जुलैच्या अखेरीस पाकिस्तानातील कोरोनाग्रस्तांची संख्या १२ लाखांवर जाईल

इस्लामाबाद – पाकिस्तानातील कोरोनाव्हायरसच्या बळींची संख्या २,६४७ वर पोहोचली असून या साथीच्या रुग्णांची संख्या दीड लाखांवर पोहोचली आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान शहीद खाकान अब्बासी यांच्यापासून आता माजी पंतप्रधान युसुफ रझा गिलानी यांनाही कोरोनाव्हायरसची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच माजी क्रिकेटपटू शहीद आफ्रिदी देखील कोरोनाने बाधित झाला आहे. जुलैच्या अखेरीस पाकिस्तानातील कोरोनाग्रस्तांची संख्या १२ लाखांवर जाईल, असा इशारा या देशाचे नियोजन आणि विकासविभागाचे मंत्री अस्सद उमर यांनी दिला आहे. या आधी पंतप्रधान इम्रान खान यांच्यासह अस्सद उमर यांनी देखील पाकिस्तानी जनतेला कोरोनाने घाबरण्याची गरज नसल्याचे दावे ठोकले होते.

Corona-Pakistanदोनच दिवसांपूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारतातील कोरोनाच्या साथीवर चिंता व्यक्त करुन भारतासमोर मदतीचा प्रस्ताव ठेवला होता. भारतीयांनी त्याची खिल्ली उडविली होती. तर भारताच्या परराष्ट्रमंत्रालयाने इम्रान खान यांना पाकिस्तानात करण्यासारखे बरेच काही आहे, याची जाणीव करुन दिली होती. पण आता पाकिस्तानातील कोरोनाच्या साथीने भयंकर स्वरुप धारण करण्यास सुरुवात केली असून या साथीचे एक लाख ४३ हजाराहून अधिक रुग्ण पाकिस्तानात असल्याचे सांगितले जाते. तर या साथीत बळी गेलेल्यांची संख्या २,६४७ वर गेलेली आहे. पाकिस्तानात वैद्यकीय सुविधा पुरेशा प्रमाणात नाहीत. सर्वात विकसित असलेल्या अमेरिका व युरोपिय देशांचा आरोग्य यंत्रणेचा बोजवारा उडालेला आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तान कोरोनाचे बळी व रुग्णांची संख्या याबाबत जाहीर करीत असलेले आकडे विश्वासार्ह नाहीत, असे खुद्द पाकिस्तानची माध्यमेच म्हणू लागली आहेत.

मे महिन्याच्या मध्यापर्यंत पाकिस्तानच्या लाहोर शहरामध्ये कोरोनाचे सहा लाख ७०हजार रुग्ण असल्याचा दावा एका अहवालात करण्यात आला होता. पण आता ही रुग्णसंख्या १४ लाखांच्या ही पुढे गेलेली असू शकते, असा भितीदायक दावा एका पत्रकाराने केला आहे. तसेच पाकिस्तान मोठ्या प्रमाणावर लपवाछपवी करीत असल्याचे आरोप सुरु झाले आहेत. सुरुवातीच्या काळात पाकिस्तानी जनतेने कोरोनाला घाबरुन न जाण्याचे दावे पंतप्रधान इम्रान खान यांनी केले होते. तसेच आर्थिक नियोजन व विकास मंत्रालयाची जबाबदारी असलेल्या अस्सद उमर यांनी त्याला दुजोरा दिला होता व पाकिस्तानला लॉकडाऊनची गरज नसल्याचे म्हटले होते. त्यामुळे त्यांच्या या बेपर्वाईचा जबरदस्त फटका बसला असून या देशात कोरोनाचा उद्रेक झाल्याचे पहायला मिळत आहे. आता अस्सद उमर यांनीच जुलैच्या अखेरीस पाकिस्तानातील कोरोनाग्रस्तांची संख्या बारा लाखांवर जाईल, असा इशारा दिला आहे. पाकिस्तानच्या संसदेचे सुमारे जवळपास १०० सदस्य कोरोनाव्हायरसने ग्रासलेले आहेत. पाकिस्तानचे दोन माजी पंतप्रधान शहीद खाकान अब्बासी आणि युसुफ रझा गिलानी यांंनाही कोरोनाची लागण झाली आहे. माजी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदी याला देखील कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. पाकिस्तानच्या मंत्रीमंडळातील एका सदस्याने राजकीय वर्तुळात याहून अधिक प्रमाणात कोरोनाचे रुग्ण असल्याचे म्हटले आहे. काही काळांपूर्वी पाकिस्तानी लष्कराच्या अधिकांऱ्यामध्येही कोरोना पसरल्याच्या बातम्या आल्या होत्या. यामुळे कोरोनाव्हायरसची साथ पाकिस्तानला पोखरत असल्याचे स्पष्ट होत आहे.

leave a reply