संसद व सर्वोच्च न्यायालयावर झालेल्या हल्ल्यांनंतर ब्राझिलच्या राष्ट्राध्यक्षांकडून राजधानी ब्रासिलियात आणीबाणीची घोषणा

आणीबाणीची घोषणाब्रासिलिया – ब्राझिलचे राष्ट्राध्यक्ष लुला डा सिल्वा यांनी राजधानी ब्रासिलियामध्ये आणीबाणीची घोषणा केली आहे. रविवारी ब्राझिलचे माजी राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो यांच्या हजारो समर्थकांनी राजधानी ब्रासिलियातील संसद, सर्वोच्च न्यायालय व राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानावर हल्लाबोल करून प्रचंड नासधूस केली. या हिंसक घटनाक्रमानंतर देशभरात तणावाचे वातावरण असून पुढील अनुचित घटना टाळण्यासाठी आणीबाणी जाहीर करण्यात येत असल्याचे राष्ट्राध्यक्ष सिल्वा यांनी स्पष्ट केले. ब्राझिलमधील या हिंसक घटनाक्रमाची तुलना दोन वर्षांपूर्वी अमेरिकी संसदेवर झालेल्या हल्ल्याशी करण्यात येत आहे. जगभरातील आघाडीच्या नेत्यांनी याची निर्भत्सना केली असून हा ब्राझिलच्या लोकशाहीवरील हल्ला असल्याचे टीकास्त्र सोडले आहे.

ब्राझिलमध्ये ऑक्टोबर महिन्यात झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डाव्या विचारसरणीचे नेते लुला डा सिल्वा यांनी माजी राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो यांचा पराभव केला होता. दोन्ही उमेदवारांच्या मतांमध्ये जेमतेम एक टक्क्याचे अंतर होते. उजव्या विचारसणीचे नेते असणाऱ्या बोल्सोनारो यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी हा निकाल उघडपणे स्वीकारण्यास नकार दिला होता. बोल्सोनारो यांनी राष्ट्राध्यक्षपद सोडले असले तरी अधिकृतरित्या सिल्वा यांना सत्ता हस्तांतरित करण्याचे टाळले होते. त्यांच्या समर्थकांकडून राजधानी ब्रासिलियासह देशाच्या विविध भागांमध्ये निदर्शनेही सुरू झाली होती. ब्राझिलच्या लष्कराने हस्तक्षेप करून सिल्वा यांची राजवट उलथवून टाकावी, अशी आक्रमक मागणीही समर्थकांकडून करण्यात येत होती.

आणीबाणीची घोषणागेल्या आठवड्यात सिल्वा यांचा शपथविधी झाल्यानंतर या मागणीला अधिकच जोर आला होता. शपथविधीनंतर राष्ट्राध्यक्ष सिल्वा साओ पावलोच्या दौऱ्यावर गेले. या घटनेचे निमित्त करून बोल्सोनारो यांचे हजारो समर्थक देशाच्या विविध भागांमधून रविवारी राजधानी ब्रासिलियात दाखल झाले. राजधानीतील लष्करी मुख्यालयापासून या समर्थकांनी भव्य मोर्चा काढला. संसद व सर्वोच्च न्यायालयाजवळील चौकात आल्यानंतर मोर्च्यातील निदर्शकांनी आक्रमक घोषणा देण्यास सुरुवात केली. शेकडो समर्थक तैनात सुरक्षादलांचे कडे तोडून संसद, सर्वोच्च न्यायालय व राष्ट्राध्यक्ष निवासस्थानाच्या परिसरात घुसले.

आणीबाणीची घोषणासुरक्षायंत्रणांना न जुमानता हिंसक निदर्शकांनी मोठ्या प्रमाणात तोडफोड सुरू केली. राष्ट्राध्यक्ष निवासस्थानाच्या काचा फोडण्यात आल्या. संसदेतील खुर्च्या तसेच कलाकृतींची मोठ्या प्रमाणात नासधूस करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या कार्यालयात घुसून फर्निचर व इतर गोष्टींची फेकाफेक करण्याचा प्रयत्नही झाला. संसदेच्या छतावर जाऊन लष्कराने हस्तक्षेप करावा, असे लिहिलेले फलकही झळकाविण्यात आले. हा प्रकार सुरू असतानाच अतिरिक्त सुरक्षादलांचे जवान इथे दाखल झाले. लाठीमार तसेच अश्रुधुराचा वापर करून त्यांनी निदर्शकांना संसदेबाहेर काढले. कारवाईदरम्यान जवळपास 400हून अधिक निदर्शकांना अटक करण्यात आली.

आणीबाणीची घोषणारविवारी रात्रीपर्यंत कारवाई सुरू होती. त्यानंतर साओ पावलोचा दौरा अर्धवट सोडून माघारी परतलेल्या राष्ट्राध्यक्ष सिल्वा यांनी संबंधित परिसराला भेट दिली. यावेळी त्यांनी या संपूर्ण प्रकरणामागे माजी राष्ट्राध्यक्ष बोल्सोनारो यांची चिथावणीच कारणीभूत असल्याचा आरोप करून त्यांनी कायदेशीर कारवाईसाठी तयार रहावे, असा इशारा दिला. ब्राझिलच्या सर्वोच्च न्यायालयाने घटनेची गंभीर दखल घेतली असून ब्रासिलियाचे गव्हर्नर इबेनिस रोका यांना निलंबित करण्यात आले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणातील हिंसा स्थानिक सहकार्याशिवाय होऊ शकत नाही, असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

संपूर्ण परिसरात लष्करासह अतिरिक्त सुरक्षायंत्रणा तैनात करण्यात आल्या असून परिसर सील करण्यात आला आहे. ब्राझिलमधील या घटनेवर जगभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून अमेरिका, युरोपिय देश, रशिया, भारत व चीनने नाराजी व्यक्त केली आहे. रविवारी ब्राझिलमध्ये झालेली हिंसा हा लोकशाहीवरील हल्ला असल्याचे टीकास्त्र आंतरराष्ट्रीय समुदायाने सोडले आहे.

जगातील प्रमुख वृत्तसंस्थांनी या हिंसाचाराची तुलना 6 जानेवारी 2021 रोजी अमेरिकी संसदेवर झालेल्या हल्ल्याशी केली आहे. ब्राझिलच्या निदर्शकांनी त्यापासून प्रेरणा घेतली असावी, असा ठपका ठेवण्यात येत आहे.

हिंदी

leave a reply