अमेरिकेत ‘स्टॉप कम्युनिस्ट चायना’ मोहीम सुरू

अमेरिकेच्या माजी राजदूत निकी हॅले यांनी पुढाकार घेतला

अमेरिकेत ‘स्टॉप कम्युनिस्ट चायना’ मोहीम सुरू – अमेरिकेच्या माजी राजदूत निकी हॅले यांनी पुढाकार घेतला

वॉशिंग्टन – ‘कोरोनाव्हायरसच्या साथीबाबत जगाला अंधारात ठेवणाऱ्या चीनला या साथीने घेतलेल्या बळींसाठी जबाबदार धरले पाहिजे. या साथीची सखोल चौकशी व्हायलाच हवी’, अशी मागणी करून संयुक्त राष्ट्रसंघातील अमेरिकेचे माजी राजदूत निकी हॅले यांनी जबरदस्त मोहीम छेडली आहे. ‘स्टॉप कम्युनिस्ट चायना’ या हॅले यांनी सुरू केलेल्या ऑनलाईन मोहिमेला अमेरिकेत जबरदस्त प्रतिसाद मिळतो आहे. अमेरिकन काँग्रेसने जगभरात चीनचा वाढत असलेला पुढाकार रोखण्यासाठी वेळीच पावले उचलावी, यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आल्याचे हॅले यांनी स्पष्ट केले आहे.

‘अमेरिका गेल्या काही वर्षांपासून चीनच्या कम्युनिस्ट सरकारपासून असलेल्या धोक्याबाबत ओरडून सांगत आहे. कोरोनाव्हायरसच्या साथीमुळे चीन किती धोकादायक आहे, याचा अनुभव साऱ्या जगाने घेतला आहे. आता इशारा देण्याची वेळ संपली आहे. अमेरिकन जनतेची सुरक्षा, आरोग्य आणि समृद्धीसाठी कारवाई करावीच लागेल’, असे हॅले यांनी आपल्या ऑनलाईन मोहिमेचे समर्थन करताना म्हटले आहे. अमेरिकन काँग्रेसने चीनमधील या साथीची सखोल चौकशी करावी. तसेच या साथीमुळे झालेल्या जबरदस्त हानीची भरपाई चीनकडून वसूल करण्यासाठी अमेरिकन काँग्रेसने पावले उचलावी, असे आवाहन हॅले यांनी केले आहे.

कोरोनाव्हायरसची साथ अमेरिकेत दाखल झाल्यानंतर निकी हॅले यांनी चीनच्या विरोधात आक्रमक भूमिका घेऊन या देशाला धडा शिकविण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले होते. तसेच चीनने प्रमुख आंतरराष्ट्रीय संस्थांवरील आपला प्रभाव पद्धतशीररीत्या वाढवून वर्चस्व प्रस्थापित केले आहे. डिसेंबर महिन्यातच तैवानने चीनमधील या साथीबाबत सावध करणारे पत्र ‘जागतिक आरोग्य संघटने’ला पाठवल्यानंतरही त्यावर कारवाई झाली नव्हती. कारण या संघटनेवर चीनचा प्रभाव आहे. त्याचा वापर करून चीनने महत्त्वाची माहिती जगापासून दडवून ठेवली, याकडे हॅले यांनी लक्ष वेधले होते.

‘म्हणूनच आंतरराष्ट्रीय संस्था तसेच अमेरिकेसारख्या देशातील चीनचा प्रभाव रोखण्यासाठी वेळीच पावले उचलणे अनिवार्य बनले आहे. अमेरिकी विद्यापीठातील प्राध्यापक आणि अभ्यासकांना चीनकडून मिळणारे फंडिग याची माहिती उघड करुन हे फंडिंग थांबविण्यासाठी अमेरिकन काँग्रेसने कारवाई करावी’, अशी मागणी हॅले यांनी केली.

‘कोरोनाव्हायरसचे सत्य जगापासून दडविणाऱ्या चीनमधील वैद्यकीय साहित्य आणि औषधनिर्मिती कंपन्यांना अमेरिकेत परत आणा. चीनच्या गळफासातून अमेरिकी कंपन्यांची सुटका करा’, असे आवाहन हॅले यांनी केले. चीनला मिळणाऱ्या सवलती बंद करा आणि कोरोनाव्हायरसच्या साथीमुळे झालेल्या नुकसानाची चीनकडून भरपाई वसूल करा. हा मुद्दा अमेरिकन काँग्रेसने संयुक्त राष्ट्रसंघाकडे उपस्थित करावा, असे हॅले यांनी म्हटले आहे.

हॅले यांच्या ऑनलाईन मोहिमेला जबरदस्त प्रतिसाद मिळत असून अवघ्या काही तासात ४० हजार जणांनी या मोहिमेचे समर्थन केले. यामुळे चीनच्या विरोधात अमेरिकी जनतेमध्ये असलेला संताप उघड होत आहे.

leave a reply