भारताच्या नव्या ‘एफडीआय’ नियमांवर चीनची नाराजी

नवी दिल्ली – संधीसाधू चीनच्या गुंतवणुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि भारतीय उद्योगांच्या व्यापक हिताचा विचार करून भारताने ‘थेट परकीय गुंतवणुकी’च्या (एफडीआय) नियमात केलेले बदल चीनला रुचलेले नाहीत. चीनने भारताच्या निर्णयावर आगपाखड केली आहे. भारताने ‘एफडीआय’ नियमात केलेले बदल आंतरराष्ट्रीय व्यापारी नियमांना हरताळ फासणारे असल्याचे चीनने म्हटले आहे. तसेच भारत नियम मागे घेईल अशी अपेक्षाही चीनने व्यक्त केली आहे.

दोनच दिवसांपूर्वी वाणिज्य मंत्रालयाने एक अधिसूचना काढून शेजारील देशातून होणाऱ्या प्रत्येक प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष गुंतवणुकीसाठी केंद्र सरकारची पूर्व परवानगी बांधनकारक केली होती. कोरोनाव्हायरसच्या साथीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा गैरफायदा उचलून भारतीय कंपन्यांचे अधिग्रहण करण्याची संधी साधता येऊ नये, यासाठी ‘एफडीआय’ नियमात बदल करण्यात येत असल्याचे सरकारने म्हटले होते. यामध्ये चीनचा कुठेही उल्लेख करण्यात आलेला नव्हता. भारताने सर्वच शेजारी देशांसाठी नियमात हा बदल केला आहे. पण केवळ चीनने यावर प्रतीक्रिया दिली आहे.

”एफडीआय’ बाबत भारताने बदललेले नियम जागतिक व्यापार संघटनेच्या (डब्लूटीओ) नियमांचे उल्लंघन करणारे आहेत. ‘जी-२०’ देशांमध्ये गुंतवणूक व व्यापारासाठी पारदर्शक, सुलभ, भेदभाव नसलेल्या धोरणांवर सहमती झाली होती. पण भारताचे नवे नियम ‘जी-२०’ देशांनी ठरविलेल्या धोरणात अडथळा आणणारे आहेत”, असा आरोप चीनच्या दूतावासाचे प्रवक्ते जी रोंग यांनी केला आहे. भारत चीनला भेदभावपूर्ण वागणूक देणारा नाही, अशी भारताकडून अपेक्षा असल्याचे रोंग यांनी म्हटले आहे.

याआधी चीनचे भारतातील राजदूत सन विडोन्ग यांनी सोशल मीडियावर या निर्णयावर अप्रत्यक्षपणे टिप्पणी केली होती. ‘जगाला कोरोनाव्हायरसच्या महामारीबद्दल प्रथम चीनने सावध केले. याद्वारे चीनने जगाला मदतच केली. मात्र अशावेळी आंतराष्ट्रीय सहकार्याची गरज असताना त्याऐवजी सहकार्याचा बळी दिला जात आहे’, असे राजदूत विडोन्ग यांनी म्हटले होते. भारताने ‘एफडीआय’ नियमात बदलाची घोषणा केल्यावर काही तासातच विडोन्ग यांनी सोशल मीडियावर ही प्रतिक्रिया दिली होती. त्यामुळे भारताच्या निर्णयाशी विडोन्ग यांचे हे वक्तव्य जोडून पहिले जात आहे.

या संकटाच्या काळात कोसळलेली अर्थव्यवस्था आणि उद्योगांची खालावलेली परिस्थिती याचा फायदा उचलून चीन गुंतवणुक करून कंपन्या व उदयॊग गिळंकृत करील , असा इशारा तज्ज्ञ देत आहेत. यासाठी चीनने अब्जावधी डॉलर्सची तरतूद केल्याचेही दावे केले जातात. गेल्या काही आठवड्यात ऑस्ट्रेलिया, जर्मनी, स्पेन, इटली या देशांनीही आपले ‘एफडीआय’बाबतचे नियम कडक करून चीनला धक्का दिला आहे, तर इतरही काही देश अशीच पावले उचलण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहे. सर्वाना चीनच्या संधीसाधू गुंतवणुकीची भीती सतावत आहे.

भारताने ‘एफडीआय’ नियमात बदल करून चीनची गुंतवणूक असलेल्या कंपन्यांना आडवाटेने शिरकाव करण्याचे मार्ग बंद केले आहेत, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत होत असून हा निर्णय आधीच घ्यायला हवा होता असेही काही जणांचे म्हणणे आहे.

leave a reply