उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जाँग उन यांच्या तपासणीसाठी चीनचे पथक

उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जाँग उन यांच्या तपासणीसाठी चीनचे पथक

बीजिंग – उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा व हुकूमशहा किम जाँग उन यांच्या आजाराबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा सुरू असतानाच, चीनने एक विशेष पथक उत्तर कोरियात धाडल्याची माहिती समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने यासंदर्भातील वृत्त दिले असून घटनेशी संबंधित व्यक्तींच्या हवाल्याने माहिती देत असल्याचा दावा केला. काही दिवसांपूर्वीं दक्षिण कोरियाच्या एका वेबसाईटने किम जाँग ऊन यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्याचे वृत्त दिले होते.

चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीच्या ‘इंटरनॅशनल लायजन डिपार्टमेंट’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली हे पथक उत्तर कोरियात दाखल झाले आहे. या पथकात चीनमधील डॉक्टर्स व इतर अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचे सांगण्यात येते. चीनच्या परराष्ट्र विभागाने यावर कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देण्याचे नाकारले आहें.

काही दिवसांपूर्वी दक्षिण कोरियाच्या “डेली एनके” या वेबसाईटने किम जाँग ऊन यांच्यावर 12 एप्रिलला शस्त्रक्रिया झाल्याचा दावा केला होता. त्यानंतर किम जोंग ऊन यांची प्रकृती गंभीर असल्याचे दावेही समोर आले होते. मात्र चीन व दक्षिण कोरियाने ते फेटाळून लावले होते. या पार्श्वभूमीवर चीनने तातडीने एक पथक उत्तर कोरियात पाठवणे लक्ष वेधून घेणारे ठरते.

गुरुवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही किम जाँग ऊन यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वृत्त नाकारले होते. याबाबतचे दावे चुकीचे असल्याची प्रतिक्रिया ट्रम्प यांनी दिली होती. दक्षिण कोरियातील अधिकाऱ्यांनीही उत्तर कोरियाचे हुकूमशहा ऊन यांची प्रकृती चांगली असून लवकरच ते माध्यमांसमोर येतील असा दावा केला आहे.

अमेरिकेच्या गुप्तचर अधिकाऱ्यांनी यापूर्वीही किम जाँग यांच्या प्रकृतीबाबतच्या बातम्या समोर आल्या होत्या याकडे लक्ष वेधले. 2014 सालीही किम जाँग ऊन तब्बल एक महिना प्रकृतीच्या कारणामुळे कोरियन जनता व माध्यमांपासून गायब होते. त्यानंतर उत्तर कोरियाच्या सरकारी टीव्हीने त्यांचे व्हिडिओ प्रसिद्ध केले होते. किम जाँग ऊन यांच्या परिवारात हृदयरोगाचा आजार अनुवांशिक असल्याचे सांगण्यात येते.

यापूर्वी 2008 साली किम जाँग ऊन यांचे वडील व उत्तर कोरियाचे माजी हुकूमशहा किम जाँग दुसरे यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यावेळी त्यांच्यावर चिनी तसेच फ्रेंच डॉक्टरांनी उपचार केले होते. किम जोंग दुसरे यांचे 2011 साली हृदयविकाराच्या झटक्यानेच निधन झाले होते. त्यानंतर किम जाँग ऊन यांनी सत्ता हाती घेतली होती.

चीनमध्ये कोरोनाव्हायरसची साथ सुरू झाल्यानंतर 2020 मध्ये उत्तर कोरियातही त्याचा शिरकाव झाल्याचे दावे समोर आले होते. मात्र कोरियन राजवटीकडून त्याच्या फैलावाचे वृत्त फेटाळण्यात आले होते. अशा वेळी किम जाँग ऊन यांच्या आजारासंबंधातील बातमी व चीनच्या विशेष पथकाचे उत्तर कोरियात दाखल होणे लक्ष वेधून घेणारे ठरते.

leave a reply