‘मान्सून’ने महाराष्ट्र व्यापला – कोकण आणि मध्य महाराष्ट्रात धुवांधार पावसाचा अंदाज

मुंबई – एक जूनला केरळात दाखल झालेल्या मान्सूनने महाराष्ट्रात व्यापल्याचे दिसत आहे. पुढील दोन दिवस मान्सूनची आगेकूच अशीच सुरु राहणार असून कोकणासह मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे. राज्यात मान्सून दाखल झाल्यानंतर अनेक भागांमध्ये शेतीच्या कामांना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे.

'मान्सून', महाराष्ट्र, कोकण, मध्य महाराष्ट्र

सुमारे सहा दिवस मॉन्सून कर्नाटकात मुक्काम ठोकून होता. गुरुवारी पावसाने एका दिवसात गोवा, सिंधुदुर्गपर्यंतचा प्रवास पूर्ण केला. निसर्ग चक्रीवादळानंतर मॉन्सूनला पुढील प्रवास करण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. गुरुवारपासून पावसाची टप्प्याटप्प्याने वाटचाल सुरू आहे. रत्नागिरी, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि उस्मानाबाद जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले आहे.

रविवारी मुंबई, पुण्यासह उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि कोकणाच्या उर्वरित भागापर्यंत मान्सून पोचल्याचे आयएमडीने जाहीर केले. पुढील चार दिवस कोकणात तर पुढील दोन दिवस मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाडा आणि विदर्भातही सोमवारपर्यंत पावसाचा जोर राहणार असून, त्यानंतर तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळतील,असे हवामान खात्याने आपल्या अंदाजात म्हटले आहे.

दुसरीकडे शनिवारी रात्री नाशिकमध्ये पावसाने जोर धरल्याने सखल भागांमध्ये पाणी साचले. पहिल्याच मुसळधार पावसात अनेक घरात पाणी शिरले होते.

अरबी समुद्राबरोबरच बंगालच्या उपसागरातील मान्सूनची दमदार वाटचाल सुरू आहे. तेथे तयार झालेला कमी दाबाचा पट्टा देशाच्या इतर भागात मान्सूनच्या वाटचालीस पोषक ठरत आहे. नागालॅंड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा ही राज्ये संपूर्णपणे मान्सूनने व्यापली असून अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालयाच्या काही भागात मान्सून दाखल झाल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. या वर्षी जून ते सप्टेंबर या मान्सून काळात सरासरीच्या १०२ टक्के पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.

leave a reply