२५ मे पासून देशातली विमान सेवा टप्प्याटप्प्याने सुरू होणार

नवी दिल्ली – २५ मेपासून देशातील विमान सेवा टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा निर्णय केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी जाहीर केला.

कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी देशातली व आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक सेवा बंद करण्यात आली होती. बुधवारी केंद्र सरकारने देशांतर्गत विमान सेवेवर असलेली बंदी उठवली आहे. जवळपास दोन महिन्यांच्या कालावधीनंतर देशांतर्गत विमान वाहतूक सुरू होत असल्याने नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

सध्या देशात लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू आहे. हा लॉकडाऊन वेगळा असेल असे संकेत पंतप्रधान मोदी यांनी दिले होते. त्यानुसार चौथ्या टप्प्याच्या अखेरीस विमान वाहतूक सेवा सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्याचे दिसत आहे. “२५ मे पासून टप्प्याटप्प्याने देशातंर्गत हवाई वाहतूक सुरू करण्यात येईल. विमानतळ प्रशासन आणि विमान कंपन्यांना याची माहिती देण्यात आली आहे. लवकरच प्रवासांसंदर्भातील नियमावली केंद्रीय वाहतूक मंत्रालयाकडून दिली जाईल,” अशी माहिती केंद्रीय हवाई वाहतूक मंत्र्यांनी दिली आहे. पण कुठल्या मार्गावर विमानसेवा सुरू होईल याबाबत सविस्तर माहिती हवाई वाहतूक मंत्र्यांनी दिलेली नाही.

दरम्यान या नियमावलीमध्ये प्रवाशांना मास्क आणि ग्लोव्ह्ज दिले जातील, याशिवाय प्रवाशांना आरोग्य सेतू ॲप बंधनकारक असेल, असे सांगण्यात येत आहे. पण नियमावली आल्यावरच याबाबत अधिक स्पष्टता येईल. प्रवाशांनी उड्डाणाच्या किमान दोन तास आधी विमानतळावर दाखल व्हावे तसेच सुरक्षेसाठी असलेले गेट उड्डाणाच्या एक तासापूर्वीच बंद केले जावेत, असा प्रस्ताव सीआयएसएफने दिल्याचे कळते आहे.

leave a reply