संरक्षणमंत्र्याकडून लष्कराला सीमासुरक्षेसाठी आवश्यक निर्णय घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य

नवी दिल्ली – चिनी लष्कराचे आक्रमण रोखण्यासाठी आवश्यक ती सारी कारवाई करण्याचे संपूर्ण अधिकार भारतीय लष्कराला मिळालेले आहेत. संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी संरक्षणदलाच्या प्रमुखांबरोबरील बैठकीत याबाबतचे आदेश दिल्याचे वृत्त आहे. त्यामुळे आतापर्यंत आपल्या छातीचे कोट करुन चीनच्या लष्करासमोर अधिक समर्थपणे उभे राहणाऱ्या भारतीय सैनिकाला यापुढे चीनच्या आगळीकीला त्याच भाषेत प्रत्युत्तर देता येऊ शकेल. कित्येक दशकात चीनच्या सीमेवर एकही गोळी झाडण्यात आली नव्हती. पण गलवान व्हॅलीत कर्नल संतोष बाबू यांच्यासह २० जवान शहीद झाल्यानंतर चीनला भारताचा संयम गृहीत धरता येणार नाही, असा सज्जड इशारा याद्वारे देण्यात आला आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी संरक्षणदलप्रमुख जनरल बिपीन रावत, लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे, नौदलप्रमुख अ‍ॅडमिरल करमबीर सिंग आणि वायुसेनाप्रमुख आर.के.एस.भदोरिया यांची भेट घेतली. यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी लडाखच्या परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी राजनाथ सिंग यांनी सीमेच्या संरक्षणासाठी भारतीय लष्कराला आवश्यक ती कारवाई करण्याची मोकळीक दिली. याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठक पर पडल्यानंतर लष्कराला सीमेवरील परिस्थिती हाताळण्यासाठी संपूर्ण अधिकार देण्यात आल्याचे जाहीर केले होते.

RAJNATH-SINGHभारत आणि चीनच्या सीमेवर दोन्ही देशांच्या सैनिकांनी गस्त घालताना गोळीबार न करण्याबाबतचा करार संपन्न झाला होता. दोन्ही देशांचे सैन्य सीमाभागात गस्त घालताना एकमेकांसमोर आली तर संर्घष उद्भवू नये. यासाठी हा करार करण्यात आला होता. पण गेल्या दोन दशकात चीनने या कराराचा गैरफायदा घेऊन भारताच्या सीमेत घुसखोरी सुरु ठेवली होती. पण आता चीनच्या लष्कराला भारतीय सैन्याचा संयम गृहीत धरता येणार नसून चीनच्या आगळीकीला भारताकडून जबरदस्त प्रत्युत्तर दिले जाऊ शकते, असा संदेश चीनला मिळालेला आहे. त्यामुळे लडाखच्या गलवान व्हॅलीसह सिक्कीम, उत्तराखंड ते अरुणाचल प्रदेशपर्यंत भारताच्या भूभागावर दावा सांगणाऱ्या चीनला मोठा धक्का बसला आहे.

गलवान व्हॅलीतील संर्घषानंतर चीनने भारताच्या भूभागावर दावा सांगण्याचे सत्र सुरु ठेवले होते व याद्वारे चीन पुन्हा इथे गस्त घालण्याचा आपला अधिकार प्रस्थापित करु पाहत होता. मात्र यावेळी भारताने स्वीकारलेल्या आक्रमक भूमिकेमुळे या भागात घुसखोरी करताना चीनला भारतीय सैन्याला संर्घषाची तयारी ठेवावी लागेल. सध्या तरी चीनचे लष्कर या संर्घषाला तयार होणार नाही, असे सामरिक विश्लेषकांचे म्हणणे आहे. चीनलगतच्या साऱ्या सीमेवर भारतीय लष्कर व वायुसेनेने केलेली तैनाती पायाभूत सुविधांचा विकास यामुळे पुढच्या काळात चीनला भारताच्या कुरापती काढणे अवघड जाईल.

leave a reply