वादग्रस्त नकाशानंतर नेपाळकडून ‘सिटिझनशिप लॉ’मध्ये बदल

काठमांडू – चीनच्या पाठबळावर कालापानी, लिपूलेखसारखे भारताचे भूभाग आपल्या नकाशात दाखविणाऱ्या नेपाळने आता ‘सिटिझनशिप लॉ’मध्ये बदल करून भारतीयांना चिथावणी देण्याचा प्रयत्न केला आहे. नेपाळने आपल्या ‘सिटिझनशिप लॉ’मध्ये केलेल्या सुधारणेनुसार भारतीय मुलीने नेपाळच्या मुलाशी लग्न केल्यास तिला नेपाळी नागरिकत्व लगेच मिळणार नाही, तर त्यासाठी सात वर्ष वाट पाहावी लागेल. गेल्याच आठवड्यात भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी भारत आणि नेपाळमध्ये रोटी-बेटीचा संबंध असून कोणी कितीही ठरवले तरी हे संबंध तुटणार नाहीत, असे ठासून सांगितले होते. याद्वारे भारत-नेपाळ संबंधात वितुष्ट आणणाऱ्या चीनला त्यांनी इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर नेपाळने आपल्या कायद्यात केलेले हे बदल नेपाळमधील के.पी. शर्मा ओली यांचे सरकार चीनच्या इशाऱ्यावर काम करीत असल्याचे स्पष्ट करतात.

Nepalशनिवारी नेपाळने आपल्या ‘सिटिझनशिप लॉ’मध्ये बदल केले. नेपाळचे गृहमंत्री राम बहादूर थापा यांनी यासंदर्भांत माहिती जाहीर केली. या बदललेल्या कायद्यानुसार भारतीय मुलीचे नेपाळच्या नागरिकांशी लग्न झाल्यास तिला नेपाळी नागरिकत्व मिळण्यासाठी सात वर्ष वाट पाहावी लागेल, असे थापा म्हणाले. भारतातही असा कायदा असल्याचा दाखल त्यांनी यासाठी दिला. मात्र भारतातील कायदा हा नेपाळी नागरिकांसाठी लागू नसल्याचे सांगण्यास नेपाळचे गृहमंत्री थापा सोयीस्कररित्या विसरले.

दहा दिवसांपूर्वी बिहारच्या नेपाळ सीमेवर नेपाळच्या सशस्त्र पोलिसांनी गोळीबार केला होता. यामध्ये एक भारतीय नागरिक ठार झाला होता, तर चार जण जखमी झाले होते. नेपाळी पोलिसांनी भारतीय सीमेत घुसून आपल्याला नेपाळमध्ये खेचत नेल्याचे नेपाळी पोलिसांनी आपल्या ताब्यात एक दिवस ठेवलेल्या शेतकऱ्याने सांगितले होते. नेपाळमधून कोणी नातेवाईक भेटायला येणार असल्याचे हे सर्व सीमेजवळ थांबले होते. त्यावेळी नेपाळ पोलिसांशी त्यांचा वाद झाला होता.

बिहार आणि उत्तरप्रदेशमध्ये नेपाळला लागून असल्येल्या गावांमध्ये भारतीय मुलींचे नेपाळी मुलांशी आणि नेपाळी मुलींचे भारतीय मुलांशी लग्न केली जातात. येथे असे रोटीबेटीचे व्यवहार सामान्य असून भारतीय आणि नेपाळी नागरिक एकमेकांच्या सीमेत सहज ये- जा करतात. मात्र आता सीमेवरील परिस्थिती बदलत असल्याने येथील गावकऱ्यांना चिंतेत टाकले आहे. या पार्श्वभूमीवर नेपाळकडून ‘सिटिझनशिप लॉ’मध्ये बदल करण्यात आला आहे.

दरम्यान, नेपाळच्या एफएम रेडिओनेही भारतविरोधी प्रचार करायला सुरुवात केली आहे. नेपाळला लागून असलेल्या गावांमध्ये नेपाळी एफएम वाहिन्या ऐकू येतात. मात्र या एफएम रेडिओ स्टेशन्समधून गाण्यांच्यामध्येच भारतविरोधी घोषणा ऐकायला येतात. लिपुलेक, कालापानी आमचा भूभाग असल्याची घोषणाबाजी होते, असे उत्तराखंडमधील गावकऱ्यांचे म्हणणे आहे. यानंतर सीमाभागातील गावकऱ्यांनी नेपाळची एफएम चँनेल्स बंद केली आणि याची माहिती भारत सरकारला दिली. अद्याप तरी भारताची यावर काही प्रतिक्रिया आलेली नाही. चीन नेपाळला भारतविरोधी कारवाया करायला भाग पाडत असल्याचा आरोप भारतातून होत आहे.

leave a reply