‘सीपीईसी’वरुन चीनने पाकिस्तानला वेठीस धरले

इस्लामाबाद – ‘चायना पाकिस्तान इकोनॉमिक कॉरिडोर’ (सीपीईसी) प्रकल्प पाकिस्तानचे भवितव्य असल्याचा निर्वाळा पंतप्रधान इमान खान यांनी दिला होता. पण पाकिस्तानचा हा प्रकल्पच थंडावला असून यामुळे पाकिस्तानचे भवितव्यही अंधातरी असल्याचे दिसू लागले आहे. चीनच्या राजवटीने या प्रकल्पाचा निधी रोखल्याची माहिती समोर येत आहे. पाकिस्तानला वेठीस धरण्यासाठी चीनने ही खेळी रचल्याचा दावा पाश्चिमात्य विश्लेषक करीत आहेत. तर हा प्रकल्प पाकिस्तानसाठी ‘ट्रिलियन डॉलर ब्लंडर’ ठरणार असल्याचे दावे पाश्चिमात्य वर्तमानपत्रे करू लागली आहेत.

‘सीपीईसी’

चीन आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या ६४ अब्ज डॉलर्सच्या ‘सीपीईसी’ प्रकल्पासाठी चीननेच निधी पुरविण्यास नकार दिला आहे. हा प्रकल्पाला गतिमान करण्यासाठी आवश्यक असलेली रेल्वे यंत्रणा मजबूत करण्यासाठी पाकिस्तानला कराची ते पेशावर पर्यंतची रेल्वेलाईन विस्तारित करण्याबरोबरच सध्याच्या रेल्वेचे आधुनिकीकरण करणे आवश्यक आहे. या रेल्वेलाईनच्या आधुनिकीकरणामुळे पाकिस्तानात दीड लाख रोजगार निर्माण होतील, असा दावा इम्रान खान यांच्या सरकारने केला होता. त्याचबरोबर कराची ते पेशावर दरम्यानची रेल्वे मालवाहतूकही सुधारेल, असा विश्वास पाकिस्तानचे सरकार व्यक्त करीत आहे. पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यापासून या रेल्वेप्रकल्पाच्या कामाला सुरुवात होणे आवश्यक होते.

‘सीपीईसी’

या रेल्वेप्रकल्पासाठी चीनने ‘सीपीईसी’ अंतर्गत पाकिस्तानला कर्ज पुरविण्याचे मान्य केले होते. सुमारे सात अब्ज डॉलर्सच्या या रेल्वे प्रकल्पासाठी चीनने पाकिस्तानला एक टक्के व्याजदरावर कर्ज पुरविण्याचे करारात म्हटले होते. पण करारातील या अटीतून चीनने माघार घेतल्याच्या बातम्या पाकिस्तानी माध्यमे व पत्रकार देत आहेत. या प्रकल्पासाठी एक टक्के व्याजदरावर कर्ज पुरविण्यास चीनने स्पष्ट नकार दिला आहे. चीनने पाकिस्तानला या कर्जासाठी व्याजाचे दर वाढण्याची अट ठेवली आहे. या प्रकल्पाच्या खर्चाचा ९० टक्के भार चीन उचलणार आहे. त्यामुळे चीनने व्याजदरात वाढ केली तर त्याचा थेट परिणाम पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर होईल, असा दावा केला जातो.

तर या प्रकल्पात चीन व्यतिरिक्त इतर कुठल्याही देशाच्या कंपन्या सहभागी होऊ शकत नसल्याची अटही चीनने ठेवली आहे. त्यामुळे पूर्णपणे चीनच्या गुंतवणूकीवर अवलंबून असलेल्या पाकिस्तानला जिनपिंग राजवटीने वेठीस धरल्याची दबक्या आवाजातील टीका पाकिस्तानी माध्यमांमधून होत आहे. तर पाकिस्तानला आपल्यासमोर झुकविण्यासाठी चीनने ही खेळी केल्याचा दावा पाश्चिमात्य विश्लेषक करीत आहेत. तर चीनने ‘सीपीईसी’ प्रकल्पाला निधी पुरविला नाही तर हा प्रकल्प गुंडाळला जाईल, अशी चिंता पाकिस्तानचे पत्रकार व्यक्त करीत आहेत. आधीच्या काळात ‘सीपीईसी’ प्रकल्पामुळे पाकिस्तान संपन्न देश बनेल, अशी स्वप्ने जनतेला दाखविण्यात आली होती. पण आता हा प्रकल्पच धोक्यात आल्याने पाकिस्तानची धडगत नसल्याची कबुली या देशातील विश्लेषक व पत्रकार देऊ लागले आहेत. त्यातच ‘सीपीईसी’मधील भ्रष्टाचारात पाकिस्तानच्या वरिष्ठ लष्करी अधिकार्‍याचा हात असल्याचे उघड झाल्याने लष्कराच्या चिंताही वाढल्या आहेत.

leave a reply