हमासच्या ताब्यातील इस्रायलींच्या सुटकेशिवाय गाझातील संघर्षबंदी टिकणार नाही

- इजिप्तबरोबरच्या बैठकीत इस्रायलची ठाम भूमिका

कैरो/जेरूसलेम – गाझापट्टीत दिर्घकाळासाठी संघर्षबंदी लागू करून गाझाचे पुनर्वसन सुरू करायचे असेल, तर हमासने अपहरण केलेल्या इस्रायलींची सुटका करावी, असा इशारा इस्रायलने दिला. रविवारी इजिप्त आणि इस्रायलमध्ये पार पडलेल्या दोन वेगवेगळ्या बैठकींमध्ये इस्रायली नेत्यांनी ही मागणी केली. पण हमास इस्रायलची मागणी मान्य करण्यास तयार नाही. त्यामुळे इस्रायल आणि हमासमधील संघर्षबंदी फार काळ टिकणार नसल्याचे संकेत मिळत आहेत.

हमासच्या ताब्यातील इस्रायलींच्या सुटकेशिवाय गाझातील संघर्षबंदी टिकणार नाही - इजिप्तबरोबरच्या बैठकीत इस्रायलची ठाम भूमिकाइस्रायलचे परराष्ट्रमंत्री गाबी अश्केनाझी यांनी रविवारी इजिप्तचा दौरा करून पराष्ट्रमंत्री सामेह शौर्की यांची भेट घेतली. 13 वर्षानंतर इस्रायलच्या परराष्ट्रमंत्र्यांनी इजिप्तचा दौरा करणार्‍याची ही पहिलीच वेळ होती. त्याचवेळी इजिप्तच्या गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख अब्बास कामेल यांनी तेल अविव येथे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मिर बेन-शबात यांची भेट घेऊन चर्चा केली. इस्रायल आणि हमासमध्ये लागू झालेली संघर्षबंदी यापुढे कायम ठेवणे, गाझाचे पुनर्वसनच्या मुद्यांवर दोन्ही बैठका आयोजित करण्यात आल्या होत्या.

पण इस्रायलने या दोन्ही बैठकांमध्ये आपली मागणी मांडली. 2014 साली हमासच्या दहशतवाद्यांनी चार इस्रायलींचे अपहरण केले होते. यामध्ये दोन जखमी जवान आणि दोन नागरिकांचा समावेश होता. यापैकी जखमी जवानांचा बळी गेला असून त्यांचे मृतदेह आणि हमासचे बंधक असलेल्या इस्रायली नागरिकांना सुपूर्द करावे, अशी मागणी इस्रायलने केली आहे. आपली मागणी मान्य केल्याशिवाय हमासबरोबरची संघर्षबंदी दिर्घकाळासाठी टिकेल, याची हमी देता येणार नसल्याचे इस्रायलने स्पष्ट केले. त्याचबरोबर गाझातील पुनर्वसन देखील सुरू होऊ शकणार नसल्याची जाणीव इस्रायलने मध्यस्थीची भूमिका बजावणार्‍या इजिप्तला करून दिली.हमासच्या ताब्यातील इस्रायलींच्या सुटकेशिवाय गाझातील संघर्षबंदी टिकणार नाही - इजिप्तबरोबरच्या बैठकीत इस्रायलची ठाम भूमिका

इस्रायलचा हा संदेश घेऊन इजिप्तच्या गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख अब्बास कामेल यांनी वेस्ट बँकमधील पॅलेस्टाईनच्या हमास व त्यानंतर फताह, या दोन्ही संघटनांच्या नेत्यांची भेट घेतली. इस्रायलबरोबर 11 दिवसांचा संघर्ष करणार्‍या हमास या दहशतवादी संघटनेने इस्रायलची ही मागणी धुडकावली. इस्रायलच्या ब्लॅकमेलिंगपुढे नमते घेणार नसल्याचे सांगून हमासने आपण इस्रायलविरोधात नव्या संघर्षासाठी तयार असल्याची धमकी दिली. तर इस्रायलने गाझातील पॅलेस्टिनींसाठी पुरविली जाणारी मदत रोखू नये, असे आवाहन फताहच्या नेत्यांनी केले आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यातच इस्रायलने गाझाच्या सीमा खुल्या केल्या व यानंतर मानवी सहाय्य पॅलेस्टिनींपर्यंत पोहोचू लागले होते.

leave a reply