अमेरिकेच्या ‘डिफेन्स ॲक्ट’मध्ये गलवान व्हॅली संघर्षावरून चीनवर टीकास्त्र

संरक्षणमंत्री एस्पर यांच्याकडून भारताचे समर्थन

वॉशिंग्टन – अमेरिकेच्या संसदेत सादर झालेल्या ‘नॅशनल डिफेन्स ऑथोरायझेशन ॲक्ट’मध्ये(एनडीएए) भारताच्या गलवान व्हॅलीत झालेल्या संघर्षावरून चीनला धारेवर धरण्यात आले आहे. हा संघर्ष चीनच्या आक्रमक व विस्तारवादी धोरणामुळे भडकला आणि ही अतिशय चिंतेची बाब आहे, असा स्पष्ट उल्लेख ‘एनडीएए’मध्ये सुचविण्यात आलेल्या दुरुस्तीत करण्यात आला आहे. या दुरुस्तीला अमेरिकी संसदेच्या प्रतिनिधीगृहाने एकमुखाने मान्यता दिल्याचेही समोर आले आहे. अमेरिकेची संसद चीनला लक्ष्य करीत असतानाच संरक्षणमंत्री मार्क एस्पर यांनी, भारताबरोबरील संरक्षण सहकार्य अत्यंत महत्त्वाचे आहे अशा शब्दात समर्थन दिले आहे.

'डिफेन्स ॲक्ट'

अमेरिकेच्या संसदेत सध्या पुढील वर्षीच्या संरक्षणखर्चासंदर्भातील विधेयकावर चर्चा सुरू आहे. या विधेयकात, अमेरिकी संसदेच्या प्रतिनिधीगृहातील वरिष्ठ संसद सदस्य स्टिव्ह चॅबोट व अमी बेरा यांनी पुढाकार घेऊन दुरुस्ती सुचविली होती. या दुरुस्तीत चीनकडून सुरु असलेल्या कारवायांचा उल्लेख आहे. मे महिन्यात चीनच्या लष्कराने भारताच्या गलवान व्हॅलीत केलेल्या घुसखोरीच्या मुद्द्यावरून चीनवर जोरदार टीका करण्यात आली आहे.

‘भारत-चीन सीमेवरील गलवान व्हॅलीत चीनने दाखविलेल्या आक्रमकतेला अमेरिकी संसदेचा ठाम विरोध आहे. ही घटना चीनच्या वाढत्या विस्तारवादी कारवायांचा भाग ठरतो. चीनने कोरोनाव्हायरसच्या साथीपासून लक्ष विचलीत करण्यासाठी भारताची भूमी बळकावण्याचा प्रयत्न केला’, या शब्दात अमेरिकेने चीनला चांगलेच फटकारले आहे. या दुरुस्तीत अमेरिकेच्या संसद सदस्यांनी, चीनकडून साऊथ चायना सी तसेच जपाननजीकच्या सेनकाकू आयलंड्स क्षेत्रात सुरू असणाऱ्या कारवायांचाही उल्लेख केला आहे.

'डिफेन्स ॲक्ट'

जून महिन्यात भारत-चीन सीमेवरील गलवान व्हॅलीमध्ये चीनने उकरून काढलेल्या संघर्षात भारतीय लष्कराने चीनला चांगलाच दणका दिला होता. भारताने दिलेल्या या धक्क्यामुळे चीनची आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगलीच कोंडी झाली आहे. हाच मुद्दा केंद्रस्थानी ठेवून अमेरिकेने भारताबरोबरील जवळीक अधिकच वाढवण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांसह अनेक वरिष्ठ अधिकारी तसेच नेत्यांनी, चीनविरोधातील संघर्षासाठी अमेरिका भारताला भक्कम समर्थन देईल अशी ग्वाही दिली आहे.

काही दिवसांपूर्वी, अमेरिका व भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांमध्ये झालेल्या चर्चेत अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ यांनी, लडाखमधील तणावाचा उल्लेख करत चीनच्या कम्युनिस्ट राजवटीवर विस्तारवादी धोरणाचा ठपका ठेवला होता. त्याचवेळी, भारत आणि चीनमधील सीमावादात अमेरिका आपल्या सामर्थ्यानीशी भारताच्या मागे ठामपणे उभी आहे व यापुढेही राहील, असे व्हाईट हाउसचे वरिष्ठ अधिकारी मार्क मिडोज यांनी म्हटले होते. त्यापाठोपाठ आता अमेरिकी संसदेनेही भारत-चीन संघर्षात उघडपणे भारताची बाजू घेऊन केला इशारा दिला आहे.

अमेरिकेचे संरक्षणमंत्री मार्क एस्पर यांनी एका कार्यक्रमादरम्यान भारताची प्रशंसा केली. ‘भारत व अमेरिकेच्या नौदलात हिंदी महासागरात नुकताच पार पडलेला सराव इंडो-पॅसिफिक क्षेत्रासाठीची दोन्ही देशांची वचनबद्धता स्पष्ट करतो. हा सराव दोन्ही देशांमधील सहकार्य अधिक दृढ करणारा आहे. अमेरिका व भारतातील हे वाढते संरक्षण सहकार्य २१व्या शतकातील द्विपक्षीय संबंधांच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा ठरतो’,असे सांगून अमेरिकेच्या संरक्षणमंत्र्यांनी भारताचे समर्थन केले.

leave a reply