कोरोनाच्या वाढत्या बळींच्या मुद्यावर ब्राझिलमध्ये तीव्र निदर्शने

रिओ दि जानिरो – ब्राझिलमध्ये कोरोनाच्या साथीत बळी गेलेल्यांची संख्या पाच लाखांवर गेली आहे. या प्रचंड जीवितहानीसाठी राष्ट्राध्यक्ष जेर बोल्सोनारो व त्यांचे सरकार जबाबदार असल्याचा आरोप करीत ब्राझिलची जनता थेट रस्त्यावर उतरली आहे. शनिवारी देशातील तब्बल २२ प्रांतांसह राजधानी ब्रासिलियामध्ये तीव्र निदर्शने सुरू झाली असून निदर्शकांनी राष्ट्राध्यक्ष बोल्सोनारो यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

कोरोनाच्या वाढत्या बळींच्या मुद्यावर ब्राझिलमध्ये तीव्र निदर्शने२०१९ सालाच्या अखेरीस चीनमधून सुरू झालेल्या कोरोनाच्या साथीने गेल्या दीड वर्षात जगभरात हाहाकार उडविला आहे. जगभरातील २०० हून अधिक देशांमध्ये फैलावलेल्या या साथीची १७ कोटींहून अधिक जणांना लागण झाली असून ३८ लाखांहून अधिक दगावले आहेत. अमेरिकेत सर्वाधिक सहा लाख जणांचा बळी गेला असून त्यापाठोपाठ ब्राझिलचा क्रमांक लागला आहे. ब्राझिलमधील बळींची संख्या पाच लाखांवर गेल्याचे शनिवारी जाहीर करण्यात आले.

इतक्या मोठ्या प्रमाणात गेलेले बळी ब्राझिलमध्ये सरकाविरोधात असलेल्या असंतोषाला अधिकच बळ देणारे ठरले आहेत. राष्ट्राध्यक्ष बोल्सोनारो यांचे विरोधक असणार्‍या डाव्या विचारसरणीच्या पक्षांनी जनतेला रस्त्यावर उतरण्याचे आवाहन केले असून, शनिवारी त्याला प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. देशातील २२ प्रांतांमधील ४०हून अधिक शहरांमध्ये निदर्शने सुरू झाल्याची माहिती स्थानिक यंत्रणा व माध्यमांनी दिली.कोरोनाच्या वाढत्या बळींच्या मुद्यावर ब्राझिलमध्ये तीव्र निदर्शने

यावेळी निदर्शकांकडून ‘५००,०००डेथ्स, इटस् हिज फॉल्ट’, ‘गेट आऊट बोल्सोनारो. गव्हर्मेंट ऑफ हंगर ऍण्ड अनएम्लॉयमेंट’, ‘हाफ ए मिलियन रिझन्स टू आऊस्ट बोल्सोनारो’, ‘गेट आऊट बोल्सोनारो, जिनोसायडल’, अशा घोषणाही देण्यात आल्या. राष्ट्राध्यक्ष बोल्सोनारो यांनी साथ पुरेशा गांभीर्याने घेतली नाही आणि मास्क व सोशल डिस्टंसिंगसारख्या उपायांची खिल्ली उडविली, असे आरोप निदर्शकांकडून करण्यात आले. राष्ट्राध्यक्षांनी घेतलेल्या निर्णयांमुळेच ब्राझिलला इतक्या मोठ्या प्रमाणात जीवितहानी सोसावी लागल्याचे दावेही करण्यात आले आहेत.

ब्राझिलमध्ये कोरोनाची तिसरी लाट सुरू असून, येत्या काही महिन्यात बळींची संख्या आठ लाखांपर्यंत वाढू शकते, असा गंभीर इशारा आरोग्यतज्ज्ञांनी दिला आहे. त्यामुळे राष्ट्राध्यक्ष बोल्सोनारो यांच्यासमोरील आव्हाने अधिकच वाढतील, असे संकेत विश्‍लेषकांनी दिले आहेत.

leave a reply