चीनने दहशतवादी मक्कीवरील सुरक्षा परिषदेची कारवाई रोखली

संयुक्त राष्ट्रसंघ – दहशतवादी कारवायांसाठी निधी जमवणे, तरुणांना कट्टरवादी बनवून त्यांचा जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी कारवायांसाठी वापर करणे, असे गंभीर आरोप असलेल्या अब्दुल रेहमान मक्की याच्यावरील संयुक्त राष्ट्रसंघाची कारवाई चीनने रोखली. भारत व अमेरिकेने संयुक्तपणे सुरक्षा परिषदेत मक्कीवर कारवाईचा प्रस्ताव मांडला होता. चीनने आपल्या अधिकारांचा गैरवापर करून हे प्रकरण ‘टेक्निकल होल्ड’वर टाकले आहे. यावर भारताची तीव्र प्रतिक्रिया उमटणार असल्याचे स्पष्ट संकेत सरकारमधील सूत्रांनी दिले आहेत.

terrorist-Makkiअब्दुल रेहमान मक्कीसारख्या कुख्यात आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यावरील सुरक्षा परिषदेची कारवाई रोखून चीनने दहशतवादविरोधी लढ्यातील आपला दुटप्पीपणा दाखवून दिला आहे. यामुळे चीनने स्वतःलाच आंतरराष्ट्रीय पातळीवर उघडे पाडले असून यामुळे चीनच्या विश्वासार्हतेवरच प्रश्न उपस्थित होत आहेत, असे भारत सरकारमधील सूत्रांनी म्हटलेआहे. अद्याप भारताने अधिकृत पातळीवर याबाबत प्रतिक्रिया नोंदविलेली नाही. पण भारताच्या चीनबरोबरील संबंधांवर याचा परिणाम होऊ शकतो. याआधीही चीनने पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादी संघटनांच्या म्होरक्यांवरील सुरक्षा परिषदेची कारवाई तांत्रिक कारणे पुढे करून रोखली होती.

चीनच्या या बेजबाबदार कारवायांचा भारताने कडक शब्दात निषेध नोंदविला होता. भारतात घातपात माजविणाऱ्या दहशतवादी संघटनांच्या म्होरक्यांवरील कारवाई रोखणारा चीन दहशतवाद्यांचा बचाव करीत आहे, अशी टीका भारताने केली होती. पण चीनने निरनिराळ्या तांत्रिक सबबी पुढे करून आपला बचाव करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र सध्याच्या काळात भारताचा चीनबरोबरील सीमावाद पेटलेला असताना, चीनच्या या कारवाईवर भारताची तीव्र प्रतिक्रिया उमटू शकते. सरकारमधील सूत्रांनी तसे संकेत दिले आहेत.

leave a reply