भारत-अमेरिका संयुक्तरित्या ड्रोन्सची निर्मिती करणार

America-India-Dronesनवी दिल्ली – भारत आणि अमेरिका लवकरच हवेतून प्रक्षेपित केल्या जाणार्‍या ड्रोन्सची संयुक्तरित्या निर्मिती करणार आहे. दोन्ही देशांच्या कंपन्यांमध्ये यासंबंधी करार पार पडल्याची माहिती, अमेरिकी संरक्षण मुख्यालयाच्या उपमंत्री एलेन लोर्ड यांनी दिली. चीनबरोबरील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने अमेरिकेकडून ’एमक्यू-९ रिपर’ ड्रोन्सच्या खरेदीचा वेग वाढविला आहे. हेलफायर मिसाईल्सनी सज्ज असलेल्या या ड्रोन्सच्या खरेदीच्या बातम्यांनी चीनची झोप उडविली आहे. अशा परिस्थितीत हवेतून प्रक्षेपित केल्या जाणार्‍या ड्रोन्सच्या निर्मितीसाठी भारत आणि अमेरिकेमध्ये झालेले सहकार्य चीनच्या चिंता वाढविणारे ठरणार आहे.

“युएस-इंडिया बिझनेस कौंसिल”ने अमेरिकेत आयोजित केलेल्या ’इंडिया आयडियाज् समिट’ च्या पार्श्वभूमीवर, अमेरिकी संरक्षण मुख्यालयातील एक्वीझीशन एण्ड सस्टेनमेंट या विभागाच्या उपमंत्री लॉर्ड यांनी भारत आणि अमेरिकेत प्रस्थापित होत असलेल्या सहकार्याची माहिती दिली. अमेरिकी वायुसेनेची संशोधन प्रयोगशाळा तसेच भारताची वायुसेना, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डिआरडीओ) आणि भारतातील स्टार्टअप कंपनी एकत्र येऊन ड्रोन्सची निर्मिती करणार असल्याचे लॉर्ड यांनी सांगितले. सदर ड्रोन्स धावपट्टीवरुन प्रक्षेपित केले जाणार नाहीत, तर हे ड्रोन्स हवेतून प्रक्षेपित केले जातील, असे अमेरिकी संरक्षण मुख्यालयाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी स्पष्ट केले. या ड्रोन्सच्या प्रक्षेपणासाठी मालवाहू विमाने किंवा हेलिका॓प्टर्सचा वापर केला जातो. येत्या सप्टेंबर महिन्यात दोन्ही देशांच्या अधिकार्‍यांमध्ये या संदर्भात बैठक होणार आहे. या ड्रोन्सबाबत अधिक माहिती प्रसिद्ध झालेली नाही. पण भारत आणि अमेरिकेतील हे ड्रोन सहकार्य अतिशय महत्त्वाचे ठरत आहेत.

America-India-Dronesगेल्या काही वर्षांमध्ये भारताने अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रांची खरेदी केली असून यामध्ये ग्लोबमास्टर, पोसायडन विमाने, तर अपाचे, चिनूक हेलिकॉप्टर्स यांच्याबरोबर हा॓वित्झर तोफांचा समावेश आहे. चीनबरोबरील तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारताने अमेरिकेकडून खरेदी केलेली पोसायडन विमाने तसेच अपाचे आणि चिनूक हेलिकॉप्टर्स व हा॓वित्झर तोफा लडाखमध्ये तैनात केल्या आहेत. तर प्रिडेटर आणि त्यानंतर रिपर ड्रोन्सच्या खरेदीचा वेगही वाढविला आहे. याव्यतिरिक्त, अमेरिकेने भारताला एफ-३५ या अतिप्रगत लढाऊ विमानांचा पुरवठा करण्याची तयारी दाखविल्याच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या होत्या. भारत आणि अमेरिकेतील या वाढत्या लष्करी सहकार्यावर अस्वस्थ झालेल्या चीनने टीकाही केली होती. अशा परिस्थितीत, हवेतून प्रक्षेपित केल्या जाणार्‍या ड्रोन्सच्या निर्मितीसाठी भारत आणि अमेरिकेत झालेले सहकार्य चीनची बेचैनी वाढविणारी ठरणार आहे.

leave a reply