ब्रिटन, युरोपिय महासंघ तालिबानशी सहकार्य करणार

- पण तालिबानला मान्यता देण्याचा निर्णय नाही

तालिबानला मान्यताइस्लामाबाद/ब्रडो – ‘अफगाणी जनतेला सहाय्य पुरविण्यासाठी या देशातील राजवटीला सहकार्य करू. पण याचा अर्थ तालिबानला मान्यता दिली, असा होत नाही. ही फक्त मर्यादित काळासाठी केलेली तरतूद आहे’, असे युरोपिय महासंघाने म्हटले आहे. पाकिस्तानच्या दौऱ्यावर असलेले ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री डॉमिनिक राब यांनी देखील तालिबानच्या सरकारबरोबरचे सध्याचे सहकार्य मर्यादित असेल, असे संकेत दिले.

तालिबानने काबुलचा ताबा घेतल्यापासून आंतरराष्ट्रीय समुदायाने अफगाणिस्तानसाठीचे सहाय्य व निधी रोखला आहे. याचा थेट परिणाम अफगाणी जनतेवर होत असल्याचा दावा केला जातो. अफगाणिस्तानच्या जनतेला महिनाभर पुरेल, इतकाच धान्यसाठा असल्याचा इशारा संयुक्त राष्ट्रसंघाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने काही तासांपूर्वीच दिला. तसेच अफगाणिस्तान चालविण्यासाठी तालिबानकडे पुरेसा निधी नाही, हे ही स्पष्ट झाले आहे.

तालिबानला मान्यता

या पार्श्‍वभूमीवर, युरोपिय महासंघाच्या परराष्ट्र धोरणाचे प्रमुख जोसेफ बॉरेल तर ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री डॉमनिक राब यांनी तालिबानच्या राजवटीबरोबर सहकार्य करावे लागेल, असे स्पष्ट केले. हे सहकार्य अफगाणी जनतेसाठी आहे, याचा अर्थ तालिबानच्या राजवटीला मान्यता देत आहे, असा काढता येणार नाही, हे दोन्ही नेत्यांनी स्पष्ट केले. जगाने तालिबानची राजवट मान्य करावी, अशी मागणी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री कुरेशी यांनी केली होती. ब्रिटनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी कुरेशी यांच्यासमोरच आपल्या देशाची भूमिका परखडपणे नेमक्या शब्दात मांडली.

leave a reply