कोरोनाच्या तिसर्‍या लाटेबाबत केंद्राचा इशारा

- सात राज्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढली

नवी दिल्ली – देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या मंगळवारच्या सकाळपर्यंतच्या चोवीस तासात 29 हजार 689 इतकी नोंदविण्यात आली. सुमारे साडे तीन महिन्यानंतर प्रथमच कोरोनाच्या रुग्णांच्या नव्या रुग्णांची चोवीस तासातील संख्या 30 हजारांच्या खाली नोंदविण्यात आली. मात्र असे असले तरी काही राज्यांमधून आलेल्या आकडेवारीतून चिंता वाढल्या आहेत. सात राज्यांमध्ये रुग्णसंख्येमध्ये वाढ नोंदविण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक रुग्ण केरळात वाढले आहेत. मंगळवारच्या दिवसभरात केरळात कोरोनाचे 22 हजार 129 नवे रुग्ण आढळले. कोरोनाच्या तिसर्‍या लाटेला थोपविण्यासाठी राज्यांना दक्षता घेण्यास सांगण्यात आले आहे. कोरोना अजूनही आहे, याची जाणीव केंद्र सरकारने करून दिली.

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेबाबत केंद्राचा इशारा - सात राज्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढलीकोरोना रुग्णांच्या घटलेल्या संख्येने दिलासा दिला असला, तरी काही राज्यांमध्ये कोरोना रुग्णांच्या वाढलेल्या संख्येने चिंता वाढविल्या आहेत. देशाचा दैनंदिन पॉझिटिव्ह दर घटून 1.73 टक्के इतका खाली आला आहे. सध्या देशात 3 लाख 98 हजार इतके कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. त्याचवेळी रुग्ण बरे होण्याचा दर वाढून 97.39 टक्क्यांवर गेला आहे. पण केरळात हा पॉझिटिव्ह दर 12 टक्क्यांच्याही पुढे गेला असून सर्वाधिक अ‍ॅक्टीव्ह रुग्ण केरळात आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार देशात 7 राज्यातील 22 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे लक्षात आले आहेत. यातील केरळातील 7 जिल्ह्यांचा समावेश आहे. याशिवाय मणिपूरमधील पाच, मेघालयातील तीन जिल्ह्यांमध्ये रुग्णवाढ दिसून आली आहे. गेल्या चार आठवड्यापासून इथे रुग्णांमध्ये वाढ दिसून येत असल्याने ही चिंतेची बाब ठरते, असे अग्रवाल म्हणाले. तसेच अजूनही देशातील 12 राज्यांमधील 54 जिल्ह्यांमध्ये अजूनही 10 टक्क्यांच्या पुढे आहे, असेही अग्रवाल यांनी अधोरेखित केले. तुम्ही दमला असाल, मात्र कोरोना दमलेला नाही, अशा शब्दात त्यांनी तिसर्‍या लाटेबाबत इशारा दिला.

कोरोनाची नवी लाट रोखण्यासाठी शिस्तीचे पालन करणे महत्त्वाचे आहे. तसेच लसीकरणही महत्त्वाचे आहे. जुलै अखेरीपर्यंत 50 लाख लसीचे डोस देण्याचे लक्ष ठेवण्यात आले होते. मात्र ते पूर्ण होताना दिसत नाही. राज्यांकडे अजून अजून 2.28 कोटी लसी उपलब्ध आहेत. ज्याचा वापर झालेला नाही. आतापर्यंत राज्यांना 45.73 कोटी डोस पुरविण्यात आले आहेत. यातील 43 कोटीहून अधिक डोस लागले आहेत.

दरम्यान, झायडस कॅडिला आणि कोव्हॅक्सिन या दोन लसी लहान मुलांच्या लसीकरणासाठी लवकरच उपलब्ध होतील, अशी शक्यता आहे. एका बैठकीत बोलताना केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी ऑगस्टमध्येच या लसी लसीकरणासाठी उपलब्ध होतील असे म्हटल्याचे वृत्त आहे. तिसर्‍या लाटेचा परिणाम लहान मुलांवर जास्त होईल अशी भीती आहे. या पार्श्‍वभूमीवर ही माहिती महत्त्वाची ठरते.

leave a reply