एलएसीवरील चीनच्या कारवाया प्रक्षोभक ठरतात

- भारताच्या संरक्षण मंत्रालयाचा इशारा

नवी दिल्ली – एलएसीवरील चीनच्या कारवाया प्रक्षोभक होत्या, असे सांगून भारताच्या संरक्षण मंत्रालयाने लडाखच्या एलएसीवरून चीनच्या लष्कराने संपूर्ण माघार घ्यावी, असे बजावले आहे. तसेच चिनी लष्कराच्या हालचालींविरोधात आवश्यक ती खबरदारी भारताने घेतलेली आहे, असेही संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले. या दरम्यान, अरुणाचल प्रदेशच्या एलएसीवर घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या चिनी लष्कराला भारतीय सैन्याने तिथेच रोखल्याचे दाखविणारा व्हिडिओ प्रसिद्ध झाला आहे.

एलएसीवरील चीनच्या कारवाया प्रक्षोभक ठरतात - भारताच्या संरक्षण मंत्रालयाचा इशाराअरुणाचल प्रदेशच्या काही ठिकाणांची नावे बदलून चीनने भारताला नवी चिथावणी दिली होती. आता इथल्या एलएसीवर चीनचे लष्कर घुसखोरीचा आणखी एक प्रयत्न करीत असल्याचे दाखविणारा व्हिडिओ प्रसिद्ध झाला आहे. सोशल मीडियावर आलेला हा व्हिडिओ नक्की कधी चित्रित झाला, याची माहितीही उपलब्ध नाही. पण यात अरुणाचल प्रदेशच्या बूम ला पास इथला हा व्हिडिओ असून याच चीनचे जवान घुसखोरीच्या तयारीत असल्याचे दिसत आहे. पण भारतीय सैन्याने चिनी जवानांना तिथल्या तिथेच रोखले.

‘आहे ती स्थिती कायम राखायला हवी. यात बदल करण्याचा प्रयत्न केलाच, तर पुढच्या परिणामांना आम्ही जबाबदार असणार नाही’, असे भारतीय सैन्याने दुभाषाद्वारे चीनच्या जवानांना बजावल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. आम्हाला आहे ती स्थिती कायम राखायची आहे, तुम्हालाही तेच करावे लागेल, कळले का? असा इशारा भारतीय सैनिक चिनी जवानांना देत असल्याचे या व्हिडिओत पहायला मिळाले. यामुळे चीन एलएसीवर घुसखोरीद्वारे भारतीय सैन्यासमोर नवे आव्हान उभे करण्यासाठी धडपडत असल्याचे दिसते.

गलवान खोर्‍यातून चीनच्या लष्कराने आपल्या देशबांधवांसाठी सदिच्छा देणारा व्हिडिओ पाठविला असून यात चीनची एक इंच भूमीही दुसर्‍या कुणाच्या हाती पडू देणार नाही, असा संदेश दिला आहे. चिनी जवानांच्या मागे असलेल्या दगडांवर हा संदेश लिहिण्यात आला होता. याद्वारे चीन गलवानच्या संघर्षात आपली सरशी झाल्याचे दाखविण्याचा प्रयत्न करीत आहे. पण प्रयत्नच चीनच्या लष्कराची या क्षेत्रातील अवस्था बिकट असल्याचे दाखवून देत आहे. याआधीही चीनने गलवानच्या संघर्षात जखमी झालेल्या काही जवानांची प्रतिक्रिया आपल्या राष्ट्रीय माध्यमांवर दाखविली होती. त्यातही हे जवान काही झाले तरी आम्ही चीनची इंचभर भूमी कुणाच्या हाती पडू देणार नाही, असे दावे करीत होते.

भारताच्या एलएसीवरील भूमीवर दावे सांगून आपल्या सामर्थ्याच्या गर्जना करणार्‍या चीनच्या लष्करावर आता इंचभरही भूमी गमावणार नाही, असे सांगण्याची वेळ ओढावली आहे. त्याचवेळी गलवानच्या संघर्षाची माहिती दडविण्यासाठी चीनने केलेली धडपड देखील जगजाहीर झाली आहे. अशा परिस्थितीत चीन पुन्हा पुन्हा आपल्या लष्कराला गलवानमधील संघर्षात मोठे यश मिळाल्याचे दावे ठोकून आपली प्रतिष्ठा सावरण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसते.

leave a reply