चीनची अमेरिकी विमान कंपन्यांच्या प्रकरणी माघार

बीजिंग/वॉशिंग्टन- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकलेल्या दडपणानंतर चीनने प्रवासी विमान कंपन्यांच्या मुद्यावर स्पष्ट माघार घेतली आहे. गुरुवारी चीनने अमेरिकी प्रवासी कंपन्यांना चीनमध्ये हवाई सेवेची परवानगी असल्याचे जाहीर केले. काही दिवसांपूर्वी चीनच्या यंत्रणांनी नव्या नियमांचे कारण पुढे करत अमेरिकी विमान कंपन्यांना प्रवेश नाकारला होता. त्यानंतर अमेरिकेनेही चीनच्या विमान कंपन्यांना प्रवेश बंदीची धमकी दिल्यानंतर चीनने एक पाऊल मागे घेतल्याचे उघड झाले आहे.

चीन, डोनाल्ड ट्रम्प, अमेरिका

मंगळवारी, अमेरिकेने चीनमध्ये जाणाऱ्या व चीनमधून येणार्‍या प्रवासी विमानांच्या वाहतुकीवर बंदीची घोषणा केली होती. चीनच्या चार प्रवासी विमान कंपन्यांना अमेरिकेत परवानगी असताना अमेरिकी कंपन्यांना परवानगी नाकारणे हा ‘एअर ट्रान्स्पोर्ट एग्रीमेंट’चा भंग ठरतो, असा आरोप अमेरिकेच्या ट्रांसपोर्टेशन डिपार्टमेंटने केला होता. चीनच्या आततायी धोरणाला प्रत्युत्तर म्हणून चिनी कंपन्यांच्या अमेरिकेतील वाहतुकीवर पूर्ण बंदी घालत असल्याचे जाहीर करण्यात आले होते. बंदी १६ जूनपासून लागू होणार असल्याचे सांगण्यात येत असले तरी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आदेश दिल्यास त्यापूर्वीही बंदीची अंमलबजावणी होउ शकते, असेही अमेरिकी अधिकाऱ्यांनी बजावले होते.

चीन, डोनाल्ड ट्रम्प, अमेरिका

चीनच्या यंत्रणांनी गुरुवारी दिलेल्या माहितीत, ८ जूनपासून अमेरिका व इतर देशांच्या प्रवासी विमान कंपन्यांना हवाई सेवेची परवानगी देत असल्याचे स्पष्ट केले. त्यानुसार, अमेरिकेसह इतर परदेशी प्रवासी विमान कंपन्या दर आठवड्याला चीनमधील एका शहरात एक प्रवासी फेरी करू शकतात. जर सलग तीन आठवडे या परदेशी विमानांमधील कोणताही प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळला नाही तर त्यानंतर दोन प्रवासी फेऱ्यांना परवानगी देण्यात येईल, असे चीनच्या ‘सिव्हिल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन’ने जाहीर केले. चीनच्या या घोषणेनंतर अमेरिकेच्या ‘डेल्टा एअरलाइन्स’ या विमान कंपनीने आपण चीनमध्ये प्रवासी विमान सेवा पुन्हा सुरू करण्यास तयार असल्याचे संकेत दिले आहेत.

चीनमधून सुरू झालेल्या कोरोनाव्हायरस साथीच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनविरोधात पूर्णपणे प्रवासबंदीचे आदेश दिले होते. त्यामुळे अमेरिकेच्या प्रवासी विमान कंपन्यांनी चीनमध्ये जाणाऱ्या व चीनमधून येणाऱ्या प्रवासी विमानांच्या फेऱ्या पूर्णपणे थांबवल्या होत्या. साथीच्या पार्श्‍वभूमीवर चीनमधील प्रवासी विमानांची वाहतूक पूर्णपणे थांबवणारा अमेरिका हा पहिला देश ठरला होता.

leave a reply