अमेरिकेबरोबरील अणुकरारावरील चर्चा फिस्कटल्यानंतर इराणची रशियाबरोबर इंधन सहकार्य वाढविण्याची घोषणा

अश्घाबात – इराणच्या अणुकरारावर अमेरिका व इराणची कतारमध्ये सुरू असलेली अप्रत्यक्ष चर्चा अपयशी ठरली. इराणने स्वीकारलेल्या आक्रमक भूमिकेमुळे या वाटाघाटींना यश मिळू शकले नाही, असा ठपका अमेरिकेने ठेवला आहे. नेमक्या याच वेळी इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांची रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याशी तुर्कमेनिस्तानमध्ये भेट झाली. या भेटीत दोन्ही नेत्यांनी रशिया व इराणमधील इंधनविषयक सहकार्य अधिकच व्यापक करण्याचा निर्णयघेतला. त्याबरोबर रशिया व इराणला जोडणाऱ्या ‘इंटरनॅशनल नॉर्थ-साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर’वर काम करण्याचा निर्धार दोन्ही नेत्यांनी व्यक्त केला आहे.

बुधवारी तुर्कमेनिस्तानची राजधानी अश्घाबात येथे कॅस्पियन समुद्राशी जोडलेल्या देशांची बैठक पार पडली. यानिमित्ताने रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्यात इंधन, इंधनवायू आणि व्यापाराच्या मुद्यांवर स्वतंत्र चर्चा झाली. ‘उभय देशांमधील व्यापार आणि ऊर्जा क्षेत्रातील सहकार्य सध्या एका उंचीवर पोहोचले आहे. पण रशिया व इराणकडे असलेली क्षमता पाहता, या दोन्ही क्षेत्रातील सहकार्य अधिकच व्यापक करता येईल’, असे यावेळी इराणचे राष्ट्राध्यक्ष रईसी म्हणाले. यासाठी आर्थिक व्यवहारांसाठी वापरल्या जाणाऱ्या पाश्चिमात्यांच्या यंत्रणेला पर्याय देऊन स्वतंत्र व्यवस्था उभी केली जाईल, असा दावा इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी केला. थेट उल्लेख केला नसला तरी रशिया व इराण बार्टर ट्रेड अर्थात वस्तूच्या मोबदल्यात वस्तूचा व्यवहार करणार आहेत. काही महिन्यांपूर्वी इराणने रशियाकडे यासंबंधी प्रस्ताव दिला होता. तर पाश्चिमात्य देशांच्या ‘स्विफ्ट’ या पेमेंट सिस्टिमला पर्याय असलेल्या रशियन आवृत्तीचा वापर आपल्या सहकारी देशांबरोबरील व्यवहारात केला जाईल, असे रशियाने याआधी स्पष्ट केले होते.

इंधनविषयक सहकार्याबरोबर उभय देशांमधील व्यापारी सहकार्य वाढविण्याचेही दोन्ही नेत्यांनी मान्य केले. कॅस्पियन समुद्राला पर्शियन आखातामार्गे हिंदी महासागराशी जोडणारा ‘इंटरनॅशनल नॉर्थ-साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर’ला अधिक बळ देणे आवश्यक असल्याचे राष्ट्राध्यक्ष पुतिन व राष्ट्राध्यक्ष रईस यांनी मान्य केले.

पर्शियन आखाताला रशियामार्गे उत्तर युरोपशी जोडणारा हा मार्ग रेड सी-सुएझ कालव्याद्वारे होणाऱ्या मालवाहतुकीला पर्याय ठरू शकेल. युक्रेन युद्धामुळे पाश्चिमात्य देश रशियावर निर्बंध लादत असताना, रशिया व इराणमधील सहकार्य अतिशय लक्षवेधी ठरते. या कॉरिडॉरचा भारताला फार मोठा लाभ मिळणार असल्याचा दावा आंतरराष्ट्रीय विश्लेषकांकडून केला जातो. या प्रकल्पामुळे इराणला आपल्या भौगोलिक स्थानाचा अधिक प्रभाविरित्या वापर करता येईल. हा प्रकल्प पूर्णत्त्वास गेल्यानंतर, इराणचे आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्थान अधिकच भक्कम बनेल, असे विश्लेषकांचे म्हणणे आहे.

leave a reply