कोरोनाच्या संधीचा लाभ घेऊन पाकिस्तान दहशतवाद, द्वेष पसरवित आहे

- संयुक्त राष्ट्रसंघात भारताचा आरोप

नवी दिल्ली – ‘कोरोनाव्हायरसच्या महामारीने सारे जग ठप्प झालेले असताना, पाकिस्तान या साथीचा फायदा घेऊन सीमेपलिकडे दहशतवाद पसरवित आहे. त्याचबरोबर भारताच्या धार्मिक समुदायांमध्ये तेढ वाढविण्यासाठी पाकिस्तान द्वेषभावनेला चिथावणी देत आहे’, अशा जळजळीत शब्दात भारताने संयुक्त राष्ट्रसंघाच्या बैठकीत पाकिस्तानवर जोरदार हल्ला चढविला. पण पाकिस्तानच्या या प्रयत्‍नांना फारसे यश मिळत नसल्याचे राष्ट्रसंघातील भारताचे फर्स्ट सेक्रेटरी आशिष शर्मा यांनी स्पष्ट केले.

दहशतवाद

संयुक्त राष्ट्रसंघाच्या विशेष फोरममध्ये बोलताना आशिष शर्मा यांनी दहशतवाद, वंशद्वेष, वांशिक भेदभाव, झेनोफोबिया आणि संबंधित असहिष्णुतांच्या मुद्द्यावरुन पाकिस्तानवर निशाणा साधला. कोरोनाव्हायरससारख्या महामारीच्या काळात सारे जग खिळलेले असताना, पाकिस्तानने मात्र या महामारीचा गैरफायदा घेत भारतात दहशतवाद भडकविण्याचा प्रयत्‍न केल्याची टीका फर्स्ट सेक्रेटरी आशिष शर्मा यांनी केली. पाकिस्तान आपला कुटील राजकीय हेतू साधण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या व्यासपीठाचा वापर करीत असल्याचा ठपका भारताच्या फर्स्ट सेक्रेटरींनी ठेवला. भारतात धार्मिक हिंसा घडविण्यासाठी व असहिष्णुतेला प्रोत्साहित करण्यासाठी पाकिस्तान आमच्या देशाविरोधत पराकोटीचा द्वेषयुक्त भाषणाचा वापर करीत असल्याचे शर्मा म्हणाले.

भारतातील धार्मिक समुदायांमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी पाकिस्तानकडून जोरदार प्रयत्‍न सुरू असले तरी भारतामधील विविध संस्कृतीमध्ये एकात्मता आणि सहजीवनाची परंपरा असल्यामुळे पाकिस्तानचे सारे प्रयत्‍न व्यर्थ ठरत आहे, असे सांगून शर्मा यांनी त्यावर समाधान व्यक्त केले. त्याचबरोबर भारतातील धार्मिक मुद्यांवर बरळण्याआधी पाकिस्तानने आपल्या देशात सहजीवनाची परंपरा रुजवावी आणि आपल्याच नागरिकांविरोधात सुरू असलेला हिंसाचार, भेदभाव आणि असहिष्णुता थांबवावी, असा टोला भारताच्या फर्स्ट सेक्रेटरी शर्मा यांनी लगावला.

पाकिस्तानच्या भारतविरोधी अपप्रचाराचा समाचार घेताना शर्मा यांनी भारताला कोरोनाव्हायरसच्या साथीबरोबरच पाकिस्तानच्या अपप्रचाराचाही मुकाबला करावा लागला, याकडे लक्ष वेधले. सध्या पाकिस्तान आर्थिक, राजकीय आघाड्यांवर पूर्णपणे अपयशी ठरला असून या देशाचे परराष्ट्र धोरणही पूर्णपणे अपयशी ठरले आहे. यामुळे कोंडी झालेले पाकिस्तानचे सरकार भारताच्या विरोधात गरळ ओकून आपले अपयश झाकू पाहत आहे. पाकिस्तानकडून सुरू असलेला भारतविरोधी अपप्रचार म्हणजे या अपयशातून आलेले वैफल्य असल्याचा निष्कर्ष काही भारतीय विश्लेषक नोंदवित आहेत. मात्र भारताने या अपप्रचाराकडे गांभीर्याने पहावे व त्याला प्रभावी उत्तर द्यावे, अशी मागणी या भारतीय विश्लेषकांकडून केली जात आहे.

leave a reply