटानंतर रविवारी पुन्हा एकदा जलालाबाद येथे स्फोट झाले. शहरात गस्त घालणार्‍या अफगाणी पोलीसदलाच्या वाहनावर हा हल्ला झाला. महिन्याभरापूर्वी अफगाणिस्तानची सुरक्षा व्यवस्था हातात घेणारे तालिबानचे दहशतवादी या वाहनातून गस्त घालत होते. या हल्ल्यात पाच ते आठ जण ठार झाले असून यामध्ये दोन नागरिकांचा समावेश असल्याचा दावा स्थानिक करीत आहेत. तर या हल्ल्याबाबत आणखी काही दावे केले जात आहेत.

स्फोटांमध्येतालिबानच्या दहशतवाद्यांनी भरलेल्या ट्रकवर हा हल्ला झाला. या स्फोटात तालिबानचे दहशतवादी मोठ्या संख्येने जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यामुळे जलालाबाद येथील या स्फोटात ठार झालेल्यांची संख्या सांगितली जाते त्याहूनही अधिक असण्याची शक्यता वर्तविली जाते. हा बॉम्बहल्ला असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. तर मोटारसायकलवरुन आलेल्या दहशतवाद्याने तालिबानच्या वाहनाला धडक दिल्याचा दावा स्थानिक माध्यमांनी केला आहे.

गेल्या तीन दिवसांपासून होत असलेल्या या स्फोटांवर तालिबानने प्रतिक्रिया दिलेली नाही. यापैकी जलालाबाद येथील स्फोटात हक्कानी नेटवर्कशी संलग्न असलेल्या दहशतवाद्यांना लक्ष्य करण्यात स्फोटांमध्येआले होेते. गेल्या दोन आठवड्यांपासून तालिबानच्या मुल्ला बरादर आणि हक्कानी नेटवर्कमध्ये निर्माण झालेल्या टोकाच्या मतभेदाच्या पार्श्‍वभूमीवर, हे हल्ले सुरू झाले असून हा तालिबानमधील अंतर्गत संघर्षाचा भाग असल्याची बाब समोर आली होती. पण अफगाणिस्तानात प्रबळ बनत चाललेल्या ‘आयएस-खोरासन’ या दहशतवादी संघटनेने या स्फोटांची जबाबदारी स्वीकारून तालिबानला धक्का दिला आहे.

अफगाणिस्तानातील तालिबानची राजवट आयएस-खोरासनला मान्य नाही. तालिबानने अमेरिकेबरोबर तडजोड केली आणि सत्ता मिळविली, असा आरोप आयएस-खोरासान करीत आहे. म्हणूनच अफगाणी जनतेच्या हक्कांसाठी तालिबानवर हल्ले चढविण्याचे इशारे आयएस-खोरासानने दिले होते. प्रत्यक्षात आयएस-खोरासान ही वेगळी दहशतवादी संघटना नसून तालिबानमधून बाहेर पडलेल्या दहशतवाद्यांचाच तो नवा गट असल्याचे सांगितले जाते. या गटाच्या हल्ल्यात तालिबानला आपले दहशतवादी गमवावे लागत आहेत. अजूनही तालिबानने त्यावर प्रतिक्रिया दिलेली नाही, ही बाब तालिबानमधला अंतर्विरोध दाखवून देणारी ठरते.

leave a reply