देशाच्या आर्थिक प्रगतीवर कोरोनाच्या साथीचा परिणाम होऊ देणार नाही

- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ग्वाही

नवी दिल्ली – ‘नव्या वर्षात देशाच्या आर्थिक विकासाची गती वाढविण्याची आवश्यकता आहे. तसे करताना कोरोनाच्या साथीचा देशाच्या विकासाची गतीवर परिणाम होऊ देणार नाही. देश सावधपणे कोरोनाच्या साथीचा मुकाबला करील. त्याचवेळी देशाचे आर्थिक हितसंबंध जपण्याची दक्षता घेतली जाईल’, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

देशाच्या आर्थिक प्रगतीवर कोरोनाच्या साथीचा परिणाम होऊ देणार नाही - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ग्वाहीकोरोनाचे संकट मागे टाकून भारतीय अर्थव्यवस्था झेप घेण्याच्या तयारीत असल्याचे दावे आंतरराष्ट्रीय वित्तसंस्था व आर्थिक पाहणी करणार्‍या ख्यातनाम संस्थांनी केले होते. आत्ताच्या काळात भारत सर्वाधिक आर्थिक दराने प्रगती करणारा देश बनला असून या साथीच्या काळातही भारताने केलेल्या आर्थिक कामगिरीची दखल सार्‍या जगाने घेतली होती. आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांनीही या काळात भारतीय अर्थव्यवस्थेवर विश्‍वास दाखवून विक्रमी गुंतवणूक केली. मात्र अशा परिस्थितीत कोरोनाच्या नव्या साथीचा भारताच्या विकासावर परिणाम होईल, अशी चिंता वर्तविली जात आहे.

या पार्श्‍वभूमीवर, पंतप्रधान मोदी यांनी कोरोनाच्या साथीचा देशाच्या आर्थिक विकासावर परिणाम होऊ दिला जाणार नाही, अशी ग्वाही दिली. पंतप्रधान किसान योजनेनुसार शेतकर्‍यांना देण्यात येणार्‍या निधीचा दहावा हफ्ता देताना पंतप्रधान बोलत होते. २०२१ हे वर्ष भारताने कोरोनाच्या साथीशी समर्थपणे केलेल्या सामन्यासाठी कायम लक्षात राहिल. या काळात देशाने १४५ कोटीहून अधिक कोरोनाचे डोस आपल्या जनतेला दिले. वेगवेगळ्या क्षेत्रात भारताने फार मोठ्या सुधारणा घडवून आणल्या व आधुनिक पायाभूत सुविधांचा विस्तार केला, याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले.

भारतीय अर्थव्यवस्था कोरोनाच्या आधीच्या काळापेक्षाही अधिक चांगली कामगिरी करीत असल्याचे काही निकषांवर स्पष्ट झाले आहे, असे सांगून पंतप्रधानांनी त्यावर समाधान व्यक्त केले. याचा दाखला देताना पंतप्रधानांनी अर्थव्यवस्था आठ टक्क्याहून अधिक वेगाने प्रगती करीत आहे, असे म्हटले आहे. याबरोबरच देशात येणारी थेट परकीय गुंतवणूक विक्रमी स्तरावर पोहोचली आहे आणि परकीय गंगाजळी नव्या उंचीवर पोहोचली आहे, याची जणीव करून दिली. देशाच्या जीएसटी महसूलात वाढ होत आहे व निर्यातक्षेत्रात, त्यातही कृषीत्रक्षेत्राशी निगडीत निर्यातीत मोठ्या वाढीची नोंद झाली आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

याबरोबरच युपीआयच्या अंतर्गत ७० लाख कोटी रुपयांहून अधिक व्यवहार झाले आहेत, याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. याखेरीज २०२१ हे वर्ष देशाचा सांस्कृतिक वारसा अधिकच भक्कम करणारे वर्ष ठरले. काशी विश्‍वनाथ धाम, केदारनाथ धाम यांचा विकास व सुशोभिकरण, आदी शंकराचार्यांच्या समाधीचा जिर्णोधार, देशाबाहेर नेलेल्या अन्नपूर्णा मातेच्या मुर्तीची प्रतिष्ठापना, राममंदिराची उभारणी आणि धोलावीरा व दूर्गापूजेला ‘वर्ल्ड हेरिटेज’ म्हणून मिळालेला मान, हे सारे देशाचा सांस्कृतिक पातळीवरील सन्मान वाढविणारे आहे. यामुळे देशातील पर्यटनात वाढ होईल आणि तिर्थक्षेत्रांचा यामुळे अधिकच विकास होईल, असा विश्‍वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. २०२२ सालात भारत आपल्या स्वातंत्र्यांचा अमृतमहोत्सव साजरा करीत आहे. हे देशाच्या नव्या दिमाखदार प्रवासाच्या पायाभरणीचे वर्ष ठरावे. नव्या जोषात आपण याचे स्वागत करायला हवे, असा संदेश पंतप्रधानांनी दिला.

leave a reply