अफगाणिस्तानातील मुलांना तातडीच्या सहाय्याची आवश्‍यकता

- आंतरराष्ट्रीय संस्थेचे आवाहन

काबुल – हिवाळ्याच्या काळात अफगाणिस्तानातील उपासमारीचे संकट भयंकर स्वरुप धारण करणार असून अफगणी मुलांना याचा सर्वाधिक फटा बसेल, असा इशारा मुलांसाठी कार्य करणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय संघटनेने दिला आहे. यामुळे अफगाणिस्तानपर्यंत तातडीने सहाय्य पोहोचविणे अत्यावश्‍यक बनल्याचे या संस्थेचे म्हणणे आहे.

अफगाणिस्तानातील तालिबानचे उपपंतप्रधान मुल्ला बरादर याने आंतरराष्ट्रीय समुदायाला अफगाणिस्तानसाठी सहाय्याचे आवाहन केले होते. गोठवून टाकणाऱ्या हिवाळ्यात आमच्या जनतेसाठी सहाय्य करा कारण इथली परिस्थिती चिंताजनक बनली आहे. आम्हाला पैसे, निवारा आणि अन्नाची गरज आहे, असे बरदार याने म्हटले होते. एकीकडे आंतरराष्ट्रीय समुदायाने आमच्यावर निर्बंध लादले आहेत आणि दुसऱ्या बाजूला गेल्या वीस वर्षात आमच्याकडे कुठल्याही स्वरुपाच्या पायाभूत सुविधा निर्माण झालेल्या नाहीत. अशा दुहेरी संकटात आपला देश असल्याचे बरादर म्हणाला.

तातडीच्या सहाय्याची आवश्‍यकताअशा परिस्थितीत जगाकडून आम्हाला मानवतावादी सहाय्याची अपेक्षा असल्याचे आवाहन बरादर याने केले. काही दिवसांपूर्वी संयुक्त राष्ट्रसंघाने अफगाणिस्तानसाठी सुमारे 1.5 अब्ज डॉलर्सचा निधी जमविल्याची माहिती समोर आली होती. पण हे सहाय्य अफगाणिस्तानसमोर कसे पोहोचणार, ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. हे सहाय्य पोहोचण्याच्या आधी अफगाणिस्तानात दारूण परिस्थिती निर्माण होऊ शकते हे मुलांसाठी कार्य करणाऱ्या आंतरराष्ट्रीय संस्थेने दिलेल्या इशाऱ्यावरून स्पष्ट होत आहे. मुख्य म्हणजे अफगाणी मुलांची अवस्था यामुळे भयंकर बनणार असून त्यांच्यासाठी तातडीच्या सहाय्याची आवश्‍यकता असल्याचे या संस्थेने म्हटलेले आहे.

अफगाणिस्तानातील लाखो मुले उपाशी, विस्थापित आणि शिक्षणापासून वंचित आहेत. त्यांना कडक हिवाळ्याचा सामना करावा लागेल, याची जाणीव सदर संस्थेने करून दिली.

leave a reply