महाराष्ट्रात दिवसा जमावबंदी व रात्रीची संचारबंदी

- कोरोनाच्या नव्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर निर्बंध वाढविले

मुंबई – शनिवारी महाराष्ट्रात कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या वाढून 41 हजारांच्या पुढे गेली. मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी 20 हजाराहून अधिक रुग्ण आढळले. महाराष्ट्रात कोरोनाच्या नव्या लाटेत प्रचंड वेगाने वाढत असलेल्या रुग्णसंख्येच्या पार्श्‍वभूमीवर आंशिक लॉकडाऊनच घोषित केला आहे. राज्य सरकारने वाढविलेल्या निर्बंधांनुसार आता सकाळपासून रात्रीपर्यंत जमावबंदी राहिल, तर रात्री 11 ते पहाटे पाचपर्यंत संचारबंदी असणार आहे. या काळात केवळ अत्यावश्‍यक कारणासाठीच बाहेर पडता येईल. मात्र लोकल प्रवासावर अद्याप कोणतेही निर्बंध लावण्यात आलेले नाहीत.

राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या भयानक वेगाने वाढत आहे. हा वेग दुसऱ्या लाटेपेक्षा कितीतरी अधिक आहे. 3 जानेवारीला राज्यात 12 हजाराहून अधिक रुग्णांची नोंद झाली होती. ती वाढून दुसऱ्या दिवशी ही दैनंदिन रुग्ण संख्या 18 हजारांच्या पुढे गेली. तर 5 जानेवारीला हीच रुग्णसंख्या 26 हजारांवर पोहोचली. 6 जानेवारीला 36 हजार आणि 7 जानेवारीला 40 हजारापेक्षा अधिक रुग्ण आढळले. तर शनिवारी महाराष्ट्रात 41 हजार 434 रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच 13 जणांचा बळी गेला आहे.

महाराष्ट्रात दिवसा जमावबंदी व रात्रीची संचारबंदी - कोरोनाच्या नव्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर निर्बंध वाढविलेमुंबईत सलग तिसऱ्या दिवशी 20 हजाराहून अधिक रुग्ण आढळले. मुंबईत कोरोना रुग्ण सापडण्याचा दर देशात सर्वाधिक आहे व सध्या राज्यातील निम्मे नवे रुग्ण हे मुंबईत सापडत आहेत. मुंबईत शनिवारी कोरोनामुळे पाच मृत्युंचीही नोंद करण्यात आली आहे. या पार्श्‍वभूमीवर मुंबई महापालिका आपल्या अधिकारक्षेत्रात निर्बंध कठोर करण्याचा निर्णय घेऊ शकते, असे संकेत मिळत होते. तसेच संपूर्ण राज्यात नियम कडक केले जाऊ शकतात, याचेही संकेत राज्य सरकारकडून देण्यात येत होते.

संपूर्ण लॉकडाऊन करणार नाही. मात्र कोरोनाचे संक्रमण थांबविण्यासाठी निर्बंध कठोर करण्याचा निर्णय घ्यावा लागेल, असे राज्य सरकारकडून सांगण्यात आले होते. शुक्रवारी राज्याच्या प्रधान सचिवांनी एक उच्चस्तरीय बैठकही घेतली होती. या बैठकीत निर्बंधांबाबत चर्चा करण्यात आली व त्याचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सोपविण्यात आला. अहवालातील शिफारसींवर चर्चा केल्यानंतर शनिवारी सायंकाळी राज्यात नव्या निर्बंधांची घोषणा करण्यात आली आहे.

गेले काही दिवस राज्यात रात्रीची जमावबंदी होती. अर्थात पाचपेक्षा जास्त जणांना एकत्र येण्यास मनाई होती. मात्र आता पहाटे पाच पासून रात्री 11 पर्यंत राज्यात जमावबंदी असणार आहे. तर रात्री 11 ते पहाटे पाचपर्यंत कडक कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शाळा आणि महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार आहेत. केवळ 10 वी व 12 व्या परिक्षा आणि सरकारकडून घेण्यात येणाऱ्या परिक्षांना परवानगी असेल.

याखेरीज सर्व सरकारी व खाजगी कार्यालयात 50 टक्के उपस्थितीच ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच सरकारी कार्यालयांतही पूर्व परवानगीशिवाय कोणाही सामान्य नागरिकाला प्रवेश मिळणार नाही. व्यायामशाळा, स्पा आणि जलतरण सुविधा पूर्णपणे बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. याबरोबरच हॉटेल्स, नाट्यगृह, चित्रपटगृहे आणि सलून पुर्वी दिलेल्या निर्देशांनुसारच 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील. मात्र रात्री 10 वाजेपर्यंतची वेळ मर्यादीत करण्यात आली आहे.

याशिवाय मॉलही 50 टक्के क्षमतेने सकाळी 10 ते रात्री आठ वाजेपर्यंतच सुरू राहतील. लग्न समारंभ, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतीक व राजकीय कार्यक्रमही 50 टक्के क्षमतेनेच करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच अंत्यविधीसाठी केवळ 20 जणांना उपस्थित राहण्यास परवानगी असेल. येत्या काळात कोरोनाच्या रुग्णात आणखी वाढ झाल्यास निर्बंध आणखी कडक होऊ शकतात. असेही संकेत राज्य सरकारकडून दिले जात आहेत.

leave a reply