भारताच्या उपउच्चायुक्तांना त्रास देणाऱ्या पाकिस्तानचा परराष्ट्रमंत्रालयाकडून निषेध

इस्लामाबाद/ नवी दिल्ली – पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा ‘आयएसआय’च्या हेरांनी इस्लामाबादमध्ये भारतीय उपउच्चायुक्त गौरव अहलुवालिया यांचा पाठलाग करुन त्यांना धमकावण्याचा प्रयत्न केला. सारे राजनैतिक संकेत धुडकावून पाकिस्तानने केलेल्या या कारवाईचा भारताने कडक शब्दात निषेध नोंदविला आहे. काही दिवसांपूर्वीच भारताने नवी दिल्लीत हेरगिरी करणाऱ्या पाकिस्तानी उच्चायुक्तातल्या दोन कर्मचाऱ्यांना रंगेहाथ पकडले होते. त्यानंतर भारताने या दोघांची हकालपट्टी केली होती. त्याला प्रत्त्युत्तर देण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून केला जात असल्याचे या निमित्ताने समोर येत आहे.

भारत, पाकिस्तान

भारताने दोन पाकिस्तानी कर्मचाऱ्यांची हकालपट्टी केल्यानंतर,आयएसआयने भारतीय उपउच्चायुक्त गौरव अहलुवालिया यांच्या मागे आपले हेर सोडले आहे.अहलुवालिया यांच्या निवासस्थानाबाहेर हे हेर तैनात असून अहलुवालिया मोटारीतून प्रवास करीत असताना या हेरांनी मोटरसायकलवरून पाठलाग केला होता. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध झाला आहे. हे हेर अहलुवालिया यांना धमकवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे समोर आले आहे. यावर भारताची संतप्त प्रतिक्रिया उमटली. भारताने या प्रकरणी पाकिस्तानचा कडक शब्दात निषेध नोंदविला आहे. या आधी पाकिस्तानात असलेल्या भारतीय राजनैतिक अधिकांऱ्याना व कर्मचाऱ्यांना अशा रीतीने त्रास देण्यात आल्याची माहिती समोर आली होती. पाकिस्तान सारखा देश कुठल्याही प्रकारचे राजनैतिक अधिकांऱ्यासंदर्भातील आंतरराष्ट्रीय कायदे व संकेत पाळायला तयार नाही, हे ही वेळोवेळी स्पष्ट झाले होते. एकाचवेळी पाकिस्तानच्या इतर देशातील दूतावांसामधील राजनैतिक अधिकांऱ्याकडून दहशतवादी, गुन्हेगारी व हेरगिरीच्या कारवाया केल्या जातात. तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तानातील भारतीय राजनैतिक अधिकांऱ्याना अशा रीतीने त्रास दिला जात आहे. त्यामुळे पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रतिमा अधिकाधिक मलीन होत चालली आहे.

leave a reply