चीन हा जगासमोरचा सर्वात मोठा धोका

-अमेरिका व ब्रिटनने बजावले

threat-to-the-worldलंडन – ‘चीनच्या धोक्याबाबत ऐकणे कदाचित विचित्र वाटेल. पण हा धोका खरा आहे व दिवसेंदिवस त्याची तीव्रता वाढते आहे. याबद्दल उघडपणे बोलणे आवश्यक ठरते. आता या धोक्याविरोधात कृती करण्याची गरज आहे’, अशा शब्दात अमेरिका व ब्रिटनच्या यंत्रणांनी चीनच्या वाढत्या धोक्याकडे जगाचे लक्ष वेधले. ब्रिटनची राजधानी लंडनमध्ये प्रथमच अमेरिकेची तपासयंत्रणा ‘फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन'(एफबीआय) व ब्रिटनची गुप्तचर यंत्रणा ‘एमआय5′ यांनी एकत्रित पत्रकारपरिषद घेतली. दोन्ही यंत्रणांच्या प्रमुखांनी चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट राजवटीकडून जगभरात सुरू असलेल्या छुप्या कारवायांची जाणीव करून दिली.

चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट राजवटीकडून जगभरातील विविध देशांवर वेगवेगळ्या मार्गाने दडपण आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जागतिक व्यवस्थेतील सध्याच्या समीकरणांचा विचार करता या हालचाली सर्वात मोठा धोका ठरतो, असे ब्रिटनच्या ‘एमआय5’चे संचालक केन मॅक्कलम यांनी बजावले. चीनकडून आताच्या घडीला ब्रिटनमध्ये मोठ्या प्रमाणात गोपनीय कारवाया सुरू असून आमच्याकडे इतरांच्या तुलनेत सातपट चिनी प्रकरणांचा तपास सुरू आहे, असेही ‘एमआय5’च्या संचालकांनी सांगितले.

China-biggest-threatचीनच्या वाढत्या कारवाया अमेरिका व ब्रिटनबरोबरच मित्रदेशांसाठीही मोठा धोका आहे, असा इशारा ‘एफबीआय’चे प्रमुख ख्रिस्तोफर रे यांनी दिला. चीन मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानाची चोरी करून उद्योक्षेत्र खिळखिळे करीत आहे आणि देशांच्या बाजारपेठा ताब्यात घेत आहे, असा आरोप एफबीआयच्या प्रमुखांनी केला. चीनचा ‘हॅकिंग प्रोग्राम’ जगातील आघाडीच्या देशांच्या एकत्रित यंत्रणांपेक्षा मोठा असल्याचा दावाही अमेरिकी अधिकाऱ्यांनी केला. गेल्या काही वर्षात अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलियासह युरोपिय देश चीनच्या वाढत्या कारवायांचा मुद्दा सातत्याने उपस्थित करीत आहेत. मात्र या मुद्यावर अमेरिका व ब्रिटनसारख्या आघाडीच्या देशांच्या यंत्रणांनी एकत्र परिषद घेऊन धोक्याची जाणीव करून देणे लक्ष वेधून घेणारे ठरते.

अमेरिका व ब्रिटनच्या या पत्रकारपरिषदेवर चीनने प्रतिक्रिया दिली असून आपल्याविरोधातील आरोप बदनाम करण्याच्या मोहिमेचा भाग असल्याची टीका केली.

leave a reply