लडाखच्या एलएसीजवळील क्षेत्रातील चीनच्या लष्करी हालचालींवर भारताची करडी नजर

नवी दिल्ली – लडाखच्या एलएसीवरून सैन्यमाघार घेतलेल्या क्षेत्रात चीनच्या लष्करी हालचाली सुरू नाहीत, असा निर्वाळा लष्करप्रमुखांनी दिला. एलएसीजवळील क्षेत्रात चीनचे लष्कर सराव करीत असल्याच्या बातम्या येत आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर, लष्करप्रमुख जनरल मनोज मुकूंद नरवणे यांनी हा खुलासा केला आहे. मात्र एलएसीनजिकच्या क्षेत्रात चीनच्या लष्करी हालचाली व तैनातीवर भारताची नजर रोखलेली आहे, हे सांगणाऱ्या बातम्या सातत्याने प्रसिद्ध होत आहेत.

भारताची करडी नजरवृत्तसंस्थांना दिलेल्या मुलाखतीत लष्कप्रमुख जनरल नरवणे यांनी लडाखच्या एलएसीवरील पँगाँग सरोवर क्षेत्रातील सैन्यमाघारीवर भारत व चीन कायम असल्याचे स्पष्ट केले. सध्या चीन लडाखच्या एलएसीजवळ लष्करी सराव करीत आहे. त्यात काही नवे नसून दरवर्षी उन्हाळ्यात चीन असा सराव करतो. तरीही चीनच्या या सरावावर भारतीय सैन्याची करडी नजर रोखलेेली आहे, अशी माहिती समोर येत आहे. गेल्या वर्षीही चीनने या क्षेत्रात असाच सराव केला होता. याद्वारे भारतावर दडपण आणण्याची चीनची योजना होती. पण त्यावेळीही चीनला यात यश मिळाले नव्हते. यावर्षीही यातून चीनच्या हाती काही लागण्याची शक्यता नाही. पण यामुळे भारतीय सैन्याची सतर्कता अधिकच वाढली आहे.

लडाखच्या एलएसीवरील तणाव कमी करण्यासाठी भारत व चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. अशा काळात चीन करीत असलेला हा सराव लक्षवेधी ठरतो. या सरावाच्या पार्श्‍वभूमीवर भारतीय सैन्याने एलएसीच्या क्षेत्रातील तैनाती अधिकच वाढविली आहे. चीनचे लष्कर आकस्मिक कारवाई करू धजावणार नाहीत, इतकी भारतीय सैन्याची तयारी असल्याचे संकेत सातत्याने दिले जात आहेत. एका परदेशी वृत्तसंस्थेला भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती दिली.

भारतीय सैन्याने वायुसेनेच्या बरोबरीने लडाखच्या एलएसीवरील आपली सज्जता पूर्णपणे वाढविलेली आहे. केवळ लडाखच्याच नाही, तर चीनबरोबरच्या संपूर्ण एलएसीपर्यंत भारतीय सैन्याने आपली क्षमता वाढविण्यासाठी आवश्‍यक ती पावले उचलली आहेत. आवश्‍यकता भासलीच तर कारवाई करण्याची क्षमता भारतीय सैन्याने विकसित केली आहे, असे भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांनी परदेशी वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीत म्हटले आहे.

दरम्यान, भारतात कोरोनाची पहिली लाट आलेली असताना, चीनने लडाखच्या पँगाँग सरोवर क्षेत्रात भारतीय सैनिकांवर आकस्मिक हल्ला चढविला होता. आता भारतात कोरोनाची दुसरी लाट आलेली असताना, चीन याचा लाभ घेण्याचा प्रयत्न करील, असा संशय माजी लष्करी अधिकारी व सामरिक विश्‍लेषक व्यक्त करीत आहेत. मात्र भारतीय सैन्य कमालीची सावधानता दाखवून चीनच्या घुसखोरीला त्याच भाषेत उत्तर देण्याच्या तयारीत आहे. म्हणूनच केवळ लडाखच नाही तर अरुणाचल प्रदेशपर्यंतच्या एलएसीवर भारतीय सैन्याने आपल्या क्षमतेत वाढ केल्याचा संदेश चीनला देण्यात येत आहे.

leave a reply