बॉम्बे हायजवळ बुडालेल्या बार्जमधील 52 जण अजूनही बेपत्ता – 22 जणांचे मृतदेह हाती लागले

पी-305 या बार्जमधील वाचविण्यात आलेल्या 186 पैकी 125 कामगारांना बुधवारी नौदलाच्या आयएनएस कोची या युद्धनौकेतून मुंबईत आणण्यात आले. यावेळी काही जणांना आपण कशा परिस्थितीत बचावलो हे सांगताना अश्रू अनावर झाले होते.

नवी दिल्ली – अरबी समुद्रात मुंबई किनारपट्टीपासून 170 सागरी मैलावर बॉम्बे हायनजीक बुडालेल्या बार्जमधील 52 जण अद्याप बेपत्ता आहेत. जस जसा वेळ पुढे सरकत असून हे कामगार बचावले असल्याची शक्यता कमी होऊ लागली आहे. आतापर्यंत 22 जणांचे मृतदेह होती लागले असून या बार्जमधील 273 पैकी 186 जणांची सुटका करण्यात आली आहे. यातील कित्येकांनी ही बार्ज बुडत असताना समुद्रात उड्या मारल्या होत्या व जीवनरक्षक जॅकेटच्या सहाय्याने 10 ते 11 तास पोहत मदतीची वाट पाहिल्याचे समोर येत आहे. बचावलेल्या कामगारांनी नौदलामुळे आपण आज वाचलो असल्याचे सांगत आभार मानले.

बॉम्बे हायतौक्ते चक्रीवादळात ओएनजीसीच्या दोन बार्जसह एक उत्खनन जहाज भरकटले होते. तसेच एका खाजगी कंपनीची बार्जही भरकटली होती. या तीन बार्ज व उत्खनन जहजावर मिळून 713 कर्मचारी होते. यातील 637 जणांना वाचविण्यात यश आले आहे. उसळणाऱ्या लाटा, तुफानी वारे आणि जोरदार पाऊस यामध्ये नौदल आणि तटरक्षकदलांनी हे बचावकार्य राबविले. या बचाव अभियानामध्ये मोठी आव्हाने होती. मात्र जीवधोक्यात घालून जवानांनी शेकडो जणांचे प्राण वाचविले आहेत.

‘ऑईल ॲण्ड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन’च्या (ओएनजीसी) पी-305 या बार्जमध्ये 273 जणांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याची व बार्ज बुडत असल्याची सूचना नौदलाला सोमवारी पहाटे मिळाली होती. तौक्ते चक्रीवादळाचा वेग आणि भीषणतेबद्दल आधीच सर्वांचा सावध करण्यात आले होते. हवामानखात्याने तसा ॲलर्ट जारी केला होता. यानंतर ओएनजीसीकडून या उत्खनन क्षेत्रात काम करीत असलेल्या, तसेच या बार्जवर रहात असलेल्याकर्मचारी व इतर खलाशांना ताबतोब किनाऱ्यावर आणा अशी सूचना खाजगी कंत्राटदाराला केली होती. मात्र या बार्जवरील अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचे वाचविण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवरुन समोर येत आहे.

बॉम्बे हायतौक्ते चक्रीवादळ या ठिकाणापासून सुमारे 125 मैल दूरुन जाणार आहे, यामुळे धोका निर्माण होणार नाही, या गैरसमजूतीत राहून बार्जवरील अधिकाऱ्यांनी निर्णय घेतले. कामगारांनी चिंता व्यक्त केली असतानाही अधिकाऱ्यांपुढे काही करता आली नसल्याची प्रतिक्रिया बचावलेल्या काही जणांनी दिली आहे.

रविवारी 16 मेच्या रात्री वाऱ्याचा वेग वाढत गेला व मोठ्या लाटा उसळू लागल्या. त्यावेळी अधिकाऱ्यांना धोक्याचा अंदाज आला आणि त्यांनी ओएनजीसीकडे मदत मागितली. मात्र ओएनजीसीने अशा परिस्थिती मदतीस असमर्थता दर्शवली व त्यानंतर नौदल व तटरक्षकदलाला याची सूचना देण्यात आली, अशी माहिती काही कामगारांनी माध्यमांना दिली. पी-305 या बार्जचे सहाही अँकर लाटांच्या तडाख्याने तुटले. त्यानंतर ही बार्ज प्रकल्पापासून चक्रीवादळाच्या दिशेने सरकू लागली. दहा ते बारा मीटर उंच लाटांमुळे बार्जमध्ये पाणी शिरू लागले. अशा परिस्थितीत जगण्याची शक्यता सर्वच कामगारांना धूसर वाटू लागली.

इतक्या मोठ्या वादळात कोणत्याही जहाजावर नियंत्रण मिळविणे कठीण असते. युद्धनौकांसाठीही अशी परिस्थिती अवघड मानली जाते, अशी माहिती एका नौदल अधिकाऱ्याने दिली. मात्र अशाही परिस्थितीत या कामगारांना वाचविण्यासाठी नौदलाने व तटरक्षकदलाने मोहीम हाती घेतली, असे अधिकाऱ्याने सांगितले.

मंगळवारपर्यंत पी-305 बार्जवरील 177 जणांची सुटका करण्यात आली होती. नौदलाच्या पाच युद्धनौका आणि काही हेलिकॉप्टर्सच्या सहाय्याने हे बचावकार्य सुरू असतानाच ही बार्ज बुडली होती. त्यानंतर पोहत असलेल्या असंख्य कर्मचाऱ्यांना नौदलाने बाहेर काढले. वारा व लाटांचा वेग, धुवांधार पावसामुळे कमी दृष्यमानता यामुळे या मोहीमेत बरेच अडथळे होते. अधूनमधून काही काळासाठी ऑपरेशन थांबवावेही लागले.

मात्र प्रत्येकाचे प्राण वाचविण्यासाठी नौदलाकडून शर्थिचे प्रयत्न करण्यात आले. बार्ज बुडाल्यावर वाचविण्यात आलेले बरेचशे जण हे लाईफ सेव्हिंग अर्थात जीवनरक्षक जॅकेटमध्ये होते. यातील काही जण पोहून थकले होते व काही बेशुद्ध झाले होते. अशीही माहिती समोर येत आहे. यामुळे बेपत्ता असलेले इतर जणांनीही लाईफ सेव्हिंंग जॅकेट घातले असावे व ते लाटांबरोबर दूर गेले असावे. त्यामुळे त्यांची जींवत असल्याची शक्यता मानून नौदल या बेपत्ता असलेल्यांचा शोध घेत आहे. आतापर्यंत 22 जणांचे मृतदेह सापडले आहे. त्यामुळे बेपत्ता असलेल्या आणखी 52 जणांची वाचण्याची शक्यता धूसर झाली आहे. मात्र नौदल व तटरक्षकदलाकडून अजून ऑपरेशन सुरू आहे. दरम्यान, मुंबई किनारपट्टीपासून 45 मैल अंतरावर भरकटलेल्या ‘जीएएल कन्स्ट्रन्शन’ कंपनीच्या बार्जमधील सर्व १३७ खलाशांची नौदलाने सोमवारीच सुटका केली होती. तर गुजरातच्या पिवावावपासून ५० सागरी मैल अंतरावर असलेल्या ओएनजीसीचे ‘सागर भूषण’ हे उत्खनन जहाज आणि एसएस-३ या बार्जमधील २९७ जणांची सुटका करण्यात आली आहे. नौदल आणि तटरक्षक दलाकडून अरबी समुद्रात सुरू असलेल्या या बचावकार्याचा पंतप्रधान मोदी यांनी बुधवारी आढावा घेतला.

leave a reply