चीनने दशकभरापूर्वीच एआय नियंत्रित ड्रोनची सागरी चाचणी केली होती – हाँगकाँगस्थित चिनी वर्तमानपत्राचा दावा

हाँगकाँग – चीनने ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स-एआय’च्या आघाडीवर मोठी प्रगत केली आहे. दशकभरापूर्वीच चीनने या एआय तंत्रज्ञानावर आधारीत हल्ला चढवू शकणारे सागरी ड्रोन विकसित केले. चीनच्या लष्कराने तैवानच्या आखातात या ड्रोनची यशस्वी चाचणी केली होती, असा दावा हाँगकाँगस्थित वर्तमानपत्राने केला. चीनच्या लष्कराशी संबंधित विद्यापीठाने गेल्या आठवड्यात याबाबतची कागदपत्रे माध्यमांमध्ये उघड केल्याचे या विद्यापीठाने म्हटले आहे. पण तैवानची सुरक्षा आपल्याशी जोडलेली असल्याचे जाहीर करणार्‍या जपानला धमकावण्यासाठी चीनने ही माहिती प्रसिद्ध केल्याचा दावा केला जातो.

एआयलष्करी तंत्रज्ञान क्षेत्रात आणि सज्जतेमध्ये चीन अमेरिकेला टक्कर देत असल्याचे दावे चिनी मुखपत्र व माध्यमे सातत्याने करीत आहेत. काही दिवसांपूर्वी हाँगकाँगस्थित ‘साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’ वर्तमानपत्राने उघड केलेली माहिती देखील त्याचाच भाग असल्याचे दिसते. यामध्ये सदर वर्तमानपत्राने चीनच्या लष्कराशी जोडलेल्या ‘हार्बिन इंजिनिअरिंग युनिव्हर्सिटी’ने तयार केलेला अहवाल प्रसिद्ध केला. पाणबुडीवर संशोधन करणारी संस्था म्हणून हार्बिन विद्यापीठाकडे पाहिले जाते.

2010 साली चीनच्या लष्कराने एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारीत पाण्याखालील ड्रोनची निर्मिती केली होती. सदर ड्रोन शत्रूची जहाजे, विनाशिका आणि पाणबुड्यांचा ‘सोनार’ तंत्रज्ञानाद्वारे माग काढून त्यांच्यावर हल्ला चढवू शकते, असा दावा या अहवालात केल्याचे सदर वर्तमानपत्राने म्हटले आहे. चीनच्या लष्कराने तैवानच्या आखातात सागरी पातळीपासून 32 फूट खोल (10 मीटर) या ड्रोनची चाचणी घेतली होती. दहा वर्षांपूर्वी या सागरी ड्रोनने टॉर्पेडोच्या सहाय्याने डमी पाणबुडी उद्ध्वस्त केली होती, अशी माहिती या अहवालातून उघड झाली.

एआयया सागरी ड्रोनची प्रगत आवृत्ती काही दिवसांसाठी समुद्राच्या तळाशी दडून राहण्याचे काम करू शकते. संघर्ष किंवा युद्धाच्या काळात समुद्राच्या तळाशी दडलेले हे ड्रोन शत्रूच्या जहाजांवर हल्ले चढवू शकतात, असा दावा अहवालात केला आहे. गेली दहा वर्षे या ड्रोन्सबाबतचे तपशील सार्वजनिक करण्यात आले नव्हते. पण गेल्या आठवड्यात चिनी विद्यापीठाने या सागरी ड्रोनबाबतचे काही तपशील देणारा अहवाल उघड केला. चीनच्याच वर्तमानपत्राने ही माहिती प्रसिद्ध केली.

दहा वर्षानंतर चीनच्या विद्यापीठाने उघड केलेल्या या माहितीबाबत लष्करी विश्‍लेषक व माध्यमे काही शंका उपस्थित करीत आहेत. कारण 2019 साली चीनने पहिल्यांदा ‘एचएसयु-001’ सागरी ड्रोन जगासमोर उघड केले होते. सदर ड्रोनमध्ये टॉर्पेडो प्रक्षेपित करण्याची क्षमता नाही. त्याचबरोबर पाणबुडीभेदी टॉर्पेडो प्रक्षेपित करण्यासाठी मोठ्या आकाराचे व क्षमतेच्या ड्रोनची आवश्यकता आहे.

गेल्या आठवड्यातच चीनने तैवानच्या आखातात घेतलेल्या या चाचणीची माहिती का उघड केली, असा प्रश्‍नही उपस्थित केला जात आहे. गेल्या आठवड्यात जपानचे उपपंतप्रधान तारो आसो यांनी तैवानची सुरक्षा आपल्या देशाशी जोडलेली असल्याचे जाहीर केले होते. तसेच तैवानवर हल्ला झालाच तर अमेरिकेसह जपान देखील तैवानच्या सुरक्षेसाठी संघर्षात उतरेल, अशी घोषणा उपपंतप्रधान आसो यांनी केली होती. तर तैवानसाठी चीनविरोधी संघर्षात उतरून जपान स्वत:साठी कबर खणेल, अशी धमकी चीनने दिली होती. या पार्श्‍वभूमीवर, या ड्रोनच्या चाचणीची माहिती उघड करून चीनने जपान आणि तैवानला धमकावल्याचे दिसत आहे.

leave a reply