‘सीपीईसी’च्या आड चीन पाकिस्तानचे शोषण करीत आहे

- पाकिस्तानच्या माजी राजदूतांचा आरोप

वॉशिंग्टन – ‘भारताला टक्कर देण्यासाठी आणि अमेरिकेला पर्याय म्हणून पाकिस्तानने चीनबरोबर मैत्री केली. या मैत्रीखातर चीनने पाकिस्तानात ‘चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविला खरा. पण चीनचा हा प्रकल्प पाकिस्तानच्या भल्यासाठी नसून या प्रकल्पाद्वारे चीन पाकिस्तानच्या विरोधात शिकारी अर्थनीतिचा वापर करीत आहे’, असा आरोप पाकिस्तानचे माजी राजदूत हुसेन हक्कानी यांनी केला. पाकिस्तानातच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालाचा दाखला देऊन हक्कानी यांनी चीनकडून सुरू असलेल्या पाकिस्तानच्या आर्थिक पिळवणूकीवर बोट ठेवले. देशाच्या या आर्थिक शोषणात पाकिस्तानचे वरिष्ठ लष्करी अधिकारी चीनला साथ देत आहेत, असा आरोप हक्कानी यांनी केला.

अमेरिकेतील एका मासिकासाठी लिहिलेल्या लेखामध्ये आणि त्यानंतर काही वृत्तवाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीत हक्कानी यांनी चीनच्या ‘सीपीईसी’ प्रकल्पावर सडकून टीका केली. हा प्रकल्प अपारदर्शकतेच्या गाळात रुतलेला असून या प्रकल्पात गुंतलेल्या चीनच्या कंपन्यांनी पाकिस्तानची जबर आर्थिक लूट केल्याचे हक्कानी यांनी म्हटले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी नियुक्त केलेल्या एका चौकशी समितीच्या अहवालाचा दाखला देऊन हक्कानी यांनी हा आरोप केला. चीन पाकिस्तानचा भरवशाचा मित्रदेश असल्याचे पाकिस्तानी जनतेला पटवून देण्यात आले. पण हाच चीन सीपीईसी प्रकल्पाच्या आडून पाकिस्तानी जनतेचे निर्दयतेने शोषण करीत आहे, ही बाब हक्कानी यांनी लक्षात आणून दिली.

गेल्या काही महिन्यांमध्ये पाकिस्तानी जनतेच्या विजेच्या बिलांमध्ये मोठी वाढ झाली होती. याचा तपास करण्यासाठी पंतप्रधान इम्रान खान यांनी चौकशी समितीची स्थापना केली होती. सीपीईसी प्रकल्पात सहभागी असलेल्या चिनी ऊर्जानिर्मिती कंपन्यांमुळे बिलात वाढ झाल्याचे या अहवालात म्हटले आहे. पाकिस्तानच्या वीजनिर्मिती क्षेत्रात सुमारे ६२ कोटी डॉलर्स इतक्या प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. या भ्रष्टाचारात सहभागी असलेल्या कंपन्यांमध्ये चीनच्या कंपन्यांचा सर्वाधिक सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे. ‘हुआनेंग शँडोंग रुयी’ असे या भ्रष्टाचारात सहभागी असलेल्या चिनी कंपनीचे नाव आहे.

सीपीईसी प्रकल्पाअंतर्गत चिनी कंपनीने केलेल्या भ्रष्टाचाराची माहिती उघड झाली असली तरी पाकिस्तान या कंपन्यांवर कारवाई करू शकणार नाही, असे हक्कानी यांनी म्हटले आहे. या प्रकल्पातील पाकिस्तानी लष्कराचा सहभाग आणि चिनी कंपन्यांबरोबरचे त्यांचे संबंध या कारवाईच्या आड येतील, असा दावा हक्कानी यांनी केला. पंतप्रधान इम्रान खान यांचे विशेष सहाय्यक लेफ्टनंट जनरल असिफ सलीम बाजवा हे सीपीईसी प्रकल्पाचे पाकिस्तानातील प्रमुख आहेत, याकडे हक्कानी यांनी लक्ष वेधले. त्यामुळे चीनकडून होत असलेल्या पाकिस्तानी जनतेच्या लुटमारीला पाकिस्तानचे लष्करच जबाबदार असल्याचा ठपका हक्कानी यांनी ठेवला आहे.

leave a reply