अमेरिकेतील ‘हिटवेव्ह’मुळे कॅलिफोर्नियासह सहा प्रांतांमध्ये वणवे भडकले

वॉशिंग्टन – अमेरिकेत आलेल्या ‘हिटवेव्ह’ने अधिकच गंभीर रुप धारण केले असून कॅलिफोर्नियासह सहा प्रांतांमध्ये वणवे भडकल्याचे समोर आले आहे. कॅलिफोर्नियात ‘सिएरा नेवाडा फॉरेस्ट’ भागात लागलेला वणवा तब्बल 222 चौरस किलोमीटर्सच्या परिसरात फैलावला असून त्याची तीव्रता अधिक वाढत असल्याची माहिती स्थानिक यंत्रणांनी दिली. कॅलिफोर्नियाव्यतिरिक्त इदाहो, ओरगॉन, वॉशिंग्टन, अ‍ॅरिझोना व नेवाडा प्रांतातही वणवे भडकले असून वाढत्या तापमानामुळे त्यावर नियंत्रण मिळविणे कठीण जात असल्याचा दावा सूत्रांनी केला. अमेरिकेतील सुमारे तीन कोटी नागरिकांना ‘हिटवेव्ह’ व वणव्यांचा फटका बसणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

अमेरिकेतील ‘हिटवेव्ह’मुळे कॅलिफोर्नियासह सहा प्रांतांमध्ये वणवे भडकलेपॅसिफिक महासागर क्षेत्रातील ‘पॅसिफिक नॉर्थवेस्ट’ म्हणून ओळखण्यात येणार्‍या क्षेत्रात ‘हिट डोम’ तयार झाल्याने तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. अमेरिकेच्या पश्‍चिम भागातील प्रांतांमध्ये 40 डिग्री सेल्सियस व त्याहून अधिक तापमानाची नोंद होत असून ‘हिटवेव्ह’मुळे आतापर्यंत 200हून अधिक बळी गेल्याचे सांगण्यात येते. कॅलिफोर्निया प्रांतातील ‘डेथ व्हॅली नॅशनल पार्क’ या भागात तब्बल 54 डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. जुलै 1913नंतर या भागात नोंदविण्यात आलेले हे सर्वोच्च तापमान असल्याचा दावा करण्यात येत आहे.

या विक्रमी तापमानामुळे कॅलिफोर्नियातील विविध भागांमध्ये वणवे भडकले आहेत. वणवे नियंत्रणात आणण्यसाठी अग्निशमन दलाचे 1200 हून अधिक जवान, हेलिकॉप्टर्स व विमाने तैनात करण्यात आली आहेत. अमेरिकेतील ‘हिटवेव्ह’मुळे कॅलिफोर्नियासह सहा प्रांतांमध्ये वणवे भडकलेवणव्यांमुळे बेकवर्थ कॉम्प्लेक्स व जवळच्या डोंगराळ भागातील अनेक घरे जळून राख झाली असून सुमारे तीन हजार जणांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे. ओरेगॉन प्रांतात स्प्रॅग रिव्हरच्या उत्तरेला लागलेला वणवा तब्बल 77 हजार एकर परिसरात भडकला आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी सुमारे 550 जवानांसह 10 हेलिकॉप्टर्स तैनात करण्यात आली आहेत.

अ‍ॅरिझोना प्रांतातील ‘मोहावे कौंटी’मध्ये वणवा विझविताना दोन जवानांचा बळी गेल्याचे सांगण्यात येते. वॉशिंग्टन प्रांतातील वणवा 155 चौरस किलोमीटर्स परिसरात भडकला असून त्याची तीव्रता वाढण्याचे संकेत देण्यात आले आहेत. इदाहो प्रांतात गव्हर्नर ब्रॅड लिटिल यांनी ‘वाईल्डफायर इमर्जन्सी’ जाहीर केली असून ‘नॅशनल गार्ड’च्या तैनातीचे संकेत दिले आहेत.

leave a reply