पंतप्रधानांनी आदरणीय दलाई लामा यांना दिलेल्या शुभेच्छांवर चीनचा आक्षेप

-भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे सणसणीत प्रत्युत्तर

नवी दिल्ली – बौद्ध धर्मगुरू आणि तिबेटींचे नेते आदरणीय दलाई लामा यांच्या 87 व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना फोनवरून शुभेच्छा दिल्या होत्या. यावरही चीनने आक्षेप घेतला आहे. दलाई लामा चीनमधील विघटनवादी कारवायांशी निगडीत आहेत, हे भारताने लक्षात घ्यावे, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने बजावलेआहे. त्याला उत्तर देऊन भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने दलाई लामा हे आदरणीय धर्मगुरू असून भारतात त्यांच्यांबद्दल आदर व सन्मानाची भावना असल्याचे स्पष्ट केले. तसेच आदरणीय दलाई लामा यांच्याबाबत भारताची ही भूमिका कायम होती व यापुढेही राहिल, याचीही जाणीव परराष्ट्र मंत्रालयाने चीनला करून दिली.

PM-greetings-to-Dalai-Lamaपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाढदिवसानिमित्त दलाई लामा यांना दिलेल्या शुभेच्छांमध्ये देखील चीन राजकारण आणत आहे. याद्वारे भारत तिबेटचा मुद्दा ऐरणीवर आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचा ठपका चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजिआन यांनी ठेवला. दलाई लामा चीनमधील विघटनवादी कारवायांशी जोडलेले आहेत. ही बाब भारत लक्षातघेईल आणि चीनच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करणार नाही, अशी अपेक्षा लिजिआन यांनी व्यक्त केली. मात्र दलाई लामा यांच्याविषयी साऱ्या देशात आदराची भावना असून देशभरात त्यांचे अनुयायी आहेत, असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. आदरणीय धर्मगुरू म्हणून भारत नेहमीच दलाई लामा यांचा सन्मान करीत आलाआहे. त्यांच्यासंदर्भातील भारताची कायम भूमिका होती, याकडे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी लक्ष वेधले.

दरम्यान, इंडोनेशियामध्ये सुरू असलेल्या ‘जी-20′ परिषदेत भारत व चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांची चर्चा होत असतानाच, चीनने दलाई लामा यांच्या शुभेच्छांचा मुद्दा उपस्थित केला. भारत जाणीवपूर्वक दलाई लामा यांचा सन्मान करून तिबेटचा मुद्दा उपस्थित करीत असल्याचे चीनचे म्हणणे आहे. तिबेट हा चीनचाअविभाज्य भूभाग आहे, असे चीन सातत्याने सांगत असून भारतानेही तिबेटवरील चीनच्या ताब्याला अधिकृत पातळीवर मान्यता दिली होती. पण काही दशकांपूर्वीचे हे धोरण भारताने बदलावे, अशी मागणी भारतात आश्रय घेतलेले तिबेटी करीत आहेत. त्याचवेळी तिबेटी जनतेवर चीन करीत असलेल्या अत्याचारांचा मुद्दा आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजत आहे. चीन तिबेटची वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती, भाषा व ओळख यांचा संहार करीत असल्याचे आरोप तीव्र झाले आहेत. त्यातच लडाखच्या एलएसीवरील भारतीय सैनिकांच्या तैनातीविरोधात चीनने तिबेटचा वापर सुरू केल्याचीही बाब समोर येत आहे. तिबेटमध्ये लष्कर व शस्त्रास्त्रे तैनात करण्याबरोबरच चीनने तिबेटी तरुणांची आपल्या लष्करात जबरदस्तीने भरती करण्याची सुरूवात केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. अशा काळात भारताच्या पंतप्रधानांनी दलाई लामा यांना शुभेच्छा देऊन तिबेटवरील चीनच्या अत्याचारांचा मुद्दा ऐरणीवर आणल्याची चिंता चीनला वाटत आहे.

याआधीही चीनवरील दबाव वाढविण्यासाठी भारत ‘तिबेट कार्ड’ वापरत असल्याचे आरोप चीनने केले हेोते. आपल्या प्रचंड आर्थिक, राजकीय व लष्करी बळाच्या जोरावर चीनने तिबेटचा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत येऊ दिला नव्हता. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. हाँगकाँग व तिबेटी जनतेवरील चीनच्या अत्याचारांचा मुद्दा तसेच चीनच्या झिंजियांग प्रांतातील उघूरवंशियांच्या नरसंहाराच्या भयंकर बातम्या जगासमोर येत आहेत. या मुद्यांवर चीनचे युरोपिय महासंघाबरोबर मतभेद तीव्र झाले असून यामुळे उभयपक्षी व्यापार बाधित झाल्याचे दिसतआहे. अशा परिस्थितीत भारताने तिबेटचा प्रश्न आक्रमकपणे मांडला, तर आंतरराष्ट्रीय समुदायाला आपल्या विरोधात जाण्याची आणखी एक संधी मिळेल, या चिंतेने चीनला ग्रासले आहे.

म्हणूनच औपचारिक पातळीवर भारतीय पंतप्रधानांनी आदरणीय दलाई लामा यांना फोनवरून दिलेल्या शुभेच्छा देखील चीनला असुरक्षित बनविणाऱ्या ठरत असल्याचे दिसते.

leave a reply