आसाममध्ये पूर आणि भूस्खलनात ७० जणांचा बळी

Aasam-Floodदिसपूर – ब्रम्हपुत्रा नदीला आलेल्या पुरामुळे आसामची स्थिती गंभीर बनली असून अतिवृष्टी, पूर यामुळे ४४ जणांचा बळी गेला आहे. तर भूस्खलनात २६ जण ठार झाले आहेत. आसामच्या पुरामुळे आतापर्यंत १३ लाख जण विस्थापित झाले असून एनडीआरएफ आणि एसडीआरएफने बचावकार्य सुरु आहे. रविवारी आसामच्या मुख्यमंत्र्यांनी पूरस्थितीचा आढावा घेतला. तसेच प्रत्येक जिल्ह्यापर्यंत मदत पोहोचविण्याचे आदेश आसामच्या मुख्यमंत्र्यांनी यंत्रणांना दिले आहेत.

लखिमपूर, चिरांग, बारपेटा, नागाव, गोलपूर, जोहरत आणि दिब्रुगढ या जिल्ह्यांना पूराचा मोठा फटका बसला आहे. शेकडो गावांमध्ये पाणी शिरले आहे. हजारो घरांची पडझड झाली आहे. रस्ते खचले आहेत. या पुरामुळे आसामची ८२,५४६ हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. गेल्या २४ तासात आसामची हजारो नागरिक विस्थापित झाले आहेत. त्यांच्या बचावासाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे जवान शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. रविवारी एनडीआरएफने बारपेटा जिल्ह्यातील पुरात अडकलेल्या ४६७ गावकऱ्यांची सुटका केली. तर २२४ तात्पुरती शिबिरे उभारली असून त्यात २१ हजार जणांना हलविण्यात आले आहे.

Aasam-Floodकोरोनाव्हायरसच्या संकटामुळे एनडीआरएफला बचावकार्यात अडथळे येत आहेत. पीपीई किटस् आणि जॅकीट घालून जवान पाण्यात उतरत आहेत. तसेच सुरक्षित स्थळी हलविलेल्या नागरिकांची स्क्रीनिंग आणि इतर तपासण्या होत आहेत. संशयितांची कोरोनाव्हायरसची चाचणी केली जात आहे. आसामचे काझीरंगा अभयारण्य पाण्याखाली गेले आहे. आतापर्यंत या अभयारण्यातले ४१ प्राणी वाहून गेले आहेत. तर संपूर्ण राज्यातील आठ लाख प्राणी विस्थापित झाले आहेत. दरम्यान, पुढचे ४८ तास आसाममध्ये मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे या राज्यातली पूरस्थिती अधिकच गंभीर होईल, असा इशारा हवामान विभागाने दिले. तसेच ब्रह्मपुत्रेने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे अरुणाचल प्रदेशलाही पुराचा धोका संभवतो, असा इशारा देण्यात आला आहे.

leave a reply