इराणकडे अणुबॉम्ब निर्मितीची क्षमता आहे

- इराणच्या सर्वोच्च धार्मिक नेत्यांचे सल्लागार

अणुबॉम्बतेहरान – ‘येत्या काही दिवसात इराण 60 टक्क्यांपर्यंत युरेनियमचे संवर्धन करू शकतो आणि युरेनियमच्या संवर्धनाचे हे प्रमाण 90 टक्क्यांपर्यंत सहजपणे नेऊ शकतो. त्यामुळे इराणकडे अणुबॉम्बच्या निर्मितीसाठी आवश्यक तंत्रज्ञान आहे. पण इराणने अजूनही अणुबॉम्बच्या निर्मितीचा निर्णय घेतलेला नाही’, असा इशारा इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते आयातुल्लाह खामेनी यांच्या सल्लागाराने दिला. इराणकडे अणुबॉम्बच्या निर्मितीसाठी आवश्यक साहित्य व तंत्रज्ञान असल्याचा आरोप इस्रायल व अरब देश करीत आहेत. पण बायडेन प्रशासन अजूनही इराणबरोबर अणुकराराच्या वाटाघाटीसाठी धडपडत आहे. अशावेळी इराणने दिलेला हा इशारा लक्षवेधी ठरतो.

इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते आयातुल्ला खामेनी यांचे वरिष्ठ सल्लागार कमाल खराझी यांनी कतारच्या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अणुबॉम्बच्या निर्मितीसाठी आवश्यक साहित्य असल्याची कबुली दिली. ‘20 टक्क्यांपर्यंत युरेनिअमचे संवर्धन करणे फार कठीण होते. पण 60 टक्क्यांपर्यंत युरेनिअमचे संवर्धन अवघ्या दोन ते तीन दिवसात शक्य झाले. त्यामुळे 90 टक्क्यांपर्यंत युरेनिअमचे संवर्धन करण्यात अडचणी येणार नाहीत’, असा विश्वास खराझी यांनी व्यक्त केला.

‘इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते खामेनी यांनी दिलेल्या निर्देशानुसार, अणुबॉम्बची निर्मिती इराणच्या नियमांच्या विरोधात आहे. पण आण्विक तंत्रज्ञानावर प्रभूत्व मिळवून अणुबॉम्बच्या निर्मितीची क्षमता असणे इराणवरील हल्ले रोखण्यासाठी आवश्यक ठरेल’, असे खराझी म्हणाले. खराझी यांची ही घोषणा इस्रायल तसेच इस्रायलशी सहकार्य करणाऱ्या आखाती-अरब देशांसाठी असल्याचा दावा केला जातो. याच मुलाखतीत खराझी यांनी इराणच्या शेजारी देशांना धमकावले.

अणुबॉम्ब‘शेजारच्या देशांमधून इराणला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केलाच तर संबंधित देशांवर आणि थेट इस्रायलवर हल्ले चढवून उत्तर दिले जाईल’, अशी धमकी खराझी यांनी दिली. तसेच इराणने इस्रायलच्या अतिदूर शहरांपर्यंत हल्ले चढविण्याचा सराव केल्याचा दावा खराझी यांनी केला. यासाठी इराणकडे क्षेपणास्त्रे आणि त्यांचे तंत्रज्ञान असल्याची आठवण खराझी यांनी करुन दिली. तसेच याबाबत पाश्चिमात्य देशांशी कुठल्याही प्रकारची तडजोड केली जाणार नसल्याचे खामेनी यांच्या सल्लागारांनी बजावले.

2015 साली अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि युरोपिय देशांनी इराणबरोबर अणुकरार केला होता. यानुसार, इराणला युरेनिअमचे संवर्धन 3.67 टक्क्यांपर्यंत मर्यादित ठेवणे आवश्यक होते. तसेच सेंट्रिफ्यूजेसच्या संख्येबाबतही इराणला बंधने घातली होती. यामोबदल्यात अमेरिका व युरोपिय देशांनी इराणला निर्बंधातून सवलत दिली होती. पण इराणने या निर्बंधांचे उल्लंघन केल्याचा आरोप इस्रायलने केला होता. काही आठवड्यांपूर्वीच आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाने इराणच्या अणुप्रकल्पातील घडामोडींवर चिंता व्यक्त केली होती.

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या गेल्या आठवड्यातील इस्रायल व सौदीच्या दौऱ्यातही इराणच्या अणुकार्यक्रमाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. राजकीय वाटाघाटीतून हा प्रश्न सोडविण्याच्या आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे बायडेन यांनी म्हटले होते. तसेच शेवटचा पर्याय म्हणून लष्करी कारवाईचा वापर करण्याचे जाहीर केले होते. या पार्श्वभूमीवर, इराणकडून अणुबॉम्बसंदर्भात दिले जात असलेले इशारे आखाती देशांसह बायडेन प्रशासनाचाही चिंता वाढवित आहे.

leave a reply