चीनने अमेरिकी सिनेटर्स व अधिकाऱ्यांवर निर्बंध लादले

China-Sanctions-Americaबीजिंग/वॉशिंग्टन – चीनच्या कम्युनिस्ट राजवटीकडून उघुरवंशीयांवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात कठोर कारवाई करणाऱ्या अमेरिकेला चीनने प्रत्युत्तर दिले आहे. सोमवारी चीनने, अमेरिकेतील वरिष्ठ सिनेटर टेड क्रूझ व मार्को रुबिओ यांच्यासह तीन नेते, एक वरिष्ठ अधिकारी आणि संसदीय आयोगाविरोधात निर्बंध लादल्याची घोषणा केली. अमेरिकेने झिंजिआंगमधील वरिष्ठ नेते व सरकारी विभागावर टाकलेल्या निर्बंधांना प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात येत असल्याचे चीनच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्या हुआ चुनयिंग यांनी सांगितले.

‘झिंजिआंगमधील व्यवहार हा पूर्णपणे चीनचा अंतर्गत मुद्दा आहे. अमेरिकेला त्यात हस्तक्षेप करण्याचा कोणताही अधिकार नाही. अमेरिकेकडून या मुद्द्यावर करण्यात आलेली कारवाई आंतरराष्ट्रीय संबंधातील मूलभूत तरतुदींचे उल्लंघन आहे. अमेरिकेने घेतलेल्या निर्णयांमुळे चीन-अमेरिका संबंधांना जबरदस्त धक्का बसला आहे. अमेरिकेने केलेल्या कारवाईला चीनचा विरोध असून आम्ही त्याचा स्पष्ट निषेध करतो’, अशा शब्दात चीनच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्या हुआ चुनयिंग यांनी अमेरिकेवर लादलेल्या निर्बंधांचे समर्थन केले. चीनने अमेरिकेला प्रत्युत्तर देण्याचा दावा करीत निर्बंधांची घोषणा केली असली, तरी ही कारवाई प्रतिकात्मक असल्याची प्रतिक्रिया अमेरिकी वर्तुळातुन उमटली आहे.

China-Sanctions-Americaचीनने लादलेल्या निर्बंधांमध्ये अमेरिकेच्या संसदेतील वरिष्ठ सिनेटर्स टेड क्रूझ व मार्को रुबिओ यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त अमेरिकेच्या संसदेतील प्रतिनिधीगृहाचे सदस्य असणारे ख्रिस स्मिथ व ‘इंटरनॅशनल रिलीजिअस फ्रीडम’ विभागासाठी नियुक्त करण्यात आलेले राजदूत सॅम ब्राऊनबॅक यांच्यावरही निर्बंध लादण्यात आले आहेत. अमेरिकेच्या संसदेचा भाग असणाऱ्या ‘युएस काँग्रेशनल एक्झिक्युटिव्ह कमिशन ऑन चायना’लाही निर्बंधांचे लक्ष्य करण्यात आले आहे. अमेरिकी संसद सदस्य व अधिकाऱ्यांच्या चीनमधील प्रवेशावर बंदी घालण्यात आल्याचे निर्बंधांमध्ये सांगण्यात आले आहे. त्याचवेळी पुढील कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.

‘झिंजिआंग मुद्यावर अमेरिकेने घेतलेला चुकीचा निर्णय तातडीने मागे घेण्यात यावा. चीनच्या हितसंबंधांना हानी पोहोचविणाऱ्या व अंतर्गत कारभारात हस्तक्षेप ठरेल, अशा कारवाया अमेरिकेने यापुढे करू नयेत. तसे घडले तर चीन त्याला जशास तसे प्रत्युत्तर देईल’, या शब्दात चीनच्या परराष्ट्र विभागाने बजावले आहे. चीनने निर्बंध लादलेले तीनही नेते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षातील असून चीनचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात. टेड क्रूझ व मार्को रुबिओ यांनी, चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट राजवटीला लक्ष्य करणारी अनेक विधेयके अमेरिकेच्या संसदेत मांडली होती. सिनेटर रुबिओ यांनी, चीन हा अमेरिकेच्या सुरक्षेला असणारा दीर्घकालीन धोका असून त्याच्याबरोबर संबंधांचा फेरविचार करावा, असा इशाराही दिला होता.

China-Sanctions-Americaगेल्याच आठवड्यात अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने उघुरवंशीयांवरील अत्याचारांविरोधात चीनच्या कम्युनिस्ट राजवटीवर मोठ्या कारवाईची घोषणा केली होती. चीनचे जे प्रमुख नेते व अधिकारी उघुरांवरील कारवाईत सामील आहेत, त्यांना लक्ष्य करण्यात आले होते. त्यात चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीचे झिंजिआंग प्रांताचे प्रमुख ‘शेन क्वांगुओ’ यांचा समावेश आहे.शेन चीनच्या कम्युनिस्ट पार्टीच्या सामर्थ्यशाली ‘पॉलिटब्युरो’चे सदस्य आहेत. झिंजिआंगमध्ये उघुरांवर करण्यात आलेल्या कारवाईची सूत्रे शेन यांच्याकडे होती. शेन यांच्यासारख्या सर्वोच्च नेत्याला लक्ष्य करण्यात आल्यानेच चीनकडून अमेरिकी नेते व अधिकाऱ्यांविरोधात कारवाईचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येते.

चीनकडून गेली काही वर्षे झिंजिआंग प्रांतातील इस्लामधर्मिय उघुरवंशियांचा सातत्याने छळ सुरू असून आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्याची दखल घेण्यात आली आहे. २०१८ साली संयुक्त राष्ट्रसंघाच्या एका अहवालात चीनने तब्बल ११ लाख उघुरवंशियांना छळछावण्यांमध्ये डांबून ठेवल्याचा धक्कादायक गौप्यस्फोट करण्यात आला होता. या अहवालानंतर पाश्‍चिमात्य देशांनी उघुरांच्या मुद्यावरून चीनला लक्ष्य करण्यास सुरुवात केली असून त्यासाठी अमेरिकेने पुढाकार घेतला आहे.

leave a reply