सुदानच्या ब्ल्यू नाईल प्रांतातील वांशिक संघर्षात 65 जणांचा बळी

ब्ल्यू नाईल

खार्तुम – सुदान-इथिओपिया सीमेवर असलेल्या ‘ब्ल्यू नाईल’ प्रांतात झालेल्या वांशिक संघर्षात 65 जणांचा बळी गेला आहे. या प्रांतातील हौसा व बिरता या दोन गटांमध्ये गेल्या आठवड्यात संघर्ष भडकला होता. संघर्षानंतर प्रांतातील रोसायर्स व अल-दमाझिन या शहरांमध्ये लष्कर तसेच ‘रॅपिड सपोर्ट फोर्सेस’ तैनात करण्यात आल्या आहेत. जमिनीच्या वादावरून संघर्षाचा भडका उडाल्याची माहिती स्थानिक सूत्रांनी दिली. गेले काही महिने सुदानच्या विविध भागांमध्ये सातत्याने वांशिक संघर्षाचा भडका उडत असून लष्करी राजवट त्यावर नियंत्रण मिळविण्यात अपयशी ठरल्याचे दिसत आहे.

ब्ल्यू नाईल‘ब्ल्यू नाईल’ प्रांतातील जमिनीचा वाद सोडविण्यासाठी हौसा गटाकडून नागरी यंत्रणा स्थापन करण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. मात्र हा प्रस्ताव बिरता गटाकडून फेटाळण्यात आला. या नाराजीतून दोन गटांमध्ये संघर्षाचा भडका उडाला. बिरता गटाने हे आरोप नाकारले आहेत. आपल्या जमिनींवर हौसा गटाकडून ताबा मिळविण्याचा प्रयत्न झाल्याने प्रत्युत्तर देण्यात आल्याचे बिरता गटाच्या सदस्यांनी सांगितले. गेल्या आठवड्यापासून भडकलेल्या संघर्षात 65 जणांचा बळी गेला असून 150 जण जखमी झाले आहेत. या संघर्षानंतर अनेक नागरिकांनी प्रांताबाहेर स्थलांतर करण्यास सुरुवात केल्याची माहिती स्थानिक सूत्रांनी दिली.

ब्ल्यू नाईलसुदानमध्ये जवळपास तीन दशके सत्ता गाजविणाऱ्या हुकुमशहा ओमर बशिर यांना विरोध करणाऱ्यांमध्ये ‘ब्ल्यू नाईल’ प्रांताचा समावेश होतो. त्यामुळे या प्रांताला सातत्याने अस्थिरता, दडपशाही व हिंसाचाराचा सामना करावा लागला होता. बशिर यांची राजवट उलथून लष्कराने सत्ता हाती घेतल्यानंतर या प्रांतातील वांशिक टोळ्यांशी शांतीकरार करण्यात आले होते. मात्र त्याचे पालन होत नसून सातत्याने वांशिक संघर्षाच्या घटना घडत आहेत.

पाणी, शेती व जमिनीच्या मुद्यावरून सुदानच्या विविध प्रांत तसेच वांशिक गटांमध्ये वारंवार संघर्ष भडकतो आहे. दर्फूर हे त्याचे ठळक उदाहरण मानले जाते. बशिर यांच्या काळात त्यांनी अरब गटांना पाठिंबा देऊन आफ्रिकीवंशियांचा संहार सुरू केला होता. सुदानमधील वांशिक संघर्ष रोखण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघटनेकडून शांतीपथकेही तैनात करण्यात आली होती. मात्र त्याने विशेष बदल झाला नसून तैनातीची मुदत संपल्यावर पुन्हा संघर्ष तीव्र होण्यास सुरुवात झाल्याचे दिसते.

leave a reply