चीनची महत्त्वाकांक्षा व दडपशाही नाटोच्या सुरक्षेसाठी धोकादायक

- नाटोच्या ‘स्ट्रॅटेजिक कॉन्सेप्ट डॉक्युमेंट'मधील इशारा

माद्रिद/बीजिंग – चीनच्या महत्त्वाकांक्षा व दडपशाहीची धोरणे हा नाटो आघाडीतील देशांची सुरक्षा तसेच हितसंबंधांसाठी धोका असल्याचा इशारा नाटोची ‘ब्ल्यू प्रिंट’ मानल्या जाणाऱ्या ‘स्ट्रॅटेजिक कॉन्सेप्ट डॉक्युमेंट’मध्ये देण्यात आला आहे. नाटोने आपल्या धोरणात्मक आराखड्यात चीनच्या धोक्याचा स्पष्टपणे उल्लेख करण्याची ही पहिलीच वेळ ठरते. त्यामुळे भविष्यात नाटो चीनच्या कारवाया रोखण्यासाठी आशियाकडे लक्ष केंद्रित करेल, असे संकेत मिळत आहेत. नाटोने दिलेला हा इशारा निरर्थक असल्याची टीका चीनने केली आहे.

गेल्या दशकभरात जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून समोर आलेल्या चीनने व्यापार, तंत्रज्ञान व संरक्षणक्षेत्रात सर्वोच्च स्थान मिळविण्यासाठी जोरदार धडपड सुरू केली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वच क्षेत्रात अमेरिकेच्या बरोबरीचे स्थान मिळवणे व त्यानंतर अमेरिकेला मागे टाकून महासत्ता बनण्याची चीनच्या कम्युनिस्ट पार्टीची महत्त्वाकांक्षा आहे. त्यासाठी आर्थिक व लष्करी बळाच्या जोरावर आपल्याला अनुकूल धोरणे तसेच मूल्यव्यवस्था इतर देशांवर लादण्याच्या हालचाली सुरू आहेत. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर चीनच्या या कारवाया ठळकपणे समोर आल्या असून त्यावर आंतरराष्ट्रीय समुदायाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे.

रशिया-युक्रेन युद्धात चीनने रशियाची बाजू घेतली असून अनेक पातळ्यांवर चीन रशियाला सहकार्य करीत असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे युक्रेनला पाठिंबा तसेच सहाय्य पुरविणाऱ्या नाटोच्या सदस्य देशांमध्ये नाराजीची भावना आहे. चीनचा धोका नाटोच्या प्राधान्यक्रमात समाविष्ट करण्यामागे ही पार्श्वभूमी कारणीभूत ठरल्याचे मानले जाते. यापूर्वी 2020 साली नाटोने प्रसिद्ध केलेल्या एका अहवालात चीनच्या वाढत्या प्रभावाकडे लक्ष वेधण्यात आले होते. मात्र नाटोच्या सुरक्षेला चीनचा थेट धोका आहे, असा थेट दावा यात करण्यात आलेला नव्हता. मात्र आता रशिया-युक्रेन युद्धावरून रशियाविरोधात आक्रमक झालेल्या नाटोने आपण रशियाबरोबर चीनला सुद्धा धोका मानत असल्याचे जगजाहीर केले.

नाटोने दिलेल्या इशाऱ्यावर चीनच्या परराष्ट्र विभागाकडून प्रतिक्रिया उमटली. ‘नाटोच्या आराखड्यात तथ्यांचा विपर्यास करण्यात आला असून चीनच्या परराष्ट्र धोरणाची हेटाळणी करण्यात आली आहे. नाटोचा हा प्रयत्न पूर्णपणे निरर्थक आहे’, अशी टीका परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते झाओ लिजिअन यांनी केली.

leave a reply