बस्तरमध्ये माओवाद्यांच्या विरोधात छत्तीसगडच्या पोलिसांची नवी मोहीम

बस्तर – गेल्या ३० वर्षांपासून अधिक काळ माओवाद्यांचा प्रभाव असलेल्या छत्तीसगडच्या बस्तरमध्ये पोलिसांनी माओवाद्यांच्या विरोधात प्रचार मोहीम हाती घेतली आहे. स्थानिक भाषा गोंडीमध्ये ‘बस्तर था माटा’ आणि हल्बीमध्ये ‘बस्तर चो आवाज’ नावाने ही जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे.

माओवाद्यांच्या विरोधात

काही महिन्यांपासून बस्तरमध्ये सुरक्षा दलाची माओवाद्यांच्याविरूद्धची मोहीम महत्त्वपूर्ण वळणावर पोहोचली आहे. बस्तरमधील माओवाद्यांचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने बस्तर पोलिसांनी स्थानिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. त्यासाठी त्यांनी ‘बस्तर था माता’ आणि ‘बस्तर चो आवाज’ या मोहिमेला सुरुवात केली आहे.

या माध्यमातून माओवाद्यांची विकास व आदिवासीविरोधी मानसिकता उघडकीस आणली जाईल.

‘माओवाद्यांचे उच्चाटन करणे बस्तर पोलिसांचे प्राधान्य आहे. त्यासाठी प्रभावी कारवाई आवश्यक आहे. म्हणूनच तर ‘बस्तर था माटा’ आणि ‘बस्तर चो आवाज’ या नावाने प्रचार युध्द सुरू केले आहे’, असे बस्तर रेंजचे पोलीस महानिरीक्षक पी सुंदरराज यांनी म्हटले आहे.

माओवाद्यांनी गेल्या तीस वर्षांपासून बस्तरमध्ये दहशतवाद पसरविला आहे. म्हणूनच तर राज्य सरकारच्या त्रिवेणी योजनेचा प्रसार करताना राज्यात विकासकामे किती महत्वाची आहेत याचे महत्व पटवून दिले जाणार आहे. तसेच गेल्या तीन दशकांपासून राज्यात माओवाद्यांनी विकास कामांचे किती नुकसान केले याची माहिती या माध्यमातून दिली जाणार आहे., असे सुंदरराज म्हणाले.

माओवाद्यांच्या विरोधात छेडलेल्या मोहिमेत बॅनर्स, पोस्टर्स, व्हिडिओ, चित्रे, ऑडिओ क्लिप्स, नृत्य-गाणे-संगीत आणि सोशल मीडिया यांचा अत्यंत प्रभावीपणे वापर केला जाणार आहे. याद्वारे माओवाद्यांच्या कारवाया उघडकीस केल्या जातील. या माध्यमातून बस्तरवासियांचे विचार जगासमोर मांडले जाणार आहेत. या मोहिमेद्वारे स्थानिक माओवाद्यांना हिंसा सोडून आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्यासाठी आत्मसमर्पण करण्यास भाग पाडले जाणार आहे. या मोहिमेचा प्रारंभ करताना पोलिसांनी माओवाद्यांचे काही पोस्टर्स प्रसिद्ध केले. या माओवाद्यांना पोलिसांनी माफिया व लुटारू म्हटले आहे.

leave a reply