पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री कुरेशी तालिबानचे सहयोगी असावेत

- अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांचा आरोप

काबुल/इस्लामाबाद – अफगाणिस्तानात अस्थैर्य माजविणार्‍या तालिबानची आश्रयस्थाने पाकिस्तानात आहेत, असा आरोप अफगाणिस्तान करीत आहे. पण तालिबानची आश्रयस्थाने आपल्या देशात नाहीत. याउलट अफगाणिस्तानातील दहशतवादी हल्ल्यांसाठी ‘इस्लामिक स्टेट-आयएस’ जबाबदार असल्याचे सांगून पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी तालिबानला ‘क्लिन चिट’ दिली. परराष्ट्रमंत्री कुरेशी यांच्या या विधानांवर अफगाणिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हमदुल्ला मोहिब यांनी सडकून टीका केली. तसेच पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री पुरेशी माहिती नसलेले अथवा बेपर्वा किंवा तालिबानचे सहयोगी असावे, असा आरोप मोहिब यांनी केला.

पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री कुरेशी तालिबानचे सहयोगी असावेत- अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांचा आरोपपाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी अफगाणिस्तानच्या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. ‘आपल्या देशातील अस्थैर्य आणि तालिबानच्या वाढते हल्ल्यांसाठी पाकिस्तान जबाबदार आहेत. तालिबानचे मोठे नेते पाकिस्तानात आश्रय घेऊन आहेत. क्वेट्टा शूरा आणि पेशावर शूरा या तालिबानच्या मोठ्या दहशतवादी संघटना पाकिस्तानच्या बलोचिस्तानातील क्वेट्टा तर खैबर-पख्तूनवालाच्या पेशावर शहरात तळ ठोकून आहेत. तालिबानींना पाकिस्तानातून पैसे पुरविले जातात’, असे थेट आरोप अफगाणी मुलाखतकारांनी केले. यासाठी पाकिस्तानच्या लाहोर येथील प्रार्थनास्थळामध्ये तालिबानींसाठी नीधि गोळा केला जात असल्याचा व्हिडिओ समोर आल्याची आठवण सदर मुलाखतकारांनी करून दिली.

पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री कुरेशी तालिबानचे सहयोगी असावेत- अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांचा आरोपपण पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री कुरेशी यांनी हे आरोप नाकारले. ‘गेली काही दशके आपण हेच ऐकत आलो आहोत. पण पाकिस्तानात तालिबानी संघटनांचे तळ नाहीत. अफगाणी अजूनही जुन्या गोष्टी खणत बसले असून तुम्ही यातून बाहेर पडावे’, असे सांगून कुरेशी यांनी तालिबानच्या आश्रयस्थानांचा इन्कार केला. तर ‘अफगाणिस्तानातील प्रत्येक दहशतवादी हल्ल्यांसाठी तालिबानला जबाबदार धरू नये. आयएसचे दहशतवादी अफगाणिस्तानात हल्ले चढवित आहेत’, अशा शब्दात कुरेशी यांनी तालिबानला आरोपमुक्त केले.

अफगाणिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हमिदुल्ला मोहिब यांनी कुरेशी यांच्या या विधानांचा समाचार घेतला. ‘पाकिस्तानातील तालिबानच्या आश्रयस्थानांचे अस्तित्व नाकारणारे कुरेशी पुरेशी माहिती नसलेले अथवा बेपर्वा किंवा स्वत:च तालिबानचे सहयोगी असावेत. काही वर्षांपूर्वी पाकिस्तानच्या लष्करी मुख्यालयाजवळ ठार झालेला ओसामा बिन लादेन हा देखील पाकिस्तानात नव्हताच, असाही कुरेशी दावा करतील’, असा टोला मोहिब यांनी लगावला. काही दिवसांपूर्वी अफगाणी सुरक्षा सल्लागार मोहिब यांनी पाकिस्तान हे दहशतवाद्यांचे वेश्यागृह असल्याचा ठपका ठेवला होता. त्यावर पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री कुरेशी यांनी चवताळून मोहिब यांच्यावर ताशेरे ओढले होते.

leave a reply