जर्मनीमध्ये रासायनिक हल्ल्याचा कट उधळला

- दोन इराणवंशियांना अटक

रासायनिकबर्लिन – सायनाईड आणि रिसीन या विषारी रसायनांचा वापर करून जर्मनीमध्ये मोठा दहशतवादी हल्ला घडविण्याचा कट जर्मनीच्या सुरक्षा यंत्रणांनी उधळला. याप्रकरणी दोन इराणवंशियांना ताब्यात घेतल्याची माहिती जर्मन यंत्रणांनी दिली. अमेरिकेच्या गुप्तचर विभागाने दिलेल्या माहितीच्या आधारावर जर्मन यंत्रणांनी ही कारवाई केली.

जर्मनीच्या वायव्येकडील डॉर्टमंड प्रांतातील कॅस्ट्रोप-रॉशेल शहरात शनिवारी मध्यरात्री सुरक्षा यंत्रणांनी केलेल्या कारवाईत दोन भावांना ताब्यात घेतले. कट्टरवादी विचारसरणीने प्रभावित झालेले दोन्ही इराणवंशिय जर्मनीत मोठा घातपात घडविण्याच्या तयारीत होते, अशी माहिती जर्मन यंत्रणांनी दिली. सायनाईड आणि रिसीन यांचा वापर करून विषप्रयोग किंवा त्याहून भयंकर रासायनिक हल्ला घडविण्याचा कट त्यांनी आखला होता, असे जर्मन यंत्रणांचे म्हणणे आहे.

अटक केलेल्यांपैकी एकाने याची कबुली दिली. संबंधिताच्या घरातून सायनाईड आणि रिसीनचा साठा सापडला असून त्यानंतर जर्मन यंत्रणांनी शहरातील दोन गॅरेजची झडती घेतली आहे. प्राणघाती हल्ले चढविण्याचा कट रचल्याप्रकरणी दोन्ही भावांना किंवा यातील मुख्य आरोपीला तीन ते 15 वर्षांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते. जर्मन सुरक्षा यंत्रणांनी दोन्ही आरोपींच्या नावांबाबत गोपनीयता राखली आहे.

रासायनिकगेल्या काही वर्षांपासून जर्मनी दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असल्याची प्रकरणी उघड झाली आहे. 2016 साली ख्रिस्तधर्मियांच्या पवित्र सणाच्या काळात राजधानी बर्लिनमध्ये ‘आयएस’च्या दहशतवाद्याने घडविलेल्या ट्रक हल्ल्यात 12 जणांचा बळी गेला होता. यात 10 हून अधिक जण जखमी झाले होते. तुर्कीमार्गे आखातातून युरोपमार्गे दाखल झालेल्या निर्वासितांच्या घोळक्यातून दहशतवाद्यांनी घुसखोरी केल्याचा इशारा पाश्चिमात्य यंत्रणांनी दिला होता. पण जर्मनीने याकडे दुर्लक्ष केले होते.

जर्मनीमध्ये रासायनिक हल्ल्यांचा कट रचल्याचे हे दुसरे प्रकरण ठरते. पाच वर्षांपूर्वी आयएस या दहशतवादी संघटनेच्या प्रभावाखाली असलेल्या ट्युनिशियन दांपत्याने जर्मनीमध्ये रिसीनचा वापर करून हल्ल्याचा कट आखला होता. पण जर्मन पोलिसांनी वेळीच या दोघांना अटक केली. रिसीन हे अतिशय विषारी रसायन म्हणून ओळखले जाते. एरंडाच्या बियांपासून बनणाऱ्या तेलाचा वापर असलेले हे रसायन शरीरात गेल्यावर सदर व्यक्तीचा तडफडून मृत्यू होऊ शकतो. जर्मनीमध्ये रिसीनची खरेदी सोपी असल्यामुळे दहशतवादी अशा हल्ल्यांचा कट आखत असल्याचा दावा केला जातो.

याआधी इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सनी जर्मनीप्रमाणे फ्रान्स, बेल्जिअम या युरोपिय देशांमध्ये दहशतवादी हल्ल्याची कारस्थाने आखल्याचे उघड झाले होते. याप्रकरणी युरोपिय देशांनी रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सवर गंभीर गुन्हे दाखल करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली होती. मात्र इराणने आपल्या प्रमुख सुरक्षा यंत्रणेवरील हे आरोप फेटाळले होते. दरम्यान, ब्रिटनने इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सला दहशतवादी संघटना घोषित करण्याची तयारी केली आहे. अशावेळी जर्मनीतून इराणवंशियांना रासायनिक हल्ल्याप्रकरणी झालेली अटक लक्ष वेधून घेणारी ठरते.

English हिंदी

leave a reply