अतिवृष्टीतील बळींची संख्या 207 वर

- केंद्र सरकारकडून पुरग्रस्त शेतकर्‍यांसाठी 700 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर

मुंबई/नवी दिल्ली – महाराष्ट्रातील अतिवृष्टीमध्ये गेलेल्या बळींची संख्या वाढून 207 वर पोहोचली आहे. तसेच या आपत्तीत आतापर्यंत 29 हजार पाळीव प्राणी व गुरांचाही मृत्यू झाला आहे. अद्यापही काही जण बेपत्ता असून त्यामुळे बळींची संख्या आणखी वाढण्याची भिती आहे. सुदैवाने सांगली जिल्ह्यातील पुरपातळी मंगळवारी आणखी कमी झाली. तर कोल्हापूर, सातार्‍यातील पुरग्रस्त भागात हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत आहे. मात्र पुराच्या पाण्यात वाहून गेलेले रस्ते, शेती, घरे व दुकानांचे झालेले अतोनात नुकसान यातून सर्व घडी पुन्हा बसविणे मोठे आव्हान ठरणार आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्रातील पुरग्रस्त शेतकर्‍यांसाठी तातडीची 700 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. केंद्रीय कृषीमंत्र्यांनी याबाबतची घोषणा केली.

अतिवृष्टीतील बळींची संख्या 207 वर - केंद्र सरकारकडून पुरग्रस्त शेतकर्‍यांसाठी 700 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीरराज्यात अतिवृष्टीनंतर पुरपरिस्थिती सुधारली आहे. मात्र झालेली हानी इतक्या लवकर भरून निघणारी नाही. पूरग्रस्त भागातील शेतकरी, व्यापार्‍यांचे अतोनात नुकसान झाले आहे. तसेच अजूनही काही भागात पाणी व वीजपुरवठा खंडित आहे. सामान्य नागरिकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. कित्येक घरात सर्व चिजवस्तू खराब झाल्या आहेत किंवा वाहून गेल्या आहेत. काही जणांकडे अंगावर नेसलेल्या कपड्याव्यतिरिक्त काहीही राहिलेले नाही. अशा भीषण स्थितीत अजूनही अतिवृष्टीचा व पुराचा धोका सतावत आहे. कारण घाटमाथ्यावर जोरदार अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामानखात्याने वर्तविली आहे. त्यामुळे नद्यांच्या पातळीत पुन्हा वाढ होण्याचा धोका आहे.

कोल्हापूरात पुरामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना हाती घेण्यात येणार आहेत. कोल्हापूरला दोन वर्षात दुसर्‍यांदा महापुराचा फटका बसला आहे. यापुढे अशी परिस्थिती ओढावू नये यासाठी समिती स्थापून अभ्यास करण्यात येईल व त्याप्रमाणे उपाययोजना हाती घेतल्या जातील, अशी घोषणा राज्य सरकारने केली आहे. तसेच लवकरच राज्य सरकार पुरग्रस्तांसाठी मदत जाहीर करेल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. केंद्र सरकारनेही सध्या पुरग्रस्त शेतकर्‍यांसाठी पॅकेजची घोषणा केली आहे. महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे उस्मानाबाद, परभणीतही शेती व बागायतीचे मोठे नुकसान झाले आहे. यासंदर्भातील विस्तृत अहवाल प्राप्त झाला आहे. त्याआधारावर तत्काळ पूरग्रस्त शेतकर्‍यांसाठी 700 कोटी रुपये जाहीर करण्यात येत असल्याचे केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी संसदेत सांगितले.

दरम्यान, महाराष्ट्रातील अतिवृष्टीत गेलेल्या बळींची संख्या 207 वर पोहोचली आहे. रायगडातील मृतांची संख्या वाढून 95 झाली आहे. त्यानंतर सातार्‍यामध्ये 45 बळी गेले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात 35 जणांचा मृत्यू झाला आहे. तर आणखी 51 गंभीर जखमींवर विविध खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जूनपासून आतापर्यंत महाराष्ट्रात पावसामुळे 294 जणांचा बळी गेला आहे. महाराष्ट्रात बचावकार्यादरम्यान 3 लाख 75 हजार जणांना वाचवून सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. यापैकी दोन लाखांहून अधिक जण सांगलीमधील आहेत.

leave a reply