केंद्र सरकार औद्योगिक प्रकल्पांजवळ अस्थायी कोविड रुग्णालयांची उभारणी करणार

- १० हजारांहून अधिक ऑक्सिजन बेड उभारण्याची योजना

नवी दिल्ली – ऑक्सिजन निर्मिती करणार्‍या औद्योगिक प्रकल्पांनजीकच अस्थायी रुग्णालये उभारून कमी वेळेत १० हजाराहून अधिक ऑक्सिजन बेड उपलब्ध करून देणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका उच्चस्तरिय बैठकीत देशातील कोरोनाच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी असलेल्या तयारीचा आढावा घेतला. त्यावेळी या योजनेवरही चर्चा करण्यात आली. कोरोना साथीशी सामना करण्यासाठी अशा प्रकारे ऑक्सिजन बेडच्या सुविधा उपलब्ध कराव्यात यासाठी राज्यांना प्रोत्साहीत करणार आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईतील बीपीसीएलच्या प्रकल्पाशेजारीच एक जम्बो कोविड सेंटर उभारण्यास केेंद्रीय पेट्रोलियममंत्र्यांनी परवानगी दिली होती. बीपीसीएलकडून या कोवीड सेंटरला अखंड ऑक्सिजनचा पुरवठा केला जाणार आहे.

देशात सध्या दिवसाला चार लाखाच्या आसपास नवे रुग्ण आढळत आहेत. या वाढत्या रुग्णसंख्येबरोबर ऑक्सिजनच्या तुटवड्याचे संकटही वाढले आहे. देेशात वैद्यकिय कारणासाठी ऑक्सिजनची मागणी ६० टक्यांनी वाढली आहे. या पार्श्‍वभूमीवर पाहता अनेक बड्या कंपन्या ऑक्सिजन पुरवठ्यासाठी पुढे आल्या आहेत. या कंपन्या शेकडो टन ऑक्सिजन सध्या विविध राज्यांना पुरवित आहेत. पोलाद, तेल शुद्धीकरण, खत कंपन्यांमध्ये औद्योगिक कारणासाठी मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजनचा वापर होता. त्यामुळे या कंपन्यांमध्ये स्वत:चे ऑक्सिजन प्रकल्प असतात. या प्रकल्पांतून या कंपन्या सध्या सरकारांना ऑक्सिजन पुरवित आहेत. यामुळे देशातील ऑक्सिजनचा मोठा तुटवडा भरून काढला जात आहे.

असे ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प असेल्या औद्योगिक कारखान्यांनजीकच अस्थायी कोविड रुग्णालये उभारल्यास ऑक्सिजनची सुविधा असलेल्या बेडची उपलब्धता वाढविता येईल. तसेच ऑक्सिजनच्या पुरविठ्यासाठी लागणारा वेळ वाचेल. हे लक्षात घेऊन केंद्र सरकार अशा औद्योगिक कारखान्यांजवळ १० हजार ऑक्सिजन बेड उभारणार आहे, अशी माहिती पंतप्रधानांच्या आढावा बैठकीनंतर अधिकार्‍याने दिली.

सरकारकडून ऑक्सिजनची निर्मिती करणारे उद्योग शोधून शहर, दाट वस्ती असलेले भाग आणि मागणी केंद्राजवळ असलेल्या उद्योगांची निवड करून या ठिकाणी ऑक्सिजनयुक्त खाटा असलेली तात्पुरती कोरोना सेंटर उभारण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. अशा पाच सुविधा प्रायोगिक तत्त्वावर यापूर्वीच सुरू करण्यात आल्या आहेत. हे प्रकल्प सार्वजनिक क्षेत्र, खाजगी उद्योग आणि केंद्र व राज्य सरकारच्या समन्वयातून सुरू आहेत.

पंतप्रधान मोदी यांनी बैठकीत नायट्रोजन प्रकल्पांचे ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांमध्ये रुपांतर करण्याच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी पंतप्रधानांनी ऑक्सिजनचा उत्पादनासाठी प्रेशर स्विंग ऍड्सॉरप्शन (पीएसए) प्रकल्प सुरू करण्याच्या प्रगतीचा देखील माहिती घेतली. सध्या पीएम केअर, पीएसयू आणि इतर संबंधित विभागाच्या योगदानाद्वारे सुमारे १५०० पीएसए प्रकल्प सुरू आहेत. याबाबत माहिती यावेळी पंतप्रधान मोदी यांना देण्यात आली.

औद्यागिक काराखान्यांजवळ अस्थायी रुग्णालये उभारण्यासाठी १४ उद्योगांची निवड करण्यात आली आहे. तर नायट्रोजन प्रकल्पांचे ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांमध्ये रुपांतर करण्यासाठी ३७ उद्योगाची निवड करण्यात आली आहे. दरम्यान, वैद्याकीय आणि नर्सिंगचा अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांना कोविड सेंटरमध्ये सेवा देण्यासाठी प्रोत्साहीत केले जाणार आहे. तसेच सरकार एमबीबीएसच्या अंतिम वर्षात असलेल्या डॉक्टर्सना कोविड सेंटरमध्ये ड्यूटी लावण्यावर सरकार विचार करीत आहे. कोविड सेंटरमध्ये सेवा देणार्‍या वैद्यकीय आणि नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना सरकारी नोकरीत प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

leave a reply