लडाखच्या एलएसीवरील चीनच्या दुःसाहसाला उत्तर मिळेल

- भारताच्या संरक्षण मंत्रालयाचा इशारा

नवी दिल्ली – भारतीय सैनिक अत्यंत प्रतिकूल हवामानात लडाखमध्ये आपले पाय रोवून ठामपणे उभे असून चीनच्या कोणत्याही दुःसाहसाला प्रत्युत्तर देण्यासाठी लष्कर सज्ज आहे, अशी ग्वाही संरक्षण विभागाने दिली आहे. पूर्व लडाखच्या एलएसीवर असलेल्या ‘रेझांग ला’ ‘रेचिन ला’ व ‘मुखोसरी’ जवळील भागात चीनने आपले रणगाडे तैनात केल्याचे वृत्त नुकतेच प्रसिद्ध झाले होते. याची गंभीर दखल संरक्षण मंत्रालयाने घेतली. या क्षेत्रात चीनच्या अपारंपरिक शस्त्रे व कुरापतींमुळे तणाव वाढत असल्याचे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.

दुःसाहसाला उत्तर

संरक्षण विभागाने आपला वार्षिक अहवाल नुकताच प्रसिद्ध केला असून त्यात चीनकडून लडाखसह इतर भागांमध्ये सुरू असलेल्या कारवायांची गांभीर्याने दखल घेण्यात आली आहे. जून महिन्यात गलवान व्हॅलीत चीनच्या लष्कराने चढविलेल्या हल्ल्याची नोंद घेताना त्यात २० भारतीय सैनिक शहीद झाल्याची माहिती संरक्षण विभागाने दिली. त्याचवेळी हा संघर्ष छेडणार्‍या चीनला मोठे नुकसान सहन करावे लागल्याचा स्पष्ट उल्लेख संरक्षण विभागाच्या अहवालात करण्यात आला आहे. चीनच्या जवानांनी गलवानमधील हल्ल्यासाठी शस्त्रांच्या ऐवजी लोखंडी सळ्या व काटेरी तारांचा वापर केला होता. हे युद्ध नसून दोन देशांच्या सैनिकांमध्ये झालेली स्थानिक पातळीवरील चकमक होती, असे चित्र चीन याद्वारे उभे करू पाहत होता.

मात्र या संघर्षातही चीनला भारतीय सैनिकांनी चांगलाच दणका दिला. संरक्षण मंत्रालयाच्या अहवालात याची नोंद करण्यात आलेली आहे. तसेच २०२० सालच्या २८-२९ ऑगस्ट रोजी भारतीय सैनिकांनी चलाखी दाखवून चीनच्या घुसखोरीचे प्रयत्न हाणून पाडले व पँगाँग त्सोच्या दक्षिणेकडील टेकड्यांचा ताबा घेतला होता, ही बाब देखील सदर अहवालात मांडण्यात आलेली आहे. यानंतर चीनने सदर क्षेत्रातील तैनाती मोठ्या प्रमाणात वाढविली आणि भारतानेही तितक्याच प्रमाणात तैनाती करून चीनला प्रत्युत्तर दिले. भारतीय वायुसेनेच्या या क्षेत्रातील हालचाली वाढविण्यात आल्या असून चीनच्या या क्षेत्रातील कारवायांकडे वायुसेनेचीही नजर रोखलेली आहे, ही बाब सदर अहवालात स्पष्ट करण्यात आली आहे.

लडाखसह भारत-चीनमधील इतर सीमाभागात निर्माण झालेल्या तणावासाठी चीनच जबाबदार असल्याचा ठपका संरक्षण विभागाने ठेवला आहे. पूर्व लडाखच्या ‘एलएसी’वर चीनने मोठ्या प्रमाणात प्रगत शस्त्रास्त्रे तैनात केली आहेत. इतकेच नाही तर या ठिकाणी आधुनिक रणगाडे तैनात करून चीन भारतावरील दडपण वाढविण्याची तयारी करीत आहे. पण भारताने या क्षेत्रात रणगाडाभेदी क्षेपणास्त्रे तैनात करून चीनच्या मानसिक दबावतंत्राला सडेतोड उत्तर दिले आहे.

leave a reply