अमेरिका व पाश्‍चात्य देशांच्या अस्तित्वाला चीनपासून सर्वाधिक धोका

- अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन

वॉशिंग्टन/बीजिंग – अमेरिका व संपूर्ण पाश्‍चात्य जगाच्या अस्तित्वासाठी चीन हा २१ व्या शतकातील सर्वात मोठा धोका आहे, असा इशारा अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी दिला. अमेरिकेसह पाश्‍चात्य देशांच्या आघाडीने चीनच्या कम्युनिस्ट पार्टीपासून असणार्‍या धोक्याविरोधात ठामपणे उभे राहण्याची वेळ आली आहे, असेही बोल्टन यांनी बजावले. अमेरिकेकडून राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन व चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात चर्चा व्हावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे वृत्त समोर आले होते. या पार्श्‍वभूमीवर बोल्टन यांनी दिलेला इशारा लक्ष वेधून घेणारा ठरतो.

अमेरिका व पाश्‍चात्य देशांच्या अस्तित्वाला चीनपासून सर्वाधिक धोका - अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टनब्रिटनमधील ‘एलबीसी’ या रेडिओ स्टेशनला दिलेल्या मुलाखतीत बोल्टन यांनी, कोरोनाच्या साथीवरून चीनला लक्ष्य केले. ‘चीनच्या कम्युनिस्ट राजवटीने कोरोनाव्हायरसचे मूळ लपविले. आंतरराष्ट्रीय पातळीवरून कोरोनासंदर्भात सुरू असलेल्या तपासात अडथळे आणले. या सर्व पार्श्‍वभूमीनंतर पाश्‍चात्य देशांनी चीनच्या हेतूंबद्दल संशय घ्यायला हवा. चीनविरोधात एकजुटीने उभे राहण्याची इच्छा अधिक बळकट व्हायला हवी. चीनविरोधात केवळ कठोर निकष अथवा धोरणे नाहीत तर कृतीही त्याप्रमाणेच असायला हवी’, असा सल्ला बोल्टन यांनी दिला.

‘कोरोनाच्या साथीविरोधात आंतरराष्ट्रीय समुदायाने योग्य प्रकारे प्रतिसाद दिलेला नाही. ही बाब घातक असून, त्यामुळे भविष्यात दहशतवादी संघटनांना जैविक हल्ल्यांसाठी दार खुले झाले आहे आणि यासाठी चीनलाच जबाबदार धरायला हवे’, अशी टीका बोल्टन यांनी यावेळी केली. कोरोनाचे मूळ काय आहे, याचा शोध आपण घ्यायलाच हवा, याबाबत कोणतेही दुमत असू शकत नाही. जर आंतरराष्ट्रीय समुदाय यासाठी हालचाल करणार नसेल, तर ती आपली मोठ घोडचूक ठरेल’, असा इशाराही माजी सल्लागारांनी दिला.अमेरिका व पाश्‍चात्य देशांच्या अस्तित्वाला चीनपासून सर्वाधिक धोका - अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन

यावेळी त्यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यकडेही लक्ष वेधले. चीनमध्ये कम्युनिस्ट राजवट आणणार्‍या माओनंतर शी जिनपिंग हे चीनमधील सर्वाधिक शक्तिशाली नेते आहेत, याचे भान पाश्‍चात्य देशांनी ठेवायला हवे, असे अमेरिकेच्या माजी सुरक्षा सल्लागारांनी बजावले. जिनपिंग यांच्या नेतृत्त्वाखाली अधिक आक्रमक व सामर्थ्यशाली होणार्‍या चीनला रोखण्याची हीच वेळ आहे, असा दावाही बोल्टन यांनी यावेळी केला.

कोरोनाची साथ, मानवाधिकारांचे उल्लंघन, साऊथ चायना सीमधील कारवाया यासारख्या मुद्यांवरून चीनविरोधातील असंतोष दिवसेंदिवस वाढत चालला आहे. गेल्या काही दिवसात ‘जी७’ तसेच नाटोच्या बैठकीतून चीनविरोधात उमटलेले आक्रमक सूर त्याचेच संकेत मानले जातात. अमेरिका व युरोप चीनविरोधात एकत्र आले असले तरी त्यांच्या कृतीतून फारशी आक्रमकता दिसून आलेली नाही. या पार्श्‍वभूमीवर बोल्टन यांनी, चीन हा अस्तित्वासाठी धोका असल्याचे सांगून पाश्‍चात्य देशांना दिलेला इशारा महत्त्वाचा ठरतो.

leave a reply