ब्रिटनने पाकिस्तानला धोकादायक देशांच्या यादीत टाकले

धोकादायकलंडन/इस्लामाबाद – दहशतवाद्यांना निधी पुरविणे व निधीचे अवैध हस्तांतरण करणार्‍या २१ देशाची यादी प्रसिद्ध करून ब्रिटनने या धोकादायक देशांच्या यादीत पाकिस्तानचा समावेश केला आहे. याच्या काही दिवस आधी ब्रिटनने आपल्या देशातील कोरोनाची साथ रोखण्यासाठी ‘रेड लिस्ट’ जारी केली होती. यात पाकिस्तानातून ब्रिटनमध्ये येणार्‍यांवर निर्बंध टाकले होते. या दोन्ही गोष्टी म्हणजे पाकिस्तानला बसलेला फार मोठा धक्का असल्याचे मानले जाते. यामुळे पाकिस्तानचा कुणीही सन्मान करीत नाही, ही बाब पुन्हा एकदा समोर आल्याचा आरडाओरडा पाकिस्तानमध्ये सुरू झाल आहे.

Advertisement

उत्तर कोरिया, इराण या देशांबरोबर बोटस्वाना, सेनेगल, झिंबाब्वे, निकारागुआ या २१ धोकादायक देशांच्या यादीतील पाकिस्तानचा समावेश करून ब्रिटनने कठोर निर्णय घेतला आहे. दरवर्षी ब्रिटनमध्ये जाणार्‍या पाकिस्तानी नागरिकांची संख्या मोठी आहे. तसेच पाकिस्तान बर्‍याच कारणांसाठी ब्रिटनवर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत ब्रिटनकडून घेण्यात आलेला हा निर्णय पाकिस्तानसाठी धक्कादायक ठरतो. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झईद हफीज चौधरी यांनी ब्रिटनचा हा निर्णय राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा ठपका ठेवला.

हा निर्णय घेण्यामागे कुठल्याही स्वरुपाचे पुरावे नसून केवळ राजकीय हेतूने हे निर्णय घेण्यात आल्याचे चौधरी यांनी म्हटले आहे. तर ब्रिटनने मात्र हा निर्णय अर्थव्यवहारात पारदर्शकता न बाळणार्‍या देशांबाबत असा निर्णय घेणे भाग होते, असे सांगून आपल्या निर्णयाचे समर्थन केले आहे. सध्या पाकिस्तान ‘एफएटीएफ’ अर्थात फायनॅन्शिअल ऍक्शन टास्क फोर्सच्या ग्रे लिस्टमधून बाहेर पडण्यासाठी धडपडत आहे. अशा परिस्थितीत ब्रिटनने पाकिस्तानला ब्लॅक लिस्ट केल्याचा दावा पाकिस्तानची माध्यमे करीत आहेत.

leave a reply