अतिशय आक्रमक भूमिका स्वीकारून डब्ल्यूटीओच्या बैठकीत भारताने शेतकरी-मच्छिमारांचे हित जपले

-व्यापारमंत्री पियूष गोयल

नवी दिल्ली – ‘जागतिक पातळीवर विरोधात मोहीम राबविली जात असताना देखील, आपल्या शेतकरी आणि मच्छिमारांचे हित जपण्यात भारताला यश आले. कोरोनाच्या लसीची निर्मिती, शेतकरी व मच्छिमारांना दिले जाणारे अनुदान व सवलतींच्या विरोधात जागतिक व्यापार परिषदेत नोंदविण्यात आलेल्याआक्षेपांना भारताने सडेतोड प्रत्युत्तर दिले. जागतिक व्यापार परिषदेच्या व्यासपीठावर पहिल्यांदाच भारताने आक्रमकतेने आपली भूमिका मांडली आणि या बैठकीचा अजेंडा भारताने ठरविला. 135 कोटी देशवासियांना याचा अभिमान वाटला पाहिजे’ असे व्यापारमंत्री पियूष गोयल यांनी म्हटले आहे.

Piyush-Goyalजागतिक व्यापार परिषदेची (वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन-डब्ल्यूटीओ) 12 ‘मिनिस्ट्रीयल कॉन्फरन्स-एमसी12′ पार पडली. या बैठकीत भारत व इतर विकसनशील देश आपल्या शेतकरी आणि मच्छिमारांना देत असलेले अनुदान आणि सवलतींवर या बैठकीत आक्षेप घेण्यात आले होते. यामागे श्रीमंत देशांचे हितसंबंध असून सदर बैठकीत भारत तसेच इतर विकसनशील देशांना घेरण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. कोरोनाची साथ आणि युक्रेनचे युद्ध यामुळे निर्माण झालेल्या अन्नटंचाईच्या पार्श्वभूमीवर, सदर बैठकीचे महत्त्व वाढले होते. तब्बल साडेचार वर्षानंतर आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत भारताने विकसनशील देशांचे म्हणणे अतिशय आक्रमकपणे मांडले.

कोरोनाची लस असो वा कृषी किंवा मत्स्य उत्पादने असो, आपले हितसंबंध राखण्यासाठी गरीब देशांमधील कोट्यवधी जनतेच्या हिताच्या आड येणाऱ्या श्रीमंत देशांचे दावे भारताने खोडून काढले. विकसनशील व गरीब देश आपल्या शेतकरी-मच्छिमारांचे हित जपण्यासाठी देत असलेल्या अनुदान व सवलतींना श्रीमंत देशांचा विरोध आहे. तसे न करता सर्वांनाच व्यापाराची ‘समान संधी’ देण्याची मतलबी मागणी हे देश सातत्याने करीत आहेत. या प्रश्नावर विकसनशील व गरीब देशांवर सातत्याने दडपण टाकण्याचे काम ‘डब्ल्यूटीओ’मार्फत केले जात होते. मात्र यावेळी ही परिस्थिती पूर्णपणे बदलली, अशी माहिती व्यापारमंत्र्यांनी दिली.

‘डब्ल्यूटीओ’च्या यावेळच्या बैठकीत भारत केंद्रस्थानी होता. डब्ल्यूटीओच्या प्रत्येक बैठकीतील निष्कर्षात भारताची ठाम भूमिका स्पष्टपणे मांडण्यात आली आणि त्याचा प्रभावही जाणवला, असे गोयल यांनी म्हटले आहे. केवळ आपल्याच नाही, तर भारताने इतर गरीब व विकसनशील देशांमधील अल्पभूधारक शेतकरी आणि असुरक्षित घटकांच्या समस्याही तळमळीने मांडल्या, असे व्यापारमंत्र्यांनी सांगितले. याला फार मोठा प्रतिसाद मिळाला आणि विकसनशील व गरीब देशांनी भारताची बाजू उचलून धरली. काही देशांनी भारताविरोधात अपप्रचार करण्याचाही प्रयत्न केला. मात्र अखेरीस सत्य समोर आले. भारताने उपस्थित केलेले मुद्दे योग्यच होते, हे सर्वांना मान्य करावे लागले, असे पियूष गोयल म्हणाले.

डब्ल्यूटीओमध्ये भारताला गरीब व विकसिनशील देशांचे मोठ्या प्रमाणात समर्थन मिळाल्याचे दिसत आहे. भारतावर सतत टीका करणाऱ्या पाकिस्तानी माध्यमांनीही गरीब देशांची बाजू भारताने योग्यरितीने मांडली, अशी प्रशंसा केली आहे.

leave a reply